Pages

Thursday, November 15, 2018

दुष्‍काळात पशुधन व फळबाग वाचविण्‍यासाठीचे कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचवा ..... कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण

वनामकृवित दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर कृषी विस्‍तार कार्यक्रमांचा कृ‍ती आराखडा बैठक संपन्‍न
मराठवाडयातील आठही जिल्‍हयात कमी पर्जन्‍यामुळे दुष्‍काळाची परिस्थिती निर्माण झाली असुन पाण्या अभावी कमी क्षेत्रावर रबी पिकांची लागवड झालेली आहे. परंतु ज्‍या शेतक-यांकडे फळबागा आहेत, ते वाचविण्‍यासाठी विद्यापीठाकडील उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्‍यासाठी कृषि विभागाच्‍या सहकार्याने फळबाग वाचविण्‍याचे अभियान हाती घ्‍यावे लागेल, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी केले. मराठवाडयातील दुष्‍काळ परिस्थितीत शेतीत करावयाच्‍या प्रतिबंधात्‍मक उपाय योजना व उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा कृषि विस्‍तार कार्यक्रमाचा कृ‍ती आराखडा निश्चित करण्‍यासाठी दिनांक 14 नोव्‍हेंबर रोजी विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते, या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. बैठकीस शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री विनोद गायकवाड, परभणी जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री बी आर शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, खरिप हंगामात कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी कृषी विभाग व विद्यापीठाच्‍या वतीने राबविण्‍यात आलेला विस्‍तार कार्यक्रमामुळे ब-याच अंशी गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण मिळविण्‍यात यश आले. याच प्रकारे दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभुमीवर पुढील काळात पशुधन वाचविणे व चारा व्‍यवस्‍थापन यावर देखिल तंत्रज्ञान विस्‍ताराची मोहिम विद्यापीठ हाती घेणार आहे. या परिस्थितीत फळबागा वाचविण्‍यासाठी विद्यापीठाकडे कमी खर्चिक तंत्रज्ञान उपलब्‍ध आहे. तसेच उपलब्‍ध सोयाबीन किंवा इतर पिकांच्‍या अवशेषांपासुन पोषक चारा निर्मितीचे तंत्रज्ञान, हायड्रोपोनिक्‍स, अझोला निर्मिती तंत्रज्ञानाचा प्रसार शेतक-यांमध्‍ये विविध माध्‍यमामार्फत शास्‍त्रज्ञांनी करावा, असा सल्‍ला देऊन विद्यापीठातील शंभर हेक्‍टर प्रक्षेत्रावर चारापिकांची लागवड करण्‍याचे निर्देशही त्‍यांनी अधिका-यांना दिले.
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या विविध घटक व संलग्‍न महाविद्यालयात जेथे पाणी उपलब्‍ध आहे तेथील प्रक्षेत्रावर चारापिकांची लागवडीसाठी निश्चित असे उदिदष्‍ट देण्‍यात येईल असे सांगितले. तसेच विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले म्‍हणाले की, दुष्‍काळ परिस्थितीत शेतीतील प्रतिबंधात्‍मक उपायाबाबत आकाशवाणी, दुरदर्शन, इलेक्‍ट्रॉनीक व छापील माध्‍यमे, समाज माध्‍यमांचा वापर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शनाकरिता वापर करण्‍याचा सल्‍ला दिला.  
सदरिल बैठकीस विद्यापीठांतर्गत असलेले मराठवाडातील विविध संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, विभागीय कृषिविद्यावेत्‍ता, विविध महाविद्यालये येथील शास्त्रज्ञ, विषय तज्ञ, कृषि विस्‍तारक, अधिकारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. बैठकीत करण्‍यात आलेल्‍या चर्चाच्‍या आधारे दुष्‍काळ परिस्थिती उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी विद्यापीठ लवकरच धडक कृती कार्यक्रम राबविणार असल्‍याचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी सांगितले.