छत्रपतींचा इतिहास हा केवळ
लढाईचा इतिहास नव्हता, तो एक परिवर्तनाचा इतिहास होता. ते धर्मयुध्द नव्हते, स्वराज्य
निर्माण करण्यासाठी छत्रपतींनी लढाय्या केल्या. आज ज्ञान ही जगातील सर्वात मोठी शक्ती
असुन आपणास ज्ञान व विचारांची लढाई लढावी लागणार आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते
डॉ श्रीमंत कोकाटे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी
कृषि महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 28 सप्टेंबर रोजी गणेश उत्सव 2018 निमित्त ‘नवी दिशा -
नवी वाटा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य
डॉ डि एन गोखले होते तर व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ सय्यद ईस्माईल, डॉ जी एम
वाघमारे, डॉ जे व्ही ऐकाळे, डॉ पी आर देशमुख, डॉ आर पी कदम, गणेश उत्सवाचे अध्यक्ष
रितेश नरहरे, उपाध्यक्ष महेश सोनटक्के आदी उपस्थित होते.
डॉ श्रीमंत कोकाटे पुढे म्हणाले
की, दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांकडे वसुलीसाठी तगदा लावु नका. शेतक-यांच्या
भाजीच्या देठालाही हात लावु नका, लढाईत शुत्र मुलुखातील शेतक-यांचे नुकसान होऊ
देऊ नका अशी सक्त ताकीत देणारे शिवाजी राजे हे शेतक-यांचे राजे होते. आज अनेक
क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी अग्रेसर आहेत. अनेक महाराष्ट्रीयन देशात
व जगात नवनिर्मितीचे काम करित आहेत, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो आहे. भाषिकवाद,
प्रांतीकवाद व धार्मिकवादात पडु नका. केवळ नौकरी मिळविण्यासाठीच शिक्षण ही व्याख्या
बदला, उद्योजक व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक
डॉ जे व्ही एकाळे यांनी केले तर प्रमुख व्यक्तांचा परिचय कार्तिक जाधव यांनी
करून दिला. सुत्रसंचालन संतोष घ्यार यांनी केले तर आभार आकाश थिटे यांनी मानले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने
उपस्थित होते.