Pages

Saturday, April 27, 2019

वाचनामुळे पराभव पचविण्‍याचे सामर्थ्‍य प्राप्‍त होते....कुलगूरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृह अभ्‍यासिका केंद्राचे उदघाटन

संघर्षातुन यशस्‍वी झालेल्‍या व्‍यक्‍तीचे चरित्र वाचा, वाचनाने विचार प्रगल्‍भ होतात, वाचनामुळे पराभव पचविण्‍याचे सामर्थ्‍य आपणास प्राप्‍त होते. वाचनाची गोडी लावा, असा सल्‍ला कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात अभ्‍यासिका केंद्राचे उदघाटन दिनांक 26 एप्रिल रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, त्‍या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम, विद्यार्थ्‍यी प्रतिनिधी अभिनव काटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगूरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, आज महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांना नौकरीसाठी जीवघेणी स्‍पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. काही विद्यार्थ्‍यांमध्‍ये अपयशामुळे नैराश्‍य येते, परंतु अपयशाने खचुन जाऊ नका. स्‍वत:च्‍या कर्तुत्‍वावर विश्‍वास ठेवा, कोणताही शार्टकट शोधु नका. सेवाक्षेत्रात नौकरी व व्‍यवसायाच्‍या अनेक संधी आहेत. नियती कष्‍टाचे फळ नेहमीच भरभरून देते. जीवनात चढउतारात होत राहतात, पराभवातच उज्‍वल आयुष्‍याच्‍या संधी दडलेल्‍या असतात. वसतीगृह तेथे अभ्‍यासिका या उपक्रमामुळे वसतीगृहात अभ्‍यासासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होईल, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  
शिक्षण संचालक डॉ विलास पाटील आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, कृषि विद्यापीठातुन आज अनेक विद्यार्थ्‍यी स्‍पर्धा परिक्षेत उर्त्‍तीण होऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत, परंतु ज्‍या संस्‍थेमुळे आपण मोठे झालो, त्‍या संस्‍थेच्‍या हिताचे वेळोवेळी भान ठेवावे. विद्यापीठातील स्‍पर्धामंच व अभ्‍यासिका अधिकाधिक वृध्‍दींगत करण्‍यासाठी आपलाही वाटा देण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.  
याप्रसंगी कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने अभ्‍यासिकाकरिता स्‍पर्धापरिक्षेकरिता उपयुक्‍त अशी विकत घेण्‍यात आलेल्‍या दीड लाख रूपयांच्‍या पुस्‍तकांचा समावेश असलेल्‍या पुस्‍तक कक्षाचेही उदघाटन करण्‍यात आले. तसेच सन 2018-19 मध्‍ये स्‍पर्धपरिक्षेत यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार माननीय कुलगूरू यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला.
प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी विद्यार्थ्‍यांना अभ्‍यासाकरिता विविध सुविधा पुरविण्‍याकरिता परभणी कृषि महाविद्यालय नेहमीच प्रयत्‍नशील असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाधान चोपडे यांनी केले तर आभार स्‍वप्‍नील भोसले यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.