Pages

Friday, March 29, 2019

सकारात्‍मक दृष्‍टीकोनच यशस्‍वी जीवनाचा पाया.....प्रा कुशाल राऊत

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात दोन दिवसीय व्‍यक्‍तीमत्‍व विकास कार्यशाळा संपन्‍न
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या रोजगार व समुपदेशन कक्षाच्‍या वतीने दिनांक 26 व 27 मार्च रोजी विद्यार्थ्‍यांकरिता व्‍यक्‍तीमत्‍व विकासावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल कार्यशाळेत पुणे येथील काम्‍युनीकेअर संस्‍थेचे संचालक प्रा कुशाल राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्या हस्ते करण्‍यात आले, यावेळी प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, डॉ के व्‍ही देशमुख, डॉ पी आर झंवर, डॉ आर व्‍ही चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना प्रा कुशाल राऊत म्‍हणाले की, सकारात्‍मक दृष्‍टीकोनच यशस्‍वी जीवनाचा पाया असुन महाविद्यालयीन जीवनात जाणीवपुर्वक विद्यार्थ्‍यांनी यासाठी प्रयत्‍नशील असले पाहिजे असे सांगुन त्‍यांनी नेतृत्‍वगुण, नौकरी करिता मुलाखतीची तयारी, बायोडाटा तयार करणे, संवाद कौशल्‍य, सादरीकरण कौशल्‍य आदी विषयावर प्रात्‍यक्षिक व खेळाच्‍या माध्‍यमातुन प्रशिक्षण दिले.
अध्‍यक्षीय समारोत शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांनी जीवनात यशस्‍वीतेसाठी कोणताही शार्टकट नसतो, आपला मार्ग आपण निवडुन कठोर परिश्रम घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी परभणी कृषि महाविद्यालय विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी कटिबध्‍द असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ एस एल बडगुजर यांनी केले. कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्‍यी व विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.