Pages

Tuesday, January 30, 2018

शेतक-यांसाठी किफायतीशीर व उपयुक्‍त बैलचलित शेती औजार निर्मितीवर भर द्यावा लागेल ......डॉ. बी. एस. प्रकाश

वनामकृवित पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या राष्‍ट्रीय वार्षिक कार्यशाळाचे उदघाटन

राष्‍ट्रीय स्‍तरावर शेती उपयुक्‍त जनावरांची संख्‍या दिवसेंदिवस घटत आहे, भारतीय शेतक-यांची सरासरी जमीन धारण क्षमता केवळ 1.15 हेक्‍टर असुन 45 टक्के शेतक-यांकडे 0.6 हेक्‍टर पेक्षा कमी जमीन वहितीखाली आहे. या शेतक-यांचे उत्‍पादन दुप्‍पट करण्‍यावर आपणास भर द्यावा लागेल. या शेतक-यांना शेतमजुरी परवडत नाही तर दुस-या बाजुस शेतीचे यांत्रिकीकरणही करता येत नाही. तेव्‍हा या शेतक-यांसाठी किफायतीशीर व उपयुक्‍त बैललित शेती औजार निर्मितीवर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहसंचालक (पशु विज्ञानडॉ बी एस प्रकाश यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयित संशोधन प्रकल्‍पातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील वार्षिक दोन दिवसीय कार्यशाळाच्‍या उदघाटनप्रसंगी (दिनांक 30 जानेवारी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, भोपाळ येथील डॉ एम दिन, गंगटोक येथील डॉ एस के राऊतरे, डॉ के एन अग्रवाल, अभियंता प्रा स्मिता सोलंकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ बी एस प्रकाश पुढे म्‍हणाले की, राज्‍यातील अल्‍पभुधारक शेतकरी आजही शेतकामासाठी पशुशक्‍तीवरच अवलंबुन आहेत. महाराष्‍ट्रातील देवणी व लाल कंधारी जाती हवामान बदलात तग धरणा-या असुन या पशुशक्‍तीचा वापर शेतीत कार्यक्षमरित्‍या करता येईल.  
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयात अल्‍पभुधारक शेतक-यांमध्‍ये टॅक्‍टरच्‍या वापरावर मर्यादा आहेत, त्‍यामुळे शेतीत पशुशक्‍तीचा योग्‍य व कार्यक्षम वापर करावा लागेल. सद्यस्थितीत शेतीत पाणी व मजुराची कमतरता ही मुख्‍य समस्‍या असुन यासाठी कृषि संशोधन क्षेत्रात कृषि अभियंत्‍याना महत्‍वाची भुमिका बजवावी लागेल. राज्‍यात यवतमाळ जिल्‍हा किटकनाशक फवारणीमुळे अनेक शेतक-यांना प्राण गमवावे लागले. परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केले बैलजलित सौर ऊर्जेवर जालणारे फवारणी यंत्र निश्चितच उप‍युक्‍त आहे, यात फवारणी करतांना शेतक-यांचा कमीत कमी किटकनाशकांशी संबंध येतो, या यंत्राचा प्रसार करावा लागेल. 
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. सुत्रसंचालक डॉ निता गायकवाड यांनी केले तर आभार प्रा स्मिता सोलंकी यांनी मानले. सदरिल कार्यशाळेसाठी देशातील कर्नाटक, हरियाणा, बिहार, उत्‍तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, मध्‍यप्रदेश, नागालॅड आदी राज्‍यातील 9 केंद्राचे 30 शास्‍त्रज्ञ व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यशाळेत कृषी क्षेत्रात पशुशक्‍तीचा योग्‍य व कार्यक्षम वापर या विषयावर देशातील शास्‍त्रज्ञ विविध संशोधन शोध निबंध सादर करून विचार मंथन करणार आहेत. विशेष म्‍हणजे देशातील केवळ नऊ कृषी विद्यापीठांमध्‍ये सदर प्रकल्‍प कार्यन्‍वीत असुन राज्‍यात हा प्रकल्‍प केवळ परभणी कृषि विद्यापीठात आहे.

Thursday, January 25, 2018

वनामकृविच्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात “व्यक्तिमत्व विकासव समुपदेशन” या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा दिनांक २४  व २५ जानेवारी रोजी संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू यांच्‍या हस्‍ते झाले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, विस्तार शिक्षण संचालक डॉ. पी. जी. इंगोले, व्यावसायिक प्रशिक्षक आर. एम. कुबडे, मुंबई येथील पोलिस उपनिरिक्षक अंजली वाणी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू म्हणाले की, व्यक्तिमत्व विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून नेहमी सकारात्मक भाव दिसणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेत शिक्षण संचालक डॉ. व्ही. डी. पाटील, व्यावसायिक प्रशिक्षक आर. एम. कुबडे, पोलिस उपनिरिक्षक अंजली वाणी, माजी प्राचार्य डॉ. आर जी नादरे, महाराष्ट्र रिमोट सेसिंग सेंटर, नागपूर येथील शास्त्रज्ञ संजय अप्तुरकर, जळगाव येथील जैन इरिगेशन कंपनीचे उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, सामाजिक विज्ञान महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम, माजी प्राचार्य डॉ. जगदीश कानडे यांनी मार्गदर्शन केले.
समारोप कार्यक्रमास विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. डॉ. पी. आर. शिवपूजे, माजी प्राचार्य बापू अडकिने, माजी प्राचार्य डॉ सुरेश सोनी, सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक कडाळे उपस्थित होते. समारोपीय भाषणात मा. डॉ शिवपूजे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्‍यासक्रमाबरोबर स्वत:च्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यावेळी प्रशिक्षणार्थीनी अनुभव कथन केले. कार्यशाळेला सुमारे १२५ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते तर प्रशिक्षणार्थिना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अशोक कडाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मधुकर मोरे यांनी केले तर आभार प्रा. सुमंत जाधव यांनी मानले. कार्यशाळा यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यानी परिश्रम घेतले. 

वनामकृवित पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्या राष्‍ट्रीय वार्षिक कार्यशाळेचे आयोजन

अखिल भारतीय समन्‍वयित संशोधन प्रकल्‍पातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेची राष्‍ट्रीय पातळीवरील वार्षिक कार्यशाळा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथे दिनांक 30 व 31 जानेवारी रोजी आयोजित करण्‍यात आले आहे. कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता प्रशासकीय इमारत हॉल क्र 18 येथे होणार असुन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहसंचालक (कृषी अभियांत्रिकी) डॉ कांचन के सिंग व सहसंचालक (पशु विज्ञान) डॉ बी एस प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


सदरिल कार्यशाळेसाठी देशातील 9 केंद्राचे 40 शास्‍त्रज्ञ व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्‍था येथुन मान्‍यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेत कृषी क्षेत्रात पशुशक्‍तीचा योग्‍य व कार्यक्षम वापर या विषयावर देशातील शास्‍त्रज्ञ विविध संशोधन शोध निबंध सादर करणार असुन सांगोपांग चर्चा करण्‍यात येणार आहे. विशेष म्‍हणजे देशातील केवळ नऊ कृषी विद्यापीठांमध्‍ये सदर प्रकल्‍प कार्यन्‍वीत असुन राज्‍यात हा प्रकल्‍प केवळ परभणी कृषि विद्यापीठात आहे. कार्यशाळेचे नियोजन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली संशोधन अभियंता प्रा स्मिता सोलंकी व इतर शास्‍त्रज्ञ करत आहेत. 

शेतीत द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे....शिक्षण संचालक डॉ विलास पाटील

वनामकृवित सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभाग आणि वनस्‍पती विकृ‍तीशास्त्र यांचे संयुक्‍त विद्यमाने दिनांक 23 जाने ते 25 जाने दरम्‍यान द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटक उत्‍पादन तंत्रज्ञान यावर सुशिक्षीत बेरोजगार युवकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. शिबीराचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या हस्‍ते झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ डि एन गोखले, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ डि एन धुतराज, डॉ के टी आपेट, प्रशिक्षण समन्‍वयक डॉ ए एल धमक आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ विलास पाटील महणाले की, शाश्‍वत शेती उत्‍पादनासाठी द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. सुशिक्षीत बेरोजगार युवकांना द्रावणीय जीवाणु खते व जैविक घटकांची निर्मिती उद्योग करण्‍यास वाव आहे. सदरिल प्रशिक्षण हे सुशिक्षीत बेरोजगारांना स्‍वयंरोजगार उपलब्‍ध करून देणारे साधन ठरेल असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले. प्राचार्य डॉ गोखले यांनी ही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात 25 सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला होता. समारोपीय कार्यक्रमात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले यांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. प्रशिक्षार्थी गोविंदराज भाग्नगरे व अनिल आडे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ स्‍वाती झाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ सुरेश वाईकर, डॉ अडकिणे, प्रा अनिल मोरे, श्रीमती महावलकर, श्रीमती सवंडकर आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, January 23, 2018

कृषि विद्यापीठातील सर्व पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी सामा‍ईक प्रवेश परीक्षा अनिवार्य

महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांनी राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सर्व पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशास सन 2018 - 19 या शैक्षणिक वर्षापासुन सामाईक प्रवेश परीक्षा अनिवार्य केली आहे. राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत कृषी, उद्यानविद्या, वनशास्‍त्र, सामाजिक विज्ञान (गृहविज्ञान), कृषी अभियांत्रीकी, अन्‍नतंत्र, कृ‍षी जैवतंत्रज्ञान, मत्‍स्‍य विज्ञान, पशुसंवर्धन व व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन या पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आयो‍जीत केलेली एमएचटी - सीईटी (MHT-CET) ही सामाईक प्रवेश परीक्षा सन 2018 - 19 या शैक्षणिक वर्षापासुन अनिवाय केली आहे. प्रवेश इच्‍छुक विद्यार्थ्‍यांनी राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने आयोजित केलेली एमएचटी-सीईटी (MHT-CET) किंवा JEE/NEET/AIEEA-UG (भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली यांच्‍या मार्फत घेण्‍यात येणारी परीक्षा All India Entrance Examination Test for Admission) यापैकी कोणतीही एक सामाईक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक राहील.
   सदरिल सामाईक प्रवेश परीक्षांमध्‍ये प्राप्‍त झालेल्‍या गुणाच्‍या 70 टक्के गुण व पात्रता परिक्षेमध्‍ये (म्‍हणजे इयत्‍ता 12 विज्ञान परीक्षेमध्‍ये) प्राप्‍त झालेल्‍या गुणाच्‍या एकुण 30 टक्के गुण तसेच कृषी परिषदेच्‍या सद्यस्थितीतील तरतुदी / नियमानुसार इतर अधिभार यांच्‍या आधारावर उमेदवाराची गुणवत्‍ता निश्चित करण्‍यात येईल. प्रवेश प्रक्रियेबाबत इतर नियम व कार्यपध्‍दती प्रचलीत पध्‍दतीप्रमाणे असतील. राज्‍य सामाईक परीक्षेचे वेळापत्रक व माहितीपुस्‍तीका www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2018 या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे तरी इच्‍छुक उमेदवारांनी सदरील संकेतस्‍थळावर सामा‍ईक प्रवेश परीक्षेकरिता अर्ज दाखल करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता (कृषि) डॉ विलास पाटील यांनी केले आहे.

Saturday, January 20, 2018

वनामकृवितील मृद विज्ञान व‍ कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राच्‍या विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागात मध्‍यवर्ती उपकरण केंद्राचे विस्‍तारीकरण करण्‍यात आले असुन दिनांक 20 जानेवारी रोजी सदरिल विस्‍तारीत कक्षाचे उदघाटन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ एस के चौधरी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्‍माइल आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठातील आचार्य पदवी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना संशोधन कार्यासाठी सदरिल उपकरण केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. मृद विज्ञान व कृषि रसायनशास्‍त्र विभागातर्फे माती, पाणी, ऊती विषयक विविध घटकाचे रासायनिक पृथ: क्करण करण्‍याची नियमित गरज भासते, त्‍या दृष्‍टीकोनातुन सदरिल कक्षाचा उपयोग होणार आहे. तसेच शेतक-यांचे माती व पाणी नमुने तपास‍णीसाठीही याचा उपयोग होणार आहे.

Wednesday, January 17, 2018

वनामकृवित शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

मराठवाडयातील अनेक जिल्‍हातील शेतक-यांचा सहभाग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व आत्‍मा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दि. 12 जानेवारी रोजी शेती आधारीत तुती रेशीम उद्योग प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलू हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर होते. व्‍यासपीठावर डॉ. यु.एन. आळसे, डॉ. ए. एस. जाधव, डॉ. बी. व्हि आसेवार, आत्मा प्रकल्प संचालक श्री. एम. एल. चपळे, केंद्रिय रेशीम मंडळाचे श्री. ए.जे. कारंडे, डॉ सी बी लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.   
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयातील विविध पीकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढत असून पीक पध्दतीत बदल करणे आवश्यक आहे. शेती किफायतीशीर करण्‍यासाठी  शेतक-यांना शेती पुरक व्‍यवसाय रेशीम उद्योग निश्चितच आर्थिक स्‍थर्य प्राप्‍त करून देऊ शकतो. कर्नाटक राज्‍यातील रामनगर येथील बाजारपेठेत रेशीम कोषास चांगला भाव मिळत असुन कोषाचे एखादे पिक गेले तरी वर्ष वाया जाण्‍याची भीती नाही. प्रत्‍येक शेतक-यांनी दिड - दोन एकर क्षेत्रावर तुती लागवड करून इतर पीकाच्या तुलनेत वर्षाकाठी रेशीम कोषाचे 6 ते 7 पीके घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.
संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी मराठवाडा तुती रेशीम उद्योगात तुती लागवड व कोष उत्पादनात राज्यात आघाडीवर असल्याचे सांगुन विद्यापीठातंर्गत मराठवाडयातील सर्व जिल्हयात कृषि विज्ञान केंद्रामार्फत रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेणार असल्याचे जाहिर केले.
तांत्रिक सत्रात डॉ. यु. एम. आळसे यांनी कृषि उद्योजकतेच्या बाबत पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाडयातील शेतकरी मागे असून रेशीम उद्योगाच्या संधीचा फायदा घेण्याचे सांगितले. श्री. ए. जे. कारंडे यांनी रेशीम शेती व कीटक संगोपनातील तांत्रीक मार्गदर्शन केले तर प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी श्री एम एल चपळे शेतक-यांनी रेशीम गट शेतक-यानी स्थापन करुन फायदा घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ सी बी लटपटे यांनी केले. कार्यक्रमास लातूर, बीड, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयातून 150 शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी जे एन चौडेकर, ए. बी काकडे, बालासाहेब गोंधळकर, रुपा राऊत, शेख सलीम आदीसह अनुभव आधारित शिक्षण कार्यक्रमाच्‍या विद्यार्थींनी परिश्रम घेतले.

वनामकृवितील स्‍पर्धा मंच व परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने स्‍पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील स्‍पर्धा मंच व परभणी कृषि महाविद्यालय यांचे संयुक्‍त विद्यमाने राष्‍ट्रीय युवा दिनाने औजित्‍य साधुन दिनांक 13 जानेवारी रोजी स्‍पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी पुणे येथील ज्ञानदीप अॅकॅडमीचे संचालक श्री महेश शिंदे, नायब तहसिलदार डॉ निकेतन वाळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री पंडित रेजितवाड, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, डॉ सी बी लटपटे, डॉ एस एन बडगुजर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करतांना श्री महेश शिंदे म्‍हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांनी कोणत्‍याही प्रकारचा न्‍युनगंड न बाळगता नियोजनबध्‍द अभ्‍यास करावा. कठोर परिश्रमाला योग्‍य नियोजनाची जोड दिली तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीही स्‍पर्धा परिक्षेत मोठया प्रमाणात यश प्राप्‍त करू शकतात.
याप्रसंगी नायब तहसिलदार डॉ निकेतन वाळे, सहाय्यक पोलिस निरिक्षक श्री पंडित रेजितवाड, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींनीही मार्गदर्शन केले. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ डि एन गोखले यांच्‍या मार्गदर्शनाने घेण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल इंगळे यांनी केले तर आभार चंद्रकांत दाडगे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठ विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धा मंचाचे अध्‍यक्ष कैलास भाकड व सर्व सदस्‍यांनी परिश्रम घेतले.

मौजे उमरा (जि. हिंगोली) येथे वनामकृवितील सामाजिक विज्ञान महाविद्यालय विकसीत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सामाजिक विज्ञान महाविद्यालयातील खिल भारतीय सन्‍मवयीत संशोधन प्रकल्‍पाच्‍या वतीने विविध विभागाने विकसित केलेल्या शेतकरी महिलांना उपयुक्‍त कृषि तंत्रज्ञानाचे भव्य प्रदर्शन मौजे उमरा (ता. कळमणुरी जि. हिंगोली) येथे दि. 15 जानेवारी रोजी भरविण्यात आले. सदरिल प्रदर्शन गावातील उगम ग्राम विकास संस्थेच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त बचत गटाच्या शेतकरी महिला व पुरुष यांच्या करीता आयोजित करण्‍यात आले होते. तांत्रिक सत्रा विद्यापीठ शास्‍त्रज्ञा प्रा. निता गायकवाड यांनी ‘बालकांच्या सर्वांगिन विकासात मातांची भूमिका’ तसेच ‘गृहविज्ञान विकसीत तंत्रज्ञानाचा शेतकरी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी उपयोग’ या विषयी मार्गदर्शकरून प्रात्याक्षिके दाखविले. कार्यक्रमास शेतकरी महिला व शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. यशस्‍वीतेसाठी उगम ग्राम विकास संस्थेचे सदस्‍य व वरिष्ठ संशोधन सहाय्यक रुपाली पतंगे यांचे सहकार्य लाभले.

Friday, January 12, 2018

राष्‍ट्र व समाज घडविण्‍यासाठी चारित्र्य संपन्‍न युवक घडवावे लागतील......समाज प्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर

वनामकृविच्‍या परभणी कृषि महावि़द्यालयात रासेयोच्या वतीने स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी
राष्‍ट्र व समाज घडविण्‍यासाठी देशात चारित्र्य संपन्‍न युवक घडवावे लागतील, यासाठी युवक व बालकांवरील संस्‍कार महत्‍वाचे असुन आईच हे संस्‍कार देऊ शकते. जिजाऊ मातेच्‍या संस्‍कारातुन छत्रपती शिवाजी घडले. व्‍यक्‍तीचे जीवन सुंदर करण्‍यासाठी व्‍यक्‍ती चारित्र्य संपन्‍न, र्निव्‍यसनी व प्रामाणिक पाहिजे, असे प्रतिपादन समाज प्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजनेच्‍या वतीने स्‍वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्‍ट्रीय युवक दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक 12 जानेवारी रोजी एकविसाव्‍या शतकात युवकांची भुमिका याविषयावर व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे हे प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ सय्यद इस्‍माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रबोधनकार डॉ उध्‍दव गाडेकर पुढे म्‍हणाले की, राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीताच्‍या माध्‍यमातुन समाजातील अनेक समस्‍यावर उपाय असुन प्रत्‍येक तरूणांनी ग्रामगीतेचे वाचन करावे. देशाचा विकास करावयाचा असेल तर प्रत्‍येक गांव व प्रत्‍येक व्‍यक्‍तीचा विकास करावा लागेल. शेतक-यांच्‍या श्रमास प्रतिष्‍ठा प्राप्‍त झाली पाहिजे. चारित्रसंपन्‍न राष्‍ट्रासाठी स्‍वामी विवेकांनद व राजमाता जिजाऊ यांच्‍या विचाराचे समाजात आचरण व्‍हावे लागेल. परंपरा सोडु नका पण परिवर्तनाला विसरू नका. जगातील सर्व धर्मात माणुसकीचीच शिकवण दिली जाते.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, भारत जगातील सर्वात तरूण देश असुन या युवाशक्‍तीच्‍या जोरावर भारत जागतिक महासत्‍ता होऊ शकतो.
डॉ पी आर शिवपुजे मार्गदर्शना म्‍हणाले की, स्‍वामी विवेकानंद सारख्‍या व्‍यक्‍तींचे आदर्श युवकांनी डोळयासमोर ठेऊन आचरण करावे. ध्‍येय निश्चिती करून शिस्‍त व कठोर परिश्रम केल्‍यास यश मिळतेच. 
याप्रसंगी रासेयोच्‍या स्‍वयंसेवक सोनाली उबाळे, शुभदा खरे, पंकज घोडके आदींनीही मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा विजय जाधव यांनी केले. सुत्रसंचालन यांनी डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी रासेयोच्‍या स्‍वयंसेवक व स्‍वयंसेविका यांनी परिश्रम घेतले. 

Wednesday, January 3, 2018

बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी संघटित व्‍हावे.....महिला उद्योजिका श्रीमती कमलताई परदेशी


वनामकृवित क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जंयतीनिमित्‍त आयोजित महिला शेतकरी मेळावा संपन्‍न
वनामकृवितील महिला शेतकरी मेळाव्‍यात आयोजित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना मान्‍यवर
वनामकृवित आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर
परभणी :
कोणताही व्‍यवसाय करतांना चिकाटी पाहिजे, ती चिकाटी महिलांमध्‍ये आहे. बचत गटाच्‍या माध्‍यमातुन महिलांनी संघटित व्‍हावे, त्‍यातुन स्‍वत: व कूटुंबाचा आर्थिक विकास साधावा. राज्‍यात अनेक महिला बचत गट स्‍थापन झाली, चांगला दृष्‍टीकोन ठेऊन कार्य करणारी बचत गटे यशस्‍वीपणे प्रगती करीत आहेत, असे प्रतिपादन भांडगाव (ता. दौंड जि. पुणे) येथील अंबिका महिला औद्यागिक सहकारी संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा श्रीमती कमलताई परदेशी यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व सामाजिक विज्ञान महाविद्यालय तसेच ठ शेतकरी महीला  कृषि विभाग, महाराष्‍ट्र शासन यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक 3 जानेवारी रोजी महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. मेळाव्‍यास परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर हया प्रमुख अतिथी म्‍हणुन उपस्थित होत्‍या तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले हे होते. व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुल‍सचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती कमलताई परदेशी यांनी यशस्‍वी महिला उद्योजिका होतांनाचा अनुभव कथन करतांना म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागातील परिस्थिती बदलयाची असेल तर महिला बचत गटांनी शेतमाला प्रक्रिया उद्योगात उतरावे. मी ग्रामीण भागातील निरिक्षण शेतमजुर महिला होते, परंतु 2000 साली महिला बचत गट स्‍थापन करून आज 200 कुटूंब आम्‍ही काम करून मसाल्‍याची पदार्थ तयार करत आहोत. यशस्‍वीपणे बाजारात अंबिका मसाल्‍याची मोठया प्रमाणात विक्री करित असुन आज देशातील विविध राज्‍यात व परदेशात आम्‍हाच्‍या मालास ही मोठी मागणी होत आहे, याचे मुख्‍य कारण म्‍हणाजे मालाची गुणवत्‍ता व दर्जा. यासाठी बचत गटातील महिलांची एकजुट महत्‍वाची आहे. बचत गटातील सदस्‍यांनी सामाजिक बांधिकी म्‍हणुन सामाजिक कार्यातही भाग घ्‍यावा. विशेषत: गाव स्‍वच्‍छता अभियान व वृक्ष लागवड उपक्रमात योगदान घ्‍यावे, गरजुंना मदत करावी, असे मतही त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर आपल्‍या भाषणात म्‍हणाल्‍या की, आजही ग्रामीण भागात पुरूषप्रधान संस्‍कृती आहे, ती बदलण्‍याची गरज आहे. देशात व राज्‍यात स्‍वच्‍छतेसाठी मोठे अभियान राबविण्‍यात येत आहे, परंतु प्रत्‍येक नागरिकांनी स्‍वत:ची जबाबदारी ओळखुन योगदान दिल्‍या शिवाय यश प्राप्‍त होणे शक्‍य नाही. अनेक महिला बचत गटाच्‍या माध्‍यमातुन यशस्‍वीरित्‍या वाटचाल करित असुन श्रीमती कमलताई त्‍यातील एक आहेत. शेतमजुर ते लघुउद्योजिका कमलताईनी स्‍वत:च्‍या अनुभवाच्‍या जोरावर आज मोठे यश प्राप्‍त केले आहे.  
अध्‍यक्षीय समारोपात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, शुन्‍यातुन विश्‍व निर्माण करणा-यां महिलाकडुन इतर महिलांनी प्रेरणा घ्‍यावी. महिला बचत गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्‍यासाठी विद्यापीठ सदैव तयार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात प्रभारी प्राचार्या डॉ विजया नलावडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव यांनी केले तर आभार डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनीचे उदघाटन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तसेच शेतीभाती महिला विशेषांकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका, घडीपुस्तिका आदी प्रकाशनाचे विमोचन करण्‍यात आले. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात डॉ जयश्री झेंड यांनी शेती कामातील धोके व आरोग्‍य यावर तर डॉ आशा आर्या यांनी शेती निगडीत पूरक व्‍यवसाय व प्रा. विशाला पटनम यांनी ग्रामीण बालकांचे विकासांक वृध्‍दीगत करण्‍यात कुटुंबाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले. मेळाव्‍यास शेतकरी महिला, शेतकरी बांधव, महिला कृषि उद्योजक, अधिकारी, कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
मार्गदर्शन करतांना मा श्रीमती कमलताई परदेशी
मार्गदर्शन करतांना परभणीच्‍या महापौर मा. श्रीमती मीनाताई वरपुडकर
अध्‍यक्षीय भाषण करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले