Pages

Tuesday, January 30, 2018

शेतक-यांसाठी किफायतीशीर व उपयुक्‍त बैलचलित शेती औजार निर्मितीवर भर द्यावा लागेल ......डॉ. बी. एस. प्रकाश

वनामकृवित पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या राष्‍ट्रीय वार्षिक कार्यशाळाचे उदघाटन

राष्‍ट्रीय स्‍तरावर शेती उपयुक्‍त जनावरांची संख्‍या दिवसेंदिवस घटत आहे, भारतीय शेतक-यांची सरासरी जमीन धारण क्षमता केवळ 1.15 हेक्‍टर असुन 45 टक्के शेतक-यांकडे 0.6 हेक्‍टर पेक्षा कमी जमीन वहितीखाली आहे. या शेतक-यांचे उत्‍पादन दुप्‍पट करण्‍यावर आपणास भर द्यावा लागेल. या शेतक-यांना शेतमजुरी परवडत नाही तर दुस-या बाजुस शेतीचे यांत्रिकीकरणही करता येत नाही. तेव्‍हा या शेतक-यांसाठी किफायतीशीर व उपयुक्‍त बैललित शेती औजार निर्मितीवर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहसंचालक (पशु विज्ञानडॉ बी एस प्रकाश यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयित संशोधन प्रकल्‍पातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील वार्षिक दोन दिवसीय कार्यशाळाच्‍या उदघाटनप्रसंगी (दिनांक 30 जानेवारी) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, भोपाळ येथील डॉ एम दिन, गंगटोक येथील डॉ एस के राऊतरे, डॉ के एन अग्रवाल, अभियंता प्रा स्मिता सोलंकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ बी एस प्रकाश पुढे म्‍हणाले की, राज्‍यातील अल्‍पभुधारक शेतकरी आजही शेतकामासाठी पशुशक्‍तीवरच अवलंबुन आहेत. महाराष्‍ट्रातील देवणी व लाल कंधारी जाती हवामान बदलात तग धरणा-या असुन या पशुशक्‍तीचा वापर शेतीत कार्यक्षमरित्‍या करता येईल.  
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, मराठवाडयात अल्‍पभुधारक शेतक-यांमध्‍ये टॅक्‍टरच्‍या वापरावर मर्यादा आहेत, त्‍यामुळे शेतीत पशुशक्‍तीचा योग्‍य व कार्यक्षम वापर करावा लागेल. सद्यस्थितीत शेतीत पाणी व मजुराची कमतरता ही मुख्‍य समस्‍या असुन यासाठी कृषि संशोधन क्षेत्रात कृषि अभियंत्‍याना महत्‍वाची भुमिका बजवावी लागेल. राज्‍यात यवतमाळ जिल्‍हा किटकनाशक फवारणीमुळे अनेक शेतक-यांना प्राण गमवावे लागले. परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केले बैलजलित सौर ऊर्जेवर जालणारे फवारणी यंत्र निश्चितच उप‍युक्‍त आहे, यात फवारणी करतांना शेतक-यांचा कमीत कमी किटकनाशकांशी संबंध येतो, या यंत्राचा प्रसार करावा लागेल. 
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी केले. सुत्रसंचालक डॉ निता गायकवाड यांनी केले तर आभार प्रा स्मिता सोलंकी यांनी मानले. सदरिल कार्यशाळेसाठी देशातील कर्नाटक, हरियाणा, बिहार, उत्‍तर प्रदेश, ओरिसा, पश्चिम बंगाल, मध्‍यप्रदेश, नागालॅड आदी राज्‍यातील 9 केंद्राचे 30 शास्‍त्रज्ञ व नवी दिल्‍ली येथील अखिल भारतीय कृषी अनुसंधान परिषद व भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्‍थेतील शास्‍त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यशाळेत कृषी क्षेत्रात पशुशक्‍तीचा योग्‍य व कार्यक्षम वापर या विषयावर देशातील शास्‍त्रज्ञ विविध संशोधन शोध निबंध सादर करून विचार मंथन करणार आहेत. विशेष म्‍हणजे देशातील केवळ नऊ कृषी विद्यापीठांमध्‍ये सदर प्रकल्‍प कार्यन्‍वीत असुन राज्‍यात हा प्रकल्‍प केवळ परभणी कृषि विद्यापीठात आहे.