Pages

Monday, June 29, 2020

वनामकृवित एकात्मिक तण व्यवस्थापन यावर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतील भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रक्लप (नाहेप) व कृषि विद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक 24 जुन रोजी तणनाशकांचा कार्यक्षम वापर व एकात्मिक तण व्यवस्थापन या विषयांवर एक दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्‍या  उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, लातूर विभागीय कृषि सहसंचालक डॉ. टी. एन. जगताप, औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ. डी.एल. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणा डॉ. धर्मराज गोखले यांनी पिक लागवडीत तण व्यवस्थापणास मोठे महत्‍व असुन तणामुळे विविध पिकामध्ये 30 ते 70 टक्क्यापर्यंत पिक उत्पादनात घट येत असल्‍याचे सांगितले तर   डॉ. देवराव देवसरकर यांनी रासायणिक तणनाशकाचा वापर आवश्यक ठिकाणी करुन एकात्मीक तण व्यवस्थापावर जास्त भर देण्‍याचा सल्‍ला दिला. भाषणात डॉ. टी. एन. जगताप यांनी सद्याच्या परिस्थीतीसोयाबीनची उगवणुक कमी झाल्यामुळे ज्या शेत-यांनी तणनाशकाचा वापर केला असेल त्याच ठिकाणी इतर कोणती पिके घेता येतील यावर शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन करावे असे सांगितले तर डॉ. डी. एल. जाधव यांनी तण खाई धन या म्हणी प्रमाणे तणाचे व्यवस्थापन करणे फार गरजेचे असल्‍याचे सांगितले.

तांत्रीक सत्रा तणनाशकांचा अचुक व कार्यक्षम वापर यावर डॉ. सुनीता पवार यांनी मार्गदर्शन केले तर डॉ. अशोक जाधव यांनी नगदी पीके ऊस, हळद, भाजीपाला, फळपिकातील तण व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. ऑनलाईन प्रशिक्षणात 450 प्रशिक्षणार्थीनी नोंदणी करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील विविध कृषि विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर अभ्याक्रमाचे विद्यार्था, प्राध्यापक,   शेतकरी, विविध कृषि संस्थेतील शास्त्रज्ञ आदींनी सहभाग नोदंवीला. प्रशिक्षणाचे आयोजन कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बि. व्ही. आसेवार होते. प्रशिक्षणात विद्यापीठ शास्त्रज्ञांनी शेतक-यांच्‍या  तण व्यवस्थापनावरील प्रश्नांची उत्तर दिले. प्रशिक्षणाचे प्रास्तविक डॉ. बि. व्ही. आसेवार यांनी केले तर आभार डॉ. सुनिता पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तांत्रीक नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांच्‍यासह डॉ. स्वाती मुंढे, डॉ. रश्मी बंगाळे, डॉ. अविनाश काकडे आदींनी पुढाकार घेतला.