Pages

Saturday, March 17, 2018

वेबकास्टींग व्दारे माननीय पंतप्रधानांनी देशातील शेतकरी व कृषि शास्त्रज्ञांना केले संबोधित

वनामकृवि अंतर्गत जालना जिल्‍हातील बदनापुर येथे नवीन कृषि विज्ञान केंद्राचे पंतप्रधानाच्‍या हस्‍ते उदघाटन
नवी दिल्‍ली येथे आयोजित कृषि उन्‍नती मेळावा 2018 निमित्‍त देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिनांक 17 मार्च रोजी वेबकास्‍टींग व्‍दारे देशातील शेतकरी व कृषि शास्त्रज्ञाना संबोधित केले. सदरिल कार्यक्रमाच्‍या थेट प्रक्षेपणाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व परभणी येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात करण्‍यात आले होते. यावेळी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु, शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ पी आर देशमुख, अतिक व्‍यवस्‍थापक डॉ यु एन आळसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय पंतप्रधान आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्‍पन्‍न दुप्‍पट करण्‍याच्‍या दृष्‍टीने सरकारने अनेक योजना कार्यान्‍वीत केल्‍या आहेत. नवीन कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक राज्‍यातील शेतकरी दुध, दाळ, गहु आदीं शेतमालाचे विक्रमी उत्‍पादन घेत आहेत. कृषि उन्‍नती मेळाच्‍या माध्‍यमातुन देशातील दोन महत्‍वाच्‍या घटकांशी बोलण्‍याची संधी प्राप्‍त झाली असुन एक शेतकरी जो आपल्‍यासाठी भोजनाची सोय करतो व दुसरा कृषि शास्‍त्रज्ञ जे नवनवीन कृषि तंत्रज्ञानाची निर्मिती करतात, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात देशातील 25 नवीन कृषि विज्ञान केंद्राचे उदघाटन माननीय पंतप्रधान यांच्‍या हस्‍ते झाले, यात वनामकृवि अंतर्गत बदनापुर (जिल्‍हा जालना) येथील कृषि विज्ञान केंद्राचाही समावेश आहे. सदरिल आयोजित वेबकास्‍टींग कार्यक्रमास शेतकरी, विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी अरूणा खरवडे, अनिल तुपे, डॉ एस जी पुरी, डॉ एन एम तांबोळी आदींनी परिश्रम घेतले.