Pages

Thursday, September 27, 2018

कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्तीसाठी प्रामाणिकपणा व कठिण परिश्रमाशिवाय पर्याय नाही.......स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे

वनामकृवित आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन
महाविद्यालयीन जीवनातील चार वर्ष हे आयुष्‍यातील अतिशय महत्‍वाचे वर्ष असतात, या वर्षात स्‍वत:चे व्‍यक्‍तीमत्‍व विकसित करण्‍याची संधी असते. या मोलाच्या काळात नकारात्‍मक गोष्‍टीत वेळ न घालवता, आपले ध्‍येय निश्चित करा. अनेक विद्यार्थ्‍यी ध्‍येयविना जगतात आणि भविष्‍यात अयशस्‍वी होतात. कोणत्‍याही क्षेत्रात यश प्राप्‍त करण्‍यासाठी प्रामाणिकपणा व कठिण परिश्रमाशिवाय पर्याय ना‍ही, असे प्रतिपादन स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील मध्‍यवर्ती रोजगार मार्गदर्शन व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने नेतृत्‍व विकास व भारतीय सशस्‍त्र दलातील रोजगार संधी या विषयावर दिनांक 27 रोजी आयोजित व्‍याख्‍यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील हे होते तर विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्‍य मा. डॉ. पी. आर. शिवपुजे, कुलसचिव डॉ गजेंद्र लोंढे, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ हिराचंद काळपांडे आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होते.

स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे पुढे म्‍हणाले की, आज स्‍पर्धेचे युग आहे, स्‍वत:तील बलस्‍थाने व कमतरता ओळखा, कमतरतेवर मात करण्‍यासाठी प्रयत्‍न करा. बाहेरून कोणी कीतीही मार्गदर्शन केले तरी तुम्‍ही आतुन पेटले पाहिजे तरच यश मिळते. स्‍वत:तील आत्‍मविश्‍वास वाढला पाहिजे, त्‍यासाठी जास्‍तीत जास्‍त ज्ञान प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करा. 

अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ विलास पाटील म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्‍यांनी मर्यादांचे पालन केले पाहिजे. विद्यापीठात उपलब्‍ध सुविधांचा विद्यार्थ्‍यींनी चांगला उपयोग करावा व आपले करियर घडवावे. स्क्वाड्रन लिडर श्री प्रकाश शिंदे यांच्‍या बाबत विद्यापीठास सार्थ अभिमान असुन त्‍यांच्‍या सारखे अनेक विद्यार्थ्‍यी विद्यापीठात घडावेत, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कक्षाचे उपाध्‍यक्ष डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी केले. सुत्रसंचालन डॉ जयकुमार देशमुख यांनी केले तर आभार डॉ पपिता गौरखेडे यांनी मानले. कार्यक्रमात विद्यार्थ्‍यांच्‍या करिअरच्‍या दृष्‍टीने विविध शंकाचे निरासरन श्री प्रकाश शिंदे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

श्री प्रकाश शिंदे हे भारतीय वायुसेनेत स्क्वाड्रन लिडर म्‍हणुन कार्यरत असुन कुंटूबाच्‍या हलाखीच्या परिस्थितीत परभणी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातुन २००९ साली बी. टेक. पदवी पुर्ण केली. कृषि महाविद्यालयाच्‍या २००८ बॅचचे राष्‍ट्रीय छात्र सेनेचे ते छात्रसैनिक होत. देशाचे माननीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्‍या मराठवाडा दौऱ्याप्रसंगी विमानाच्या वैमानिक पथकात ही त्‍यांनी कार्य केले असुन गेल्‍याच आठवडयात त्‍यांना माननीय पंतप्रधानासोबत काही वेळ संवाद साधण्‍याची संधी त्‍यांना प्राप्‍त झाली होती.