Pages

Wednesday, January 8, 2020

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात उद्योजकता विकास शिबीराचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्‍यांकरिता उद्योजकता विकास जागरुकता यावर तीन दिवसीय शिबीराचे आयोजन दिनांक 7 ते 9 जानेवारी दरम्‍यान करण्यात असुन शिबीराचे उद्घाटन दिनांक 7 जानेवारी रोजी कुलगूरू मा डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नांदेडचे विभागीय व्यवस्थापक श्री. एस जी. नलावडेप्राचार्या डॉ. जयश्री झेंड, एमसीईडी, प्रकल्प संचालक (परभणी) श्रीमती रुपाली कानगुडे, प्रकल्प संचालक (हिंगोली) श्री शंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात मा कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकास व्‍हावा याकरिता कृषि विद्यापीठातील नवीन अभ्‍यासक्रमामध्‍ये अनेक बदल करण्‍यात आले आहेत. दैनंदिन जीवनात वावरतांना व्यवसायाच्या अनेक संधी आपणास सापडतात, त्‍या संधी डोळसपणे शोधण्याची गरज असुन परिश्रम व चिकाटीव्‍दारे संधीचा योग्य उपयोग करुन यशस्‍वी उद्योजक होता येते, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी मार्गदर्शना विद्यार्थ्‍यांनी आपल्‍यातील उद्योजकता गुणांची ओळख झाली पाहिजे असे सांगितले तर श्री. एस जी. नलावडे यांनी उद्योजकता कौशल्य काही व्यक्तींमध्ये जन्मत: असते परंतु ते प्रशिक्षणाव्‍दारे देखील विकसित करता येते, असे प्रतिपादीत केले.
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. जयश्री झेंड यांनी सामुदायिक विज्ञान विद्याशाखेद्वारे विद्यार्थ्‍यांना उपलब्ध होणा-य विविध व्यवसायाच्या संधीची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विणा भालेराव यांनी केले. प्रशिक्षण शिबीराच्या अभ्यासक्रमाचे नियोजन एमसीईडी, परभणी प्रकल्प संचालक श्रीमती रुपाली कानगुडे यांनी केले असुन शिबिरास विविधस्तरांच्या साधनव्यक्तींना निमंत्रित केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.