Pages

Friday, June 14, 2019

वनामकृवितील किटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण संपन्‍न

येत्‍या हंगामात औरंगाबाद, परभणी व नांदेड येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळेत व वनामकृवितील विभागात होणार ट्रायकोकार्डची निर्मिती
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या कृषि किटकशास्‍त्र विभागातील परोपजिवी किटक संशोधन योजना व कृषि विभाग महाराष्‍ट्र शासन यांच्‍या संयुक्‍त विदयमाने क्रॉपसॅप प्रकल्‍प अंतर्गत जैविक घटक, त्‍यांची निर्मिती व किड व्‍यवस्‍थापनातील उपयुक्‍तता याबाबतचे एक दिवसीय प्रशिक्षण कृषि किटकशास्‍त्र विभाग येथे दिनांक १२ जुन रोजी संपन्‍न झाले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. प्रदिप इंगोले हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्‍तम झंवर, जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळाचे प्रभारी अधिकारी श्री. बबन वाघ आदीची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात डॉ. प्रदिप इंगोले म्‍हणाले की, शेतक-यांमध्‍ये पिकांवरील किड व्‍यवस्‍थापनात जैविक पध्‍दतीबाबत जागरूकता होत आहे, परंतु जैविक निविष्‍ठांची योग्‍य वेळी उपलब्‍धता होत नाही कापुस पिकात ट्रायकोकार्डचा वापर केल्‍यास निश्चितच शेतक-यांना बोंडअळी व्‍यवस्‍थापन चांगला प्रकारे करता येईल. प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी ट्रायकोकार्डची निर्मिती करून येणा-या हंगामात शेतक-यांसाठी उपलब्‍ध करावेत असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर मार्गदर्शनात म्‍हणाले कि, परोपजिवी किटक संशोधन योजनेव्‍दारे शेतक-यांना मोठया प्रमाणात ट्रायकोकार्डची उपलब्‍धता करुन देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल व त्‍याव्‍दारे कमी खर्चात अधिक प्रभावीपणे गुलाबी बोंडअळीचा शेतकरी व्‍यवस्‍थापन करु शकतील.
प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी केले. प्रशिक्षणात डॉ. एम. एम. सोनकांबळे, डॉ. बी. व्‍ही. भेदे, डॉ. एस. एस. धुरगुडे, डॉ. ए. जी. बडगुजर आदींनी तांत्रिक सादरीकरण करुन ट्रायकोकार्ड निर्मितीची माहिती प्रशिक्षणार्थींना प्रात्‍याक्षिकाद्वारे दिली. वनस्‍पती विकृतीशास्‍त्र विभागात बायोमिक्‍स, ट्रायकोडर्मा व जैविक बुरशी निर्मितीचे प्रात्‍याक्षिक करुन दाखविण्‍यात आले. सदरिल प्रशिक्षणात शासकीय जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा येथील अधिकारी व कर्मचारी, कृषि विज्ञान केंद्रातील शास्‍त्रज्ञ, विदयापीठातील क्रॉपसॅप प्रकल्‍पातील जिल्‍हा समन्‍वयक, शास्‍त्रज्ञ आदींनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला होता. येत्‍या हंगामात औरंगाबाद, परभणी व नांदेड येथील जैविक किड नियंत्रण प्रयोगशाळ व विद्यापीठातील कृषि किटकशास्‍त्र विभागात ट्रायकोकार्डची निर्मिती करण्‍यात येणार आहे.