Pages

Tuesday, August 7, 2018

हिंगोली व परभणी जिल्‍हयात वनामकृविच्‍या “विद्यापीठ आपल्या दारी : तंत्रज्ञान शेतावरी” उपक्रमास मोठा प्रतिसाद

उपक्रमांर्गत आजपर्यंत 30 गावात राबविण्‍यात आली गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन विशेष मोहीम
मराठवाडा विभागात झालेल्या सुरुवातीच्या समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती चांगली आहे, परंतू मागील 15-20 दिवसाच्या पावसाच्या खंडामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, अशा परिस्थितीत पिक संरक्षण याकरिता शेतक­यांच्या शेतावर भेट देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषि विभाग यांच्या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्ह्यात विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रांच्या माध्यमातून व सर्व महाविद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनांच्या सहकार्याने विशेष विस्तार उपक्रम विद्यापीठ आपल्या दारी :  तंत्रज्ञान शेतावरी राबविण्‍यात येत आहे. या उपक्रमांतर्गत कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी यांच्या वतीने कृषी तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतक­यापर्यंत पोहचविण्यासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्राकरिता तालुकास्तरीय तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रमाचा कृति आराखडा करण्यात आला आहे.
सदरील कृषि तंत्रज्ञान प्रसार कार्यक्रम कृति आराखडयामध्ये कृषि विभागाच्या समन्वयाने प्रत्येक तालुक्यातील चार गावाची निवड करण्यात आली असून आजपर्यंत विविध तालुक्यातील 30 गावामध्ये विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी प्रत्‍यक्ष शेतावर भेट देऊन व चर्चासत्राच्‍या माध्‍यमातुन मार्गदर्शन करण्यात आले. परभणी व हिंगोली जिल्हयासाठी शास्त्रज्ञांचे एकूण चार चमु करण्यात आले आहेत. या चमुचे प्रमुख डॉ. यु. एन. आळसे, डॉ. मिर्झा बेग, डॉ. एस. जी. पुरी, डॉ. सी. बी. लटपटे आदी असुन या चमुत कृषिविद्या, किटकशास्त्र, वनस्पती विकृतीशास्त्र, उद्यानविद्या आदी विषयतज्ञांचा समावेश आहे. या छोटे मेळावे, गटचर्चा, मार्गदर्शन, प्रक्षेत्र भेट अशा स्वरुपाचे कार्यक्रम घेतले जात आहेत. हंगामी खरीप पिके, ऊस, फळे, भाजीपाला, पीक संरक्षण व मुलस्थानी जलसंधारण आदी विषयावर शेतक-यांना शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे. विशेष करुन आजच्या अवर्षण परिस्थितीमध्ये पिक व्यवस्थापन, पिक संरक्षणामध्ये प्रामुख्याने गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन या विषयांवर शेतक­यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मागणी अधारित काटेकोर विस्तार शिक्षण असे या कार्यक्रमाचे स्वरुप आहे. सदरिल कार्यक्रमाचा शेतकरी बांधवांनी लाभ घेण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले आहे.