Pages

Friday, February 23, 2018

महाविद्यालयीन जीवनातच भावी आयुष्‍याचा पाया रचला जातो.....डॉ मंजिरी कुलकर्णी

वनामकृविच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने जालना टु युएसए व्‍हाया परभणी – जपान व्‍याख्‍यानाचे आयोजन

महाविद्यालयीन वर्ष ही विद्यार्थ्‍यांच्‍या जीवनाला दिशा देणारी असतात, महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांच्‍या भावी आयुष्‍याचा पाया रचला जातो. स्‍वत:च्‍या कोषातुन बाहेर पडा, नावीण्‍यपुर्ण गोष्‍टी शिकण्‍याची तयारी ठेवा, असे प्रतिपादन डॉ मंजिरी कुलकर्णी हिने केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी जालना टु युएसए व्‍हाया परभणी – जपान याविषयावर परभणी कृषि महाविद्यालयाची माजी विद्यार्थ्‍यींनी डॉ मंजिरी कुलकर्णी यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ डि एन गोखले, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, कक्षाचे सहअध्‍यक्ष डॉ हिराकांत काळपांडे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ मंजिरी कुलकर्णी पुढे म्‍हणाल्‍या की, विद्यार्थ्‍यांनी धरसोडवृत्‍ती ठेऊ नये, मोठी स्‍वप्‍न पाहा, योग्‍य नियोजनासोबत जिद्द व मेहनतीच्‍या बळावर नक्कीच साकार होते. महाविद्यालयीन जीवनातच चांगल्‍या गोष्‍टी संपादन करा, विद्यापीठातील मुलभुत सुविधांचा व ग्रंथालयाचा वापर करा. प्राध्‍यापकांचे व वरिष्‍ठ विद्यार्थ्‍यांचा सल्‍ला घ्‍या. महाविद्यालयीन जीवनातच व्‍यवस्‍थापन कौशल्‍य शिकण्‍याची संधी असते. कृषी अभ्‍यासक्रमात अनेक विषयाचा अभ्‍यास आहे, त्‍यामुळे कृषीच्‍या विद्यार्थ्‍यांना अनेक विषयात संधी आहेत, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
डॉ मंजिरी कुलकर्णी हिने 2008 साली परभणी कृषी महाविद्यालयातुन पदवी पुर्ण केल्‍यानंतर तामीळनाडु कृषि विद्यापीठात बॉयोटेक्‍नोलीजी मध्‍ये पपई वरील विषाणुवर संशोधन करून एम एस्‍सी पदवी प्राप्‍त केली. जपान सरकाराची शिष्‍यवृत्‍ती मिळवुन टोकीयो विद्यापीठातुन डेंगु विषाणुवर संशोधन करून पीएच डी प्राप्‍त केली, नंतर अमेरीकेतील इलिनॉय विद्यापीठातुन पोस्‍ट डॉक अभ्‍यासक्रम पुर्ण केला. विविध देश व विदेशातील परिसंवादात सहभाग नोदंवुन संशोधन लेख सादर केली. नुकतेच देशाचे पंतप्रधान जपान दौ-यावर असतांना त्‍यांच्‍याशी संवाद साधला. सध्‍या त्‍यांची टोकीओ विद्यापीठात वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ म्‍हणुन निवड झाली आहे.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, महाराष्‍ट्र व मराठवाडा विभागातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्‍यांमध्‍ये इंग्रजी भाषेबाबत न्‍युनगंड असतो, त्‍यामुळे इंग्रजी भाषावर प्रभुत्‍व मिळविण्‍यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्‍न करावेत.
प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, विद्यापीठाचे अनेक माजी विद्यार्थ्‍यी विदेशात व देशात उच्‍च पदावर कार्यरत असुन या व्‍यक्‍ती विद्यापीठाचे ऑयकॉन आहेत. विद्यापीठाच्‍या मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन कक्षाच्‍या माध्‍यमातुन त्‍यांचे व्‍याख्‍यान वेळोवेळी आयोजित करण्‍यात येईल.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्‍याचा अल्‍पपरिचय डॉ हिराकांत काळपांडे यांनी करून दिला. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा एस व्‍ही कल्‍याणकर, डॉ ए बी बागडे, डॉ एम पी वानखडे, भागवत चव्‍हाण, मनोज करंजे, अमोल सोळंके, विजय रेडडी, कैलास भाकड आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.