Pages

Friday, May 22, 2020

वनामकृविच्‍या लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयास तीन कोटीचे अर्थ साहाय्य


भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्‍या अर्थ साहाय्याने कृषि जैवतंत्रज्ञानातील पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमास मिळणार बळकटी


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत असलेल्‍या लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील पदव्यूत्तर अभ्यासक्रमास भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागामार्फत येत्या पाच वर्षात सुमारे ३ कोटी रुपयांचा निधीस मान्‍यता प्राप्त झाली आहे. यासाठी भारत सरकारच्‍या दिल्ली येथील जैवतंत्रज्ञान विभागाच्‍या माध्‍यमातुन देशातील विविध संस्थाकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. या उपक्रमाचे समन्वयक कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत पाटील यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत या प्रस्तावाचे ऑनलाईन सादरीकरण केले होते. महाराष्ट्र राज्यातून या उपक्रमास मान्यता मिळवलेले हे एकमेव महाविद्यालय आहे. कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचे महत्व ओळखून महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब केंद्र सरकार मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री असताना या महाविद्यालाच्या रूपाने लातूरमध्ये जैवतंत्रज्ञान विषयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा स्थापनेसाठी मोलाचे सहकार्य दिले होते. या उपक्रमाच्या मान्यतेसाठी व प्रस्ताव सादरीकरणासाठी प्रकल्प समन्वयक प्रा.हेमंत पाटील, सह-समन्वयक डाॅ राहुल चव्हाण,  डॉ. अमोल देठे, डॉ. विद्या हिंगे, डॉ. योगेश भगत आदींनी मोलाचे योगदान दिले. या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. अशोक ढव यांनी सर्व प्राध्यापक संशोधकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन प्राप्त होणाऱ्या निधीचा विद्यार्थ्यांना संशोधनासाठी शिष्यवृत्ती तसेच शैक्षणिक सुविधांचे बळकटीकरण करून देशाच्या कृषि विकासासाठी अधिक सक्षम व कौशल्यपुर्ण मनुष्यबळ निर्मितीवर भर देण्यात येईल अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.