Pages

Thursday, February 14, 2019

वनामकृवितील एलपीपी स्कूलचे विद्यार्थी गोल्डन व सिल्व्हर स्टार्स प्रमाणपत्राने सन्मानित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या सामूदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व अभ्यास विभागाच्‍या एलपीपी स्कूल मधील अत्‍युत्‍कृष्‍ट ठरलेल्‍या विद्यार्थ्‍यांना गोल्डन स्टार प्रमाणपत्र तर उत्कृष्‍ट ठरलेल्‍या विद्यार्थ्‍यांना सिल्व्हर स्टार प्रमाणपत्र देऊन विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्‍यात आले. दर्जेदार बालशिक्षण देणारे एलपीपी स्कूलमध्ये विद्यार्थी तथा त्यांच्या पालकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बालविकास शास्त्रज्ञ व विभाग प्रमुख प्रा. विशाला पटनम यांनी एलपीपी स्कूलमधील जे विद्यार्थी सर्वांगीण विकासाच्या सर्व घटकांच्या मूल्यमापनात म्हणजेच त्यांच्या शारीरि, क्रियात्मक, बौध्दिक, वाचा, भाषा, सामाजिक, भावनात्मक व नैतिक विकास तथा त्यांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाशी निगडीत क्षमतांसाठी अत्‍युत्‍कृष्‍ट ठरले त्यांना गोल्डन स्टार प्रमाणपत्र तर जे विद्यार्थी उत्कृष्‍ट होते त्यांना सिल्व्हर स्टार प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. एलपीपी स्कूलमधील एकूण 125 विद्यार्थ्‍यांपैकी 63 विद्यार्थ्‍यांना गोल्डन स्टार आणि 62 विद्यार्थ्‍यांना सिल्व्हर स्टार प्राप्त झाले. पालकांना त्यांच्या पाल्याचा उच्चतम सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने गत चार वर्षापासून एलपीपी स्कूलमध्ये हा नावीण्यपूर्ण उपक्रम राबविण्‍यात येतो. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी मानव विकास विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.