Pages

Thursday, June 20, 2019

बेजबाबदार लैगिंकता कुंटूबाचे व समाजाचे स्‍वास्‍थ बिघडवित आहे......ज्येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग

वनामकृवित तारूण्‍यभान जीवन शिक्षण यावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

चांगला समाज निर्माण करण्‍यासाठी माणसामधील लैगिंक स्‍वास्‍थ जपण्‍याची गरज आहे. तरूण-तरूणी मध्‍ये लैगिंक शिक्षणाची गरज असुन बेजबाबदार लैगिंकता कुंटूबाचे व समाजाचे स्‍वास्‍थ बिघडवित आहे, असे प्रतिपादन ज्येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महावि़द्यालयाच्‍या वतीने दिनांक 20 ते 22 जुन दरम्‍यान तारूण्‍यभान जीवन शिक्षण यावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले, कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर श्रीमती उषाताई ढवण, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ज्येष्‍ठ समाजसेविका पद्मश्री मा डॉ राणी बंग पुढे म्‍हणाल्‍या की, आज तरूणां-तरूणीमधील व्‍यक्‍तीमत्‍वातील मुलभुत कच्‍ची बाजु लैंगिकता आहे. तरूण मुलां-मुलींमध्‍ये लैंगिकतेबाबत अनेक गैरसमज आहेत, परंतु या गोष्‍टीवर कोठेही संवाद होत नाही. याबाबत अवैज्ञानिक व खोटी माहिती आहे. आज इंटरनेटच्‍या दुनियेत, आभासी जगात तरूण वावरत आहे. कुटुंबातील संवाद कमी होत आहे. अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण होत आहेत. काहीजण नैराश्‍यात आत्‍महत्‍याही करित आहेत, आत्‍महत्‍या हा पलायनवाद आहे. जीवनात संकटे येत असतात, संकटे ही माणसांचा मजबुत बनवतात. जीवनातील आनंद कशात आहे, हेच माणसाला समजत नाही, जीवनातील आनंद निघुन जात आहे. माणुसपण हरवत आहे, व्‍यसनाधिनता वाढत आहे. आजही पुरूषप्रधान संस्‍कृती आहे, स्‍त्री ही उपभोगाची वस्‍तु नाही, स्‍त्रीचा सन्‍मान करा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय भाषणात कुलगूरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, महाविद्यालयात अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम हे विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्‍व विकासासाठी घेतली जातात, परंतु जीवनातील दुर्लक्षीत असा लैगिंकता याविषयी कोठेही संवाद होत नाही, तरूणाईच्‍या उबंरडयावर अनेकजण भरकटतात, व्‍यक्‍तीमत्‍व विकासातील दुर्लक्षीत अंगाबाबत संवाद होणे गरजेचे आहे, सशक्‍त जीवन जगण्‍यासाठी मा डॉ राणी बंग यांच्‍या सर्च फाउंडेशनचे कार्य निश्चितच तरूणामध्‍ये याबाबतीत मोठी जागृती करीत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ संदिप बडगुजर यांनी मानले. तारूण्‍यभान या तीन दिवसीय कार्यशाळेत सादरिकरण, प्रात्‍याक्षिक व विविध खेळांच्‍या माध्‍यमातुन तरूणांना जीवन शिक्षण देण्‍याचा उपक्रम सर्च फाउंडेशन करणार आहे. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थ्‍यी-विद्यार्थ्‍यींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते.