देशातील
एकमेव डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सेलन्स
कृषी उत्पादकता
वाढीसाठी भारतीय शेतीतील रोबोट,
ड्रोन व स्वयंचलित यंत्राची उपयुक्तता प्रशिक्षणाव्दारे समजुन होणार वापर
जागतिकस्तरावर
प्रगत देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित
यंत्राचा वापर वाढत असुन डिजिटल शेती करून अधिक व दर्जेदार कृषी उत्पादन कार्यक्षमरित्या
शेतकरी करित आहेत, यात कृत्रिम बुध्दीमत्ता व
‘इंटरनेट ऑफ थिंग्स’
यांचाही
वापर होत आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान भारतीय शेती व शेतक-यांच्या परिस्थितीस अनुकुल
बनविण्याची गरज असुन त्यासाठी लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्ययबळाची निर्मिती
करावी लागणार आहे. हा दृष्टीकोन ठेऊन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने
‘कृषि उत्पादकता वाढीसाठी यंत्रमानव, ड्रोन व
स्वयंचलित यंत्राव्दारे डिजिटल शेती‘ यावरील
सेंटर ऑफ एक्सेलन्स प्रशिक्षण प्रकल्प नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेस
सादर केला होता. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत
या प्रकल्पास मान्यता दिल्याची राष्ट्रीय संचालक डॉ राकेशचन्द्र अग्रवाल यांनी नुकतेच
विद्यापीठास पत्राव्दारे कळविले आहे. अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प
देशातील एकमेव प्रशिक्षण प्रकल्प ठरणार असुन विद्यापीठात आदर्श असे प्रगत कृषि
विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (CAAST – Centre for Advanced
Agricultural Science & Technology) स्थापन करण्यात येणार आहे.
सदरिल प्रकल्प विद्यापीठाचे
कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण व माजी कुलगुरू मा डॉ बी. व्यंकटेशवरुलू यांच्या प्रेरणेने
तसेच माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, शिक्षण संचालक
डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे प्रमुख
शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे व प्रकल्प समन्वयक डॉ राजेश कदम यांनी सादर केला होता. या
प्रकल्पाची प्राथमिक संकल्पना प्रमुख शास्त्रज्ञ डॉ गोपाळ शिंदे यांची असुन
शास्त्रयुक्त चाचणी व अन्वेषण हे उच्चस्तरीय सोळा सदस्यीय कुलगुरु समिती व्दारे
झाले आहे.
हा प्रशिक्षण प्रकल्प सन
२०१९ ते २०२२ या तीन वर्ष कालावधी करीता संकल्पीत असुन यास अठरा कोटी रूपयांचा निधी
मंजुर करण्यात आला आहे, यात पन्नास
टक्के वाटा जागतिक बॅक व पन्नास टक्के वाटा हा भारत सरकार कडुन भारतीय कृषी संशोधन
परिषदेच्या माध्यामातुन प्राप्त होणार आहे. यात यंत्रमानव (रोबोट),
ड्रोन
व स्वयंचलीत सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण
करून विद्यार्थ्यी व संशोधक प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार
आहे. या केन्द्राव्दारे कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थी डिजिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत
नेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
यासाठी परभणी कृषी विद्यापीठाने
अॅग्री-रोबोट्स, अॅग्री-ड्रोन्स व अॅग्री-स्वयंचलित
यंत्राच्या तंत्रज्ञानात्मक देवाणघेवाण करिता
जगातील अग्रगण्य विद्यापीठाशी सामंजस्य करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट
युनिव्हर्सिटी तसेच स्पेन, युक्रेन व
बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी
संस्थेचे नॉलेज सेंटर म्हणून सहकार्य लाभणार आहे.
याप्रशिक्षण केंद्रांचे कार्य
चार मुख्य भागात चालणार आहे, यात हवामान
आधारित डिजिटल ज्ञानात्मक पाठबळ केंद्र, बी-बियाणे
प्रक्रिया व रोपवाटीका स्वयंचलित केंद्र, स्मार्ट पोर्टेबल
मशीनरी केंद्र व अन्न प्रक्रिया स्वयंचलित केंद्र यांचा समावेश आहे. प्रकल्पात दर्जेदार
व अधिक कृषी उत्पादन निर्मिती करण्याकरिता भारतीय शेतीत यंत्रमानव (रोबोट),
ड्रोन
व स्वयंचलित यंत्राचा वापर वाढण्यासाठी लागणारे
उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्यबळ निर्मिती करण्यात येणार आहे. सदरिल प्रशिक्षण केंद्रात
डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित पदव्युत्तर व आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांकरीता
एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम राहणार असुन संशोधक प्राध्यापक यांना आंतरराष्ट्रीय
स्तरावर प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातुन प्रसार व
मदत केंद्र स्थापीत करण्यात येणार असुन याचा लाभ लहान व मध्यमवर्गीय शेतक-यांना होणार
आहे. या केंन्द्रांतर्गत विविध विज्ञान व अभियांत्रीकी शाखेतील विद्यार्थ्यी सहभाग
घेऊ शकणार असुन यामुळे विविध तंत्रज्ञान व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा एकत्रित
सहभागातुन कृषी उत्पादकता वाढविण्यात मदत होईल.
एक वर्षाच्या या अभ्यासक्रमात
सहा महिन्याचे दोन सत्र राहणार असुन यंत्रमानव (रोबोट) विभाग,
ड्रोन
विभाग व स्वयंचलित यंत्र विभाग अशा तीन विभागात प्रत्येकी चाळीस विद्यार्थ्यांचा प्रवेश
राहणार आहे. असे एकुण १२० विद्यार्थ्यी प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभाग घेतील. यात विज्ञान
व अभियांत्रिकी शाखेतील पद्व्यत्तर व आचार्य पदवीधारक विद्यार्थ्यी प्रवेश घेऊ शकतील.
याविषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवाद व कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येणार असुन
प्रशिक्षणार्थींना आंतरराष्ट्रीय स्तरवरील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थाच्या वतीने
आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षीत
विद्यार्थ्यां व प्राध्यापकांव्दारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल
शेती तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे संपर्काचे जाळे तयार होणार आहे. डिजिटल शेतीकरिता कृषी
उपयुक्त मोबाईल अॅप्सची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पात किमान तीनशे उच्चतम
कौशल्य प्राप्त कृषी उद्योजक निर्मीती करण्यारचे विद्यापीठाचे उद्दीष्टे असुन यांच्या
मार्फत डिजिटल शेतीचा प्रसार होणे अपेक्षीत आहे.
प्रकल्पाबाबत
माननीय कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांचे मत
सद्यस्थितीत राज्यात व मराठवाडयात
गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्याची संकल्पना मुळ धरत असुन शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट
करण्यासाठी ही संकल्पना महत्वाची भुमिका बजावु शकते. या प्रकल्पात प्रशिक्षीत तज्ञ
शेतकरी उत्पादक कंपन्याना डिजिटल शेती तंत्रज्ञानाची जोड देऊ शकतील. या प्रकल्पात
कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातुन कमी खर्चात यंत्रमानव,
ड्रोन्स
व स्वयंचलित यंत्र आधारे शेती करण्यासाठी लहान व मध्यम जमीनधारक शेतक-यांना
उपयुक्त ठरणार आहे. अत्याधुनिक डिजिटल साधने व्यावसायिक स्तरावर प्रचलीत होऊन
स्वयंरोजगार निर्मितीसह उद्योजकांना मार्गदर्शन करतील.
शेतक-यांचे
उत्पन्न दुप्पट करण्यासाठी देशातील व राज्यातील शेतीपुढे मजुरांचा प्रश्न,
वाढता
निविष्ठांचा खर्च, बदलते हवामान व शेतीसाठी कमी होणारे पाण्याची उपलब्धाता अशा प्रमुख
समस्या आहेत. या समस्यावर शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य होऊ शकेल.
या प्रकल्पांतर्गत शेतमजुरीच्या कमरतेवर मात करण्यासाठी छोटे संरचनात्मक यंत्रांचा
वापर, स्वयंचलित वाहनाव्दारे पीक हाताळणी,
रोग
निदान व उपाय, काढणी व वाहतुक करणे शक्य होईल. ड्रोनव्दारे
कार्यक्षमरित्या पिक पाहणी व निरिक्षण,
जमिनितील शुष्कता, पिकांवरिल रोग व निदान,
कीडनाशकांची फवारणी हे कॅमेरा व सेंन्सीर तंत्रज्ञानाव्दारे शक्य होईल.
अॅग्रीरोबोट व्दारे फळांची व जमिनीची तपासणी,
पिक लागवडी करिता मार्गदर्शन, फवारणी,
काढणी,
विविध
रोग व कीडींची ओळख व उपाय, पिकांच्या
गरजेनुसार ठिंबक व्दारे स्वयंचलित पाणी व्यवस्थापन यंत्रणा आदीं तंत्राचा समावेश
राहणार आहे. काटेकोर पध्दतीने पिकांची लागवड, खत
व पाणी व्यवस्थापन, फवारणी,
पिक
काढणी, बांधणी, पॅकेजींग
आदीकरिता यंत्रमानव, ड्रोन,
सेन्सर
यंत्रणाचे वापर करण्यात येणार आहे. यंत्राव्दारे कापुस वेचणी,
ग्रीन
हाऊस तंत्रज्ञान, शेडनेट,
मातीचे
गुणधर्माचे विश्लेषण, क्षेत्रीय सर्वेक्षण,
निरीक्षण
आदीचा अंतर्भावासह डिजिटल शेती तंत्रज्ञानास लागणारे मनुष्यबळ निर्मिती करून या क्षेत्रात
रोजगार, स्वयंरोजगार संधी व उद्योजकता विकासावर
भर देण्यात येणार आहे.
प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ
डॉ गोपाल शिंदे यांचे मत - आज प्रगत देशातील शेतीत मोठया प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा
व स्वंयचलित यंत्राचा वापर होत आहे, परंतु भारतीय
शेतीस अनुकूल असे तंत्रज्ञान वापरण्या बाबत हा प्रकल्प एक मार्गदर्शक दिशा ठरेल.
प्रकल्प समन्वयक डॉ राजेश कदम
यांचे मत - या प्रकल्पाव्दारे शेतीच्या डिजिटलकरणासाठी लागणा-या कुशल मनुष्यबळाची
निर्मिती होऊन, त्यांचा उपयोग देशातील व राज्यातील
कृषि विकासात होणार आहे.
विद्यापीठ शास्त्रज्ञांची २१ सदस्यीय कोर टीम
प्रकल्पासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांची
२१ सदस्यीय कोर टीम तयार करण्यात आली असुन इतर ४० संशोधक प्राध्यापकांचाही सहभाग राहणार
आहे. प्रकल्पाची कार्य यंत्रणा पुढील तीन वर्षात स्थापीत करून दिर्घकाळाकरिता यंत्रणा
चालु ठेवत डिजिटल तंत्रज्ञानाचा कृषी उत्पादने वाढवण्याचे कार्य चालु राहील. या प्रकल्पातील
कोर टीम मध्ये प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ मदन पेंडके,
डॉ
भगवान आसेवार, डॉ मेघा जगताप,
प्रा
संजय पवार, डॉ व्ही के इंगळे,
डॉ
प्रविण वैद्य, डॉ कैलास डाखोरे,
डॉ
संतोष फुलारी, डॉ विनोद शिंदे,
डॉ
धीरज कदम, डॉ डि व्ही पाटील,
डॉ
गोदावरी पवार, डॉ डि. डि. टेकाळे,
डॉ
एस. आर. गरूड, डॉ बी. एस. आगरकर,
डॉ
आर. बी. क्षीरसागर, डॉ विणा भालेराव,
डॉ
प्रविण कापसे आदींचा समावेश असुन इतर चाळीस शास्त्रज्ञांची उपसमिती असणार आहे.