Pages

Wednesday, July 1, 2020

शेतकरी बांधवासाठी समर्पण भावनेने कार्य करा ......... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित कृषि दिन साजरा, कृषि संजीवनी सप्‍ताह अभियानास प्रारंभ   

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली. स्‍व.  वसंतराव नाईक यांच्‍या स्‍मारकाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. कृषि दिनाचे औजित्‍य साधुन दिनांक 1 जुलै ते 7 जुलै दरम्‍यान कृषि संजीवनी सप्‍ताहा  पाळण्‍यात येणार सदरिल कृषि संजीवनी सप्‍ताहा अभियानाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ संतोष आळसे, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ अरविंद सावते, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, प्रभारी संशोधन संचालक डॉ गजेंद्र लोंढे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना कुलगूरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कोरोना विषाणु रोगाच्‍या प्रादुर्भावात प्रतिकुल परिस्थितीत देखिल शेतकरी बांधवानी नागरिकांना अन्‍नधान्‍य, भाजीपाला, फळे आदींचा रास्‍त दरात उपलब्‍ध करून दिले. या संकटप्रसंगी शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, ही बाब अधोरेखित झाली आहे. शेतकरी बांधवांच्‍या सामाजिक बांधिलकीचा  विचार करता, आपण विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी समर्पण भावनेने कृषी तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य करून शेतक-यांच्‍या मनात स्‍थान निर्माण केले पाहिजे. विद्यापीठ प्राध्‍यापकांनीही लॉकडाऊनच्‍या परिस्थितीत स्‍वत:तील अध्‍यापन कौशल्‍य वृध्‍दींगत करण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे. विद्यापीठात नवीन कार्य संस्‍कृती निर्माण करतांना अनेक अडचणी आल्‍या. गेल्‍या दोन वर्षात हरित विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ व सुरक्षित विद्यापीठ संकल्‍पन घेऊन सर्वांच्‍या सहकार्याने आपण मार्गक्रमण करित आहोत, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.  

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा विजय जाधव यांनी केले तर आभार डॉ रणजित चव्‍हाण यांनी मानले. यावेळी विद्यापीठ परिसरात मोठया प्रमाणात वृक्षलागवड करण्‍यात आली. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी विद्यार्थ्‍यी डॉ पी आर देशमुख, डॉ उदय आळसे, डॉ महेश देशमुख, डॉ एच व्‍ही काळपांडे, राष्‍ट्रीय छात्रसेनेचे डॉ जयकुमार देशमुख, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे डॉ अनुराधा लाड, डॉ विनोद शिंदे आदींसह परभणी कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी  परिश्रम घेतले. कृषि संजीवनी सप्‍ताहानिमित्‍त विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतक-यांच्‍या बांधावर जाऊन मार्गदर्शन करणार आहेत, याकरिता मराठवाडयातील आठही जिल्‍हयात कृषि विभागाच्‍या समन्‍वयाने विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचे पथक स्‍थापन करण्‍यात आले आहे.