Tuesday, July 30, 2019

मराठवाडयातील चारशे गावांत कृषीदुत व कृषीकन्‍या करीत आहेत कृषी तंत्रज्ञानाचा जागर

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या सत्‍ताविस कृषि महाविद्यालयाच्‍या २६४६ विद्यार्थ्‍यांचा उपक्रमात सहभाग
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत एकुण सत्‍ताविस (२७) घटक व संलग्‍न कृषी महाविद्यालय असुन कृषि पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या सातव्‍या सत्रात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम (रावे) राबविण्‍यात येतो. या सत्रातील विद्यार्थांना कृषिदुत व कृषिकन्‍या असे संबोधन्‍यात येते, हे विद्यार्थ्‍यी प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या शेती कसण्‍याचे तंत्र व ग्रामीण जीवन पध्‍दतीचा अभ्‍यास करतात, तसेच विद्यापीठ शिफारसीत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्‍यक्षिके व कार्यक्रम आयोजित करून कृषी तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविण्‍यासाठी विस्‍ताराचे कार्य करतात, हे विद्यार्थ्‍यी साधारणत: पंधरा आठवडे दत्‍तक गांवात कार्यरत असतात. यावर्षी एकुण सत्‍ताविस (२७) घटक व संलग्‍न कृषि महाविद्यालयातील २६४६ विद्यार्थ्‍यींनी सातव्‍या सत्रात नोंदणी केलेली असुन मराठवाडयातील आठ जिल्‍हयातील चारशे गावांची निवड हा कार्यक्रम राबविण्‍यासाठी करण्‍यात आली आहे.
गतवर्षी माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांच्‍या सुचनेनुसार कृषीदुत व कृषीकन्‍याच्‍या माध्‍यमातुन संपुर्ण मराठवाडयात कापसावरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा प्रसार करण्‍यात आला होता, त्‍याची दखल कृषि आयुक्‍तालयानेही घेतली. यावर्षीही मका पिकावरील लष्‍करी अळी, कापसावरील गुलाबी बोंडअळी, हुमणी कीड आदींचा प्रा़दुर्भाव बघता, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, कृषि आयुक्‍त मा श्री सुहास दिवसे व शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले यांच्‍या सुचनेनुसार कीड व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञान प्रसार मोहिम कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र, संशोधन केंद्राच्‍या सहकार्याने संपुर्ण मराठवाडयात राबविण्‍यात येत आहे. तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत कृषीदुत व कृषीकन्‍या कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्‍यक्षिके, चर्चासत्र, शेतकरी मेळावे, जनावरांचे लसीकरण, वृक्षलागवड, माती परिक्षण, बोर्डो मिश्रण व कंपोस्‍ट खत तयार करणे, जैविक खतांची बीजप्रक्रिया आदी कार्यक्रम राबविण्‍यात येत आहेत. विद्यापीठाच्‍या वतीने परिस्थितीनुसार देण्‍यात येणारे कृषि सल्‍ले घडीपत्रिका, भितीपत्रिका आदीच्‍या माध्‍यमातुन शेतकरी बांधवापर्यंत पोहोविण्‍याचे कार्य करण्‍यात येत आहे. सद्यस्थितीत गुलाबी बोंडअळीच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी कामगंध सापळे महत्‍वाचे असुन सदरिल दत्‍तक गांवात कामगंध सापळे निवडक शेतक-यांच्‍या शेतीत लावण्‍यात येऊन त्‍याबाबत कृषी किटकशास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करित आहेत. याबाबत जालना, औरंगाबाद व परभणी येथे कार्यशाळेत कृषि महाविद्यालयातील तज्ञांना मार्गदर्शन करण्‍यात आले. नुकतेच जालना जिल्‍हयातील खरपुडी कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन मोहिमे अंतर्गत खरपुडी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिदुतांनी मौजे वानडगांव येथील शेतक-यांच्‍या कपाशीच्‍या शेतावर ७५० कामगंध सापळे लावण्‍याकरिता मदत केली.  निवडलेल्‍या चारशे गावां व्‍यतिेरिक्‍त आजूबाजूच्‍या गावांसह एक हजारपेक्षा जास्‍त गावांत कृषीदुत व कृषीकन्‍यांनी कामगंध सापळाच्‍या प्रात्‍यक्षिके देऊन मार्गदर्शन केल आहे. जुन व जुलै महीण्‍यात ही विविध उपक्रम राबविण्‍यात आले असुन पुढील ऑगस्‍ट व सप्‍टेबर महिण्‍यापर्यंत कृषिदुत व कृषिकन्‍या सदरिल गावांत कार्यरत राहणार आहेत. या उपक्रमाच्‍या माध्‍यमातुन कृषी पदवीचे विद्यार्थ्‍यींना प्रत्‍यक्ष कृषी विस्‍तार कार्याचा अनुभव मिळत असल्‍याची माहिती रावे विद्यापीठ समन्‍वयक डॉ राकेश आहिरे यांनी दिली.

Monday, July 29, 2019

वनामकृवि अंतर्गत संपुर्ण मराठवाडयात राबविण्यात येत असलेला ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम

वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमाचे काही छायाचित्र




Friday, July 26, 2019

मौजे टाकळगव्‍हाण येथे पाचशेपेक्षा जास्‍त जनावरांचे लसीकरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत एकात्मिक शेती पध्‍दती केंद्र येथे कार्यरत असलेल्‍या कृषीदुतांनी मौजे टाकळगव्‍हाण येथे जनावरांचे लसीकरण शिबिराचे आयोजन दिनांक 22 जुलै रोजी केले होते. या शिबिरात पाचशे पेक्षा जास्‍त जनावरांचे लसीकरण पशुवैद्यकिय अधिकारी डॉ सय्यद रहीम यांनी केले. पाऊसाळी हंगामात जनावरांना विविध रोगांची लागण होते, त्‍यामुळे वेळीच उपचार करण्‍याची गरज असल्‍याचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ सय्यद रहीम यांनी सांगुन जनावरांच्‍या विविध रोग व उपचाराबाबत माहिती दिली. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, रावे समन्‍वयक डॉ राकेश अहिरे, केंद्र प्रमुख डॉ ए एस कार्ले, कार्यक्रम अधिकारी डॉ ए टी शिंदे, डॉ एस टी शिराळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषीदुत कृष्‍णा उफाड, वैभव राऊत, निलेश वैद्य, लोकडेश्‍वर शिंदे, कृष्‍णा शिंदे, राजकुमार राचरकर, अच्‍युत पिल्‍लेवाड, विशाल सरोदे, आनंद डोंगरे, प्रद्युम्‍न वाघ आदीं यशस्‍वीरित्‍या पार पाडला.


Monday, July 22, 2019

वनामकृवित होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र

देशातील एकमेव डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सेलन्स
कृषी उत्पादकता वाढीसाठी भारतीय शेतीतील रोबोट, ड्रोन व स्वयंचलित यंत्राची उपयुक्तता प्रशिक्षणाव्‍दारे समजुन होणार वापर
जागतिकस्‍तरावर प्रगत देशात कृषिक्षेत्रात यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राचा वापर वाढत असुन डिजिटल शेती करून अधिक व दर्जेदार कृषी उत्पादन कार्यक्षमरित्‍या शेतकरी करित आहेत, यात कृत्रिम बुध्दीमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्सयांचाही वापर होत आहे. हे डिजिटल तंत्रज्ञान भारतीय शेती व शेतक-यांच्या परिस्थितीस अनुकुल बनविण्याची गरज असुन त्यासाठी लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्ययबळाची निर्मिती करावी लागणार आहे. हा दृष्टीकोन ठेऊन परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषि उत्‍पादकता वाढीसाठी यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेतीयावरील सेंटर ऑफ एक्‍सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍प नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेस सादर केला होता. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्‍या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत या प्रकल्‍पास मान्यता दिल्याची राष्ट्रीय संचालक डॉ राकेशचन्द्र अग्रवाल यांनी नुकतेच विद्यापीठास पत्राव्दारे कळविले आहे. अशा प्रकारचा आंतरराष्‍ट्रीय दर्जाचा प्रकल्‍प देशातील एकमेव प्रशिक्षण प्रकल्‍प ठरणार असुन विद्यापीठात आदर्श असे प्रगत कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र (CAAST – Centre for Advanced Agricultural Science & Technology) स्‍थापन करण्‍यात येणार आहे.
सदरिल प्रकल्प विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण व माजी कुलगुरू मा डॉ बी. व्यंकटेशवरुलू यांच्या प्रेरणेने तसेच माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, कुलसचिव श्री रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे व प्रकल्प समन्वयक डॉ राजेश कदम यांनी सादर केला होता. या प्रकल्पाची प्राथमिक संकल्पना प्रमुख शास्‍त्रज्ञ डॉ गोपाळ शिंदे यांची असुन शास्त्रयुक्त चाचणी व अन्वेषण हे उच्‍चस्‍तरीय सोळा सदस्‍यीय कुलगुरु समिती व्‍दारे झाले आहे.
हा प्रशिक्षण प्रकल्प सन २०१९ ते २०२२ या तीन वर्ष कालावधी करीता संकल्पीत असुन यास अठरा कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे, यात पन्नास टक्के वाटा जागतिक बॅक व पन्नास टक्के वाटा हा भारत सरकार कडुन भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या माध्यामातुन प्राप्त होणार आहे. यात यंत्रमानव (रोबोट), ड्रोन व स्वयंचलीत सारखी डिजीटल साधनांचा समावेश असणा-या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थ्यी व संशोधक प्राध्यापकांना प्रशिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या केन्द्राव्‍दारे कौशल्य प्राप्त प्रशिक्षणार्थी डि‍जिटल शेतीचे तंत्र शेतक-यांपर्यंत नेण्याचा प्रयत्‍न करणार आहेत.
यासाठी परभणी कृषी विद्यापीठाने अॅग्री-रोबोट्स, अॅग्री-ड्रोन्स व अॅग्री-स्वयंचलित यंत्राच्या तंत्रज्ञानात्‍मक देवाणघेवाण करिता जगातील अग्रगण्य विद्यापीठाशी सामंजस्य‍ करार केला असुन यात अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेन, युक्रेन व बेलारूस येथील विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच पवई व खरगपुर येथील आयआयटी संस्थेचे नॉलेज सेंटर म्हणून सहकार्य लाभणार आहे.
याप्रशिक्षण केंद्रांचे कार्य चार मुख्य भागात चालणार आहे, यात हवामान आधारित डिजिटल ज्ञानात्मक पाठबळ केंद्र, बी-बियाणे प्रक्रिया व रोपवाटीका स्वयंचलित केंद्र, स्मार्ट पोर्टेबल मशीनरी केंद्र व अन्न प्रक्रिया स्वयंचलित केंद्र यांचा समावेश आहे. प्रकल्पात दर्जेदार व अधिक कृषी उत्पादन निर्मिती करण्याकरिता भारतीय शेतीत यंत्रमानव (रोबोट), ड्रोन व स्वयंचलित यंत्राचा वापर वाढण्‍यासाठी  लागणारे उच्चतम कौशल्य प्राप्त मनुष्यबळ निर्मिती करण्यात येणार आहे. सदरिल प्रशिक्षण केंद्रात डिजिटल शेती तंत्रज्ञानावर आधारित पदव्युत्तर व आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांकरीता एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम राहणार असुन संशोधक प्राध्यापक यांना आंतरराष्ट्रीय स्‍तरावर प्रशिक्षित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातुन प्रसार व मदत केंद्र स्थापीत करण्यात येणार असुन याचा लाभ लहान व मध्यमवर्गीय शेतक-यांना होणार आहे. या केंन्द्रांतर्गत विविध विज्ञान व अभियांत्रीकी शाखेतील विद्यार्थ्यी सहभाग घेऊ शकणार असुन यामुळे विविध तंत्रज्ञान व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा एकत्रित सहभागातुन कृषी उत्पादकता वाढविण्यात मदत होईल.
एक वर्षाच्या या अभ्यासक्रमात सहा महिन्याचे दोन सत्र राहणार असुन यंत्रमानव (रोबोट) विभाग, ड्रोन विभाग व स्वयंचलित यंत्र विभाग अशा तीन विभागात प्रत्येकी चाळीस विद्यार्थ्यांचा प्रवेश राहणार आहे. असे एकुण १२० विद्यार्थ्यी प्रमाणपत्र अभ्यासक्रमात सहभाग घेतील. यात विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील पद्व्यत्तर व आचार्य पदवीधारक विद्यार्थ्यी प्रवेश घेऊ शकतील. याविषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिसंवाद व कार्यशाळेचे आयोजनही करण्यात येणार असुन प्रशिक्षणार्थींना आंतरराष्ट्रीय स्तरवरील विविध विद्यापीठे व संशोधन संस्थाच्या वतीने आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
या प्रशिक्षीत विद्यार्थ्यां व प्राध्यापकांव्‍दारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील डिजिटल शेती तंत्रज्ञान व्यवस्थापनाचे संपर्काचे जाळे तयार होणार आहे. डिजिटल शेतीकरिता कृषी उपयुक्त मोबाईल अॅप्सची निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रकल्पात किमान तीनशे उच्चतम कौशल्य प्राप्त कृषी उद्योजक निर्मीती करण्यारचे विद्यापीठाचे उद्दीष्टे असुन यांच्या‍ मार्फत डिजिटल शेतीचा प्रसार होणे अपेक्षीत आहे.

प्रकल्पाबाबत माननीय कुलगूरू मा डॉ अशोक ढवण यांचे मत
सद्यस्थितीत राज्यात व मराठवाडयात गटशेती व शेतकरी उत्पादक कंपन्याची संकल्पना मुळ धरत असुन शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी ही संकल्‍पना महत्वाची भुमिका बजावु शकते. या प्रकल्पात प्रशिक्षीत तज्ञ शेतकरी उत्‍पादक कंपन्‍याना डिजिटल शेती तंत्रज्ञानाची जोड देऊ शकतील. या प्रकल्‍पात कौशल्‍य प्राप्‍त प्रशिक्षणार्थीच्‍या माध्‍यमातुन कमी खर्चात यंत्रमानव, ड्रोन्स व स्वयंचलित यंत्र आधारे शेती करण्‍यासाठी लहान व मध्यम जमीनधारक शेतक-यांना उपयुक्‍त ठरणार आहे. अत्याधुनिक डिजिटल साधने व्यावसायिक स्‍तरावर प्रचलीत होऊन स्वयंरोजगार निर्मितीसह उद्योजकांना मार्गदर्शन करतील.

शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी देशातील व राज्या‍तील शेतीपुढे मजुरांचा प्रश्न, वाढता निविष्‍ठांचा खर्च, बदलते हवामान व शेतीसाठी कमी होणारे पाण्याची उपलब्धाता अशा प्रमुख समस्या आहेत. या समस्यावर शेतीत डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य होऊ शकेल. या प्रकल्पांतर्गत शेतमजुरीच्या‍ कमरतेवर मात करण्‍यासाठी छोटे संरचनात्मक यंत्रांचा वापर, स्वयंचलित वाहनाव्‍दारे पीक हाताळणी, रोग निदान व उपाय, काढणी व वाहतुक करणे शक्य होईल. ड्रोनव्दारे कार्यक्षमरित्या पिक पाहणी व निरिक्षण, जमिनितील शुष्‍कता, पिकांवरिल रोग व निदान, कीडनाशकांची फवारणी हे कॅमेरा व सेंन्सीर तंत्रज्ञानाव्‍दारे शक्य होईल. अॅग्रीरोबोट व्दा‍रे फळांची व जमिनीची तपासणी, पिक लागवडी करिता मार्गदर्शन, फवारणी, काढणी, विविध रोग व कीडींची ओळख व उपाय, पिकांच्या गरजेनुसार ठिंबक व्‍दारे स्व‍यंचलित पाणी व्यवस्थापन यंत्रणा आदीं तंत्राचा समावेश राहणार आहे. काटेकोर पध्दतीने पिकांची लागवड, खत व पाणी व्यवस्थापन, फवारणी, पिक काढणी, बांधणी, पॅकेजींग आदीकरिता यंत्रमानव, ड्रोन, सेन्सर यंत्रणाचे वापर करण्यात येणार आहे. यंत्राव्दारे कापुस वेचणी, ग्रीन हाऊस तंत्रज्ञान, शेडनेट, मातीचे गुणधर्माचे विश्लेषण, क्षेत्रीय सर्वेक्षण, निरीक्षण आदीचा अंतर्भावासह डिजिटल शेती तंत्रज्ञानास लागणारे मनुष्यबळ निर्मिती करून या क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगार संधी व उद्योजकता विकासावर भर देण्यात येणार आहे.

प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ गोपाल शिंदे यांचे मत - आज प्रगत देशातील शेतीत मोठया प्रमाणात डिजिटल तंत्रज्ञानाचा व स्वंयचलित यंत्राचा वापर होत आहे, परंतु भारतीय शेतीस अनुकूल असे तंत्रज्ञान वापरण्या बाबत हा प्रकल्प एक मार्गदर्शक दिशा ठरेल.
प्रकल्प समन्वयक डॉ राजेश कदम यांचे मत - या प्रकल्पाव्‍दारे शेतीच्या‍ डिजिटलकरणासाठी लागणा-या कुशल मनुष्यबळाची निर्मिती होऊन, त्यांचा उपयोग देशातील व राज्यातील कृषि विकासात होणार आहे.

विद्यापीठ शास्त्रज्ञांची २१ सदस्यीय कोर टीम प्रकल्पासाठी विद्यापीठ शास्त्रज्ञांची २१ सदस्यीय कोर टीम तयार करण्यात आली असुन इतर ४० संशोधक प्राध्यापकांचाही सहभाग राहणार आहे. प्रकल्पा‍ची कार्य यंत्रणा पुढील तीन वर्षात स्थापीत करून दिर्घकाळाकरिता यंत्रणा चालु ठेवत डिजिटल तंत्रज्ञानाचा कृषी उत्पादने वाढवण्याचे कार्य चालु राहील. या प्रकल्पातील कोर टीम मध्ये प्राचार्य डॉ उदय खोडके, डॉ मदन पेंडके, डॉ भगवान आसेवार, डॉ मेघा जगताप, प्रा संजय पवार, डॉ व्ही के इंगळे, डॉ प्रविण वैद्य, डॉ कैलास डाखोरे, डॉ संतोष फुलारी, डॉ विनोद शिंदे, डॉ धीरज कदम, डॉ डि व्ही पाटील, डॉ गोदावरी पवार, डॉ डि. डि. टेकाळे, डॉ एस. आर. गरूड, डॉ बी. एस. आगरकर, डॉ आर. बी. क्षीरसागर, डॉ विणा भालेराव, डॉ प्रविण कापसे आदींचा समावेश असुन इतर चाळीस शास्त्रज्ञांची उपसमिती असणार आहे.

Sunday, July 21, 2019

ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे मुरूंबा येथे जनावरांचे लसीकरण


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमातर्गत ऊती संवर्धन केंद्रात कार्यरत असलेल्‍या कृषिकन्यांनी मौजे मुरुंबा येथे जनावरांच्या लसीकरण शिबिर आयोजित केले होते. या शेतक-यांच्‍या शंभर पेक्षा जास्‍त जनावरांचे लसीकरण शुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. टी. पवार यांनी केले. सद्यस्थितीत जनावरे ­या, घटसर्प या सारख्या रोगांना बळी पडण्याची दाट क्यता असल्‍याचे शुवैद्यकीय अधिकारी डॉ एन टी पवार यांनी मार्गदर्शनात सांगितले. सदरिल रावे कार्यक्रम प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, रावे समन्वयक डॉ राके अहीरेसहसमन्वयक डॉ. प्रवीण कापसे, केंद्र प्रमुख डॉ कुलदीप शर्मा, कार्यक्रम अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात येत आहेत. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषिकन्या स्नेहल लांबाडे, श्रद्धा मगर, पुजा माने, अश्विनी मनोलीकर, निकीता नाईकवाडी, धरती नायक आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, July 20, 2019

पिकांवरील कीडींच्‍या बाबतीत गाफील राहु नका.......कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा सल्‍ला

वनामकृवित क्रॉपसॅप प्रकल्‍पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षणाचे उदघाटन
मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील कृषि विभागातील अधिकारी व कर्मचा-यांचा सहभाग
क्रॉपसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन गेल्‍या दोन वर्षात पिकांवरील कीड-रोग व्‍यवस्‍थापनाबाबत मोठया प्रमाणात शेतक-यांमध्‍ये सर्वांच्‍या मदतीने सामुदायिकरित्‍या जागृती करण्‍यात आली, त्‍याचाच परिणाम पिकांवरील कीड - रोगांचे चांगल्‍या प्रकारे व्‍यवस्‍थापन करू शकलो. परंतु यावर्षी गाफील राहुन चालणार नाही, दरवर्षी पिकांवर नवनवीन कीडींचा प्रादुर्भाव होत आहे, तसेच कीडींमध्‍ये प्रतिकारशक्‍ती निर्माण होतात, निसर्गात स्‍वत:ला टिकुन ठेवण्‍याचा उपजत गुण कींडीमध्‍ये असतो, मागील वर्षी कीडींचे व्‍यवस्‍थापन करण्‍यात यशस्‍वी झालो, म्‍हणुन  गाफील राहु नका. पिकांवरील कीड व रोगाबाबत बारकावे समजुन घ्‍या, असा सल्‍ला कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिला. 
राज्‍याचा कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी कीटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला प्रकल्‍प (क्रॉपसॅप) अंतर्गत मास्‍टर ट्रेनर्सचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० व २१ जुलै रोजी करण्‍यात आले असुन दिनांक २० जुलै रोजी प्रशिक्षणाच्‍या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री डि जी मुळे, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, क्रॉपसॅप प्रकल्‍पात गेल्‍या वर्षी कापसावरील गुलाबी बोंडअळीवरील व्‍यवस्‍थापनावर भर देण्‍यात आला, यावर्षी मकयावरील लष्‍करी अळीचा उद्रेक वाढतांना दिसुन येत आहे. ही कीड अंत्‍यत चिवट असुन अनेक पिकांवर तीचा प्रादुर्भाव होत असल्‍यामुळे त्‍याचे व्‍यवस्‍थापन करणे अवघड बाब आहे. महाबीजच्‍या माध्‍यमातुन विद्यापीठाचे नांदेड-४४ हे वाण बीटी स्‍वरूपात यावर्षी मर्यादित स्‍वरूपात विक्रीसाठी उप‍लब्‍ध झाले, लवकरच विद्यापीठ विकसित अधिक उत्‍पादन देणा-या चांगल्‍या वाणाचे बीटी मध्‍ये परावर्तीत करण्‍यासाठी महा‍बीज सोबत सामजंस्‍य करार करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे येणा-या काळात विद्यापीठ विकसित कापुस वाणाचे बियाणांचा बाजारातील वाटा वाढेल.
विस्‍तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, क्रॉपसॅप प्रकल्‍पात कार्य करणा-या क्षेत्रीय अधिका-यांनी कीडींचे अचुक निरिक्षणे घेतल्‍यास त्‍या कीडींचे वेळीच व्‍यवस्‍थापनाबाबतचा सल्‍ला शेतक-यांपर्यत पोहचवुन प्रभावी नियंत्रण करता येईल. तर जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री डि जी मुळे म्‍हणाले की, विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानाच्‍या आधारे गेल्‍या वर्षी सर्वांच्‍या प्रयत्‍नांने कापसावरील गुलाबी बोंडअळीवर प्रभावी नियंत्रण मिळविता आले. प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन याही वर्षी कृषि सल्‍ला प्रभावीपणे प्रत्‍येक शेतक-यांपर्यंत पोहचला पाहिजे.
यावेळी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते लष्‍करी अळीचे व्‍यवस्‍थापन व गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन यावरील भितीपत्रिकेचे विमोचन करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ आनंद बडगुजर यांनी केले तर आभार श्री सय्यद शेख यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणात मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी व कृषी विद्यापीठातील जिल्‍हा समन्‍वयक यांचे मास्‍टर्स ट्रेनर्स व विद्यापीठातील अधिकारी, शास्‍त्रज्ञ मोठया संख्‍येने उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रशिक्षणात विविध विषयावर विद्यापिठ शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन यात सोयाबीवरील कीडींचे व्‍यवस्‍थापनावर डॉ डी जी मोरे, गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापनावर डॉ पी आर झंवर, रसशोषक कीडींचे व्‍यवस्थापनावर डॉ ए जी बडगुजर, मकयावरील लष्‍करी अळीचे व्‍यवस्‍थापनावर डॉ बी व्‍ही भेदे, तुरीवरील कीडींचे व्‍यवस्‍थापनावर डॉ एस डी बंटेवाड, हवामान बदलानुसार पिक पध्‍दतीवर डॉ बी व्‍ही आसेवार, जैविक कीड व्‍यवस्‍थापनावर डॉ एस डी धुरगुडे, पिकांवरील रोग व्‍यवस्‍थापनावर डॉ पी एच घंटे, कापुस उत्‍पादन तंत्रज्ञानावर प्रा अरविंद पांडागळे, सोयाबीन उत्‍पादन तंत्रज्ञानावर डॉ एस पी म्‍हेत्रे, क्रॉपसॅप प्रकल्‍पातील प्रात्‍यक्षिक व तपासणीवर डॉ के जी अंभुरे आदी शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

हरित विद्यापीठ संकल्‍पनेस पर‍भणीकरांचा वाढता प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा स्‍वच्‍छ परिसर, हरित परिसर व सुरक्षीत परिसर संकल्‍पनेतुन हरित विद्यापीठ मोहिमेस शहरातील नागरिकही मोठया प्रमाणात सहभागी होते आहे. दिनांक १९ जुलै रोजी परभणीतील प्रतिष्ठीत नागरिक मॉर्निंग वॉक ग्रुपचे श्री रामभाऊ रेंगे, श्री पमुसेठ सोनी, श्री बाबूसेठ मनियार, श्री बद्रीसेठ सोनी, श्री बाबू बंग, श्री राजू अग्रवाल, श्री हरिभाऊ ठिमके, श्री दिनेश लड्ढा, श्री अभय जोशी, श्री राम खोबे आदींनी माननीय कुलगुरुंची भेट घेवुन विद्यापिठातील वृक्षलागवड उपक्रमास देणगी स्वरुपात मदत देऊ केली असुन सदरिल उपक्रमाची प्रेरणा श्री राजेन्द्र सराफ यांनी दिली. यावेळी कुलगूरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले की, विद्यापीठ राबवित असलेल्‍या स्‍वच्‍छ परिसर, हरित परिसर व सुरक्षीत परिसर मोहिमेत विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यीच सहभाग घेत नसुन परभणी शहरातील नागरिकही हिरारीने सहभाग घेत आहे, हरित विद्यापीठ ही मोहिम एक लोकचळवळ होत आहे, त्‍यामुळे आपले विद्यापीठ ही भावना वाढीस लागेल.

Thursday, July 18, 2019

वनामकृवितील कोरडवाहु संशोधन प्रकल्‍पास वसंतराव नाईक राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्रदान

नवी दिल्‍ली येथे भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या ९१ वा स्‍थापना दिनी आयोजित कार्यक्रमात वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांना आले गौरविण्‍यात
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पास नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक राष्‍ट्रीय पुरस्‍कार दिनांक १६ रोजी परिषदेच्‍या ९१ वा स्‍थापना दिनी देशाचे माननीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नवी दिल्‍ली येथे पार पडलेल्‍या कार्यक्रमात प्रदान करण्‍यात आला. नवी दिल्‍ली येथे आयोजित या समांरभात भारतीय कृषि संशोधन परिषदेचे महासंचालक मा डॉ त्रिलोचन महापात्र यांच्‍या हस्‍ते पुरस्‍कार प्राप्‍त शास्‍त्रज्ञ डॉ भगवान आसेवार, डॉ आनंद गोरे, डॉ मेघा जगताप, डॉ पपिता गौरखेडे यांना एक लाख रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्‍यात आले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्‍या इतिहासात प्रथमच भारतीय कृषी संशोधन परिषदेचा प्रतिष्‍ठीत असा पुरस्‍कार प्राप्‍त झाला असुन यात डॉ भगवान आसेवार, डॉ मदन पेंडके, डॉ सुरेंद्र चौलवार, डॉ अनिल गोरे, डॉ मेघा जगताप, डॉ गणेश गायकवाड, डॉ पपिता गौरखेडे, डॉ रविंद्र चारी या शास्‍त्रज्ञांचा समावेश आहे.
अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्या उल्लेखनीय कार्याची दखल
सदरिल पुरस्‍कार अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहु शेती मधील उल्‍लेखनीय संशोधन कार्य, तंत्रज्ञान विकास, व त्‍याचा शेतक-यांमधील प्रचार व प्रसार आदी कार्याची दखल घेऊन भारतीय कृषि संशोधन परिषदेने जाहिर केला आहे. या संशोधन कार्यात शेततळे व पाण्‍याचा पुर्नवापर, विहिर व कुपनलिका पुर्नेभरण, सोयाबीन करिता रूंद वरंबा व सरी पध्‍दती, मुलस्‍थानी जलसंधारण पध्‍दती, आंतरपीक पध्‍दती, आप्‍तकालीन पिक नियोजन, हवामान बदलानुरूप कोरडवाहु शेती संशोधन या बाबींचा प्रामुख्‍याने समावेश असुन हे तंत्रज्ञान प्रसारासाठी मोबाईल अॅप विकसित करण्‍यात आले आहे. प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन मराठवाडयातील आठही जिल्‍हयासाठी आप्‍तकालिन पिक नियोजन आराखडा तयार करण्‍यात आला असुन शासनस्‍तरावर त्‍याची अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. महाराष्‍ट्र शासनाच्‍या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्‍पास (पोक्रा प्रकल्‍पया संशोधन केंद्रामार्फत तंत्रज्ञानात्‍मक पाठबळही पुरविण्‍यात येते. प्रकल्‍पामार्फत हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषी उपक्रम हा परभणी तालुक्‍यातील मौजे बाभळगांव व उजळांबा या गावातील शेतक-यांच्‍या शेतावर संशोधनात्‍मक प्रात्‍यक्षिके राबविण्‍यात येऊन शेतक-यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्‍यात येत आहे. या संशोधन केंद्रामार्फत कोरडवाहु शेती निगडीत बावीस तंत्रज्ञान शिफारसी मान्‍य करण्‍यात आल्‍या असुन विविध तंत्रज्ञानाच्‍या प्रसारासाठी घडीपत्रिका, पुस्तिका, वार्तापत्र लेख आदी प्रकाशित करण्‍यात आले आहे.

Wednesday, July 17, 2019

सोयाबीन व कपाशीवर पैसा व करडे भुंगेरे किडींचा प्रादुर्भाव

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा किडींच्‍या व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला


हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या थोडया बहुत पावसावर मराठवाडयात कापूस व सोयाबीन पिकांची लागवड झाली, परंतु नंतर पावसाने उघडीप दिल्याने कापूस व सोयाबीन पिकांवर पैसा व करडे भुंगेरे या किडी कोवळया पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान करत आहे.
पैसा (मिलीपेड) : हि जमिनीवर आढळणारी पिकांना सर्वात जास्त नुकसानकारक कीड म्हणून ओळखली जाते. किड कपाशीचे बियाणे फस्त करुन फक्त टरफल शिल्लक ठेवते. त्यामुळे कपाशीची उगवण होत नाही व मोठया प्रमाणात शेता तुट दिसून येत आहे. त्याचबरोबर तुट लावल्या जागेवरचे बियाणेसुध्दा खाऊन टाकत आहेत. रोपावस्थेत पानासहित संपूर्ण रोप खाऊन टाकतात. ही किड निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळीच पिकांना नुकसान करतात. दिवसा त्या जमिनीमध्ये किंवा बांधावर लपून राहतात. तसेच बांधावरीलव शेतावरील तणांवरसुध्दा खातांना आढळून आली आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी पुढील उपाय योजना कराव्यात.
पैसा किडींचे व्यवस्थापन : शेतात व बांधावरील पैसा किड हाताने वेचून त्या साबणाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा खोल खड्डा करुन जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात. शेत तणविरहित ठेवावेत व शेतातील तसेच बांधावरील तणाचे व्यवस्थापन करावे. पिकामध्ये कोळपणी करावी, त्यामुळे जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या पैसा किडी उघडया पडून नष्ट होतील. जमिनीतील किडींसाठी फोरटे 10 टक्के दाणेदार 10 किलो/ हेक्टरी जमिनीमध्ये टाकावे. चांगला पाऊस पडल्यास या किडिंचे नैसर्गीक नियंत्रण होते.
करडे भुंगेरे: करडया रंगाचे व तोंडाचा भाग सोंडे प्रमाणे पुढे आलेला असतो. साधारणता ही कीड कमी महत्वाची असून दरवर्षी नियमितपणे पिकांवर अत्यल्प प्रमाणात आढळून येते. परंतु कधीकधी कीडींचा उपद्रव जास्त प्रमाणात आढळून येतो. हि कीड पांनाना गोलाकार छिद्रे पाडतात व कोवळी रोपे खाऊन टाकतात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस 36 एस एल 25 मि.ली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावे
वरील प्रमाणे उपाययोजना करुन या किडींचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या कृषि किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. आर. झंवरसहायक प्राध्यापक डॉ. अनंत बडगुजर यांनी केले आहे.