Pages

Tuesday, May 29, 2018

‘जॉईट अॅग्रेस्को’ मध्ये वनामकृविच्या 3 नवीन वाण, 4 कृषि यंत्र आणि 28 पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशीनां मान्यता

दापोली येथील डॉबाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात 46 वी संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची बैठक संपन्न

महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठांनी केलेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचविण्यासाठी महत्वाचा टप्पा मानल्या जाणा-या संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 46 वी बैठक दिनांक 23 ते 25 मे रोजी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात संपन्न झाली. या बैठकीमध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या खरीप ज्वारी, देशी कापुस, चिंच आदी पिकांचे प्रत्येकी एक नवीन वाण, चार कृषि यंत्र आणि 28 पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित शिफारशीनां मान्यता देण्यात आली, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दिली.

त्यांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे.
() प्रसारित नवीन वाण
1. खरीप ज्वारीचापरभणी शक्ती“ (पीव्हीके-1009) वाण
हा वाण राज्यातील खरीप ज्वारी पिकविणा-या क्षेत्रासाठी लागवडीस प्रसारीत करण्याची मान्यता देण्यात आली. हा वाण अधिक उत्पादन देणारा, लोह जस्ताचे अधिक प्रमाण असलेला असुन दाण्यावरील काळी बुरशी, खोडमाशी खोडकिडीस मध्यम सहनशील आहे.  
2. देशी कापसाचापीए–740वाण
हा वाण मराठवाडा विभागात लागवडीकरीता प्रसारीत करण्याची शिफारस करण्यात आली. हा वाण धाग्याचे सरस गुणधर्म असलेला असुन रसशोषण करणा-या किडी, जिवाणूजन्य करपा, अल्र्टनेरिया दहिया रोगास सहनशील आहे.
3. चिंच फळपिकाचा शिवाईवाण
हा वाण राज्यातील कोरडवाहू विभागासाठी प्रसारित करण्याची मान्यता देण्यात आली, हा वाण नियमीत फळे देणारा असुन अधिक उत्पादनक्षम आहे.

() नवीन कृषि यंत्रे :
1. एक बैलचलित टोकण यंत्र
वनामकृवि एक बैलचलित टोकन यंत्राची प्रसारण करण्यासाठी शिफारसीस मान्यता देण्यात आली. या टोकण यंत्राची क्षमता प्रती तास 0.189 हेक्टर एवढी असुन लहान अल्पभुधारक शेतक-यासाठी उपयुक्त आहे. हे यंत्र पिकामधील पेरणीसाठी / रिलेक्रॉपीगसाठी उपयुक्त आहे.
2. बैलचलित सरीयंत्रासहित तीन पासेचे कोळपे
वनामकृवि बैलचलित तीन पासेचे कोळपे सरीसह रुंद वरंबा सरीवरील पिकातील आंतरमशागत करण्यासाठी प्रसारीत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली. हे कोळपे बीबीएफने पेरणी केलेल्या जमिनीत कोळपणी सरी तयार करण्यासाठी उपयुक्त असुन याची क्षेत्रीय क्षमता प्रती तास 0.20 हेक्टर आहे तर गवत काढण्याची क्षमता 84 टक्के आहे. यामुळे मजुरीवरील खर्चात 60-70 टक्के बचत होते.
3. ट्रॅक्टरचलीत रुंदसरी वरंबा टोकण यंत्र तणनाशक फवारणी यंत्र
वनामकृवि ट्रॅक्टरचलीत पाच फणीच्या बीबीएफ टोकन यंत्राची पेरणी तणनाशक फवारणी करण्यासाठी प्रसारीत करण्याची शिफारशीस मान्यता देण्यात आली. या यंत्राने रुंद सरी वरंब्या वर टोकण पद्धतीने पेरणी करता येते. सोबतच तणनाशकाची (उगवणी) फवारणी करता येते. 45 अश्वशक्ती ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच ओळी बी खत पेरणी करता येते. या यंत्राची सोयाबीनसाठी प्रती तास 0.49 हेक्टर एवढी क्षमता आहे.
4. बैलचलित सौर ऊर्जावर चालणारे तणनाशक फवारणी यंत्र
वनामकृवि बैलचलीत सौर फवारणी यंत्रांची तणनाशके फवारणी करण्याकरीता प्रसारीत करण्याची शिफारस मान्य करण्यात आली. हे सौर ऊर्जावर चालत असल्याने प्रदुषणरहित फवारणी यंत्र असुन एकूण 12 नोझल्स असून एकत्रित ब्रुम प्रवाह 7.0 ते 9 लि/मि एवढा आहे. फवारणीसाठी लागणारे मनुष्यबळ, वेळ, पैशाची बचत होते. या यंत्रीची क्षमता प्रती तास 1.13 हेक्टर तर ओढण शक्ती 34.14 किलो एवढी आहे.

यासह पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत 28 मान्यता देण्यात आली, अशी माहिती संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर यांनी दिली. 

पीक उत्पादन तंत्रज्ञानावर आधारीत 28 शिफारशीसाठी क्लिक करा