Pages

Sunday, April 12, 2020

वनामकृविच्‍या गृहविज्ञान महाविद्यालयातील वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागात मास्‍कची निर्मिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍या‍करिता प्रतिबंधात्‍मक उपाय म्‍हणुन लागणा-या चेह-यावरील मास्‍कची निर्मिती करण्‍यात येत आहे. सध्‍या राज्‍यातील व देशातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व प्रसार वाढत आहे, त्‍या अनुषंगाने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांना त्‍याचा संसर्ग होऊ नये म्‍हणुन शासन आदेशान्‍वये विविध प्रतिबंधात्‍मक उपाय योजना राबविण्‍यात येत आहेत. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन विद्यापीठांतर्गत सर्व कर्मचा-यांनी संपुर्ण कार्यालयीन कालावधीत चेह-यावर मास्‍क परीधान करणे तसेच सोशल डिस्‍टन्‍स बंधनकारक करण्‍यात आले आहे. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील वस्‍त्र व परिधान अभिकल्‍पना विभागात ना नफा ना तोटा या तत्‍वावर मास्‍कची निर्मिती करण्‍यात येत असुन रूपये 40 प्रती नग या प्रमाणे उपलब्‍ध करण्‍यात आले आहेत. सदरिल मास्‍कची निर्मिती कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या सुचनेनुसार तर कुलसचिव श्री रणजित पाटील व प्राचार्य डॉ जयश्री झेंड यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात येत आहे. हे मास्‍क तीन स्‍तरीय असुन सुती कापडापासुन बनविण्‍यात आले आहे. मास्‍कची मागणी वाढल्‍यास पुर्ण क्षमतेने निर्मिती करण्‍याचा मानस असल्‍याचे विभाग प्रमुख प्रा मेधा उमरीकर यांनी सांगितले. मास्‍क निर्मितीकरिता विभाग प्रमुख प्रा मेधा उमरीकर, डाॅ सुनिता काळे, डॉ इरफाना सिद्दीकी व इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.