वनामकृविचा शास्त्रज्ञांचा कीड व्यवस्थापनकरिता सल्ला
पाने खाणारी अळी |
सध्यस्थितीत संत्रा व मोसंबीच्या फळबागांना नवीन नवती फुटत असुन
मोठया बागांना मृगबहाराची फुलधारणा होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या
फळपिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत कीटकशास्त्रज्ञ
डॉ. अनंत बडगुजर, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे यांनी मौजे जांब, मांडाखळी, सोन्ना,
पेडगाव, मानवत आदीं ठिकाणी शेतक-यांच्या फळबागाची पाहणी
केली असता मोसंबी व संत्रा पिकावर पाने खाणारी अळी (लेमन बटरफ्लाय) व सिट्रस सायला या कीडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळुन
आला आहे. या कीडींचे व्यवस्थापन करण्यात करिता पुढील उपाय योजना शास्त्रज्ञांनी
सुचविल्या आहेत.
पाने खाणारी अळी - या किडीचा त्रास प्रामुख्याने रोपवाटीकेत होतो. याचे पतंग काळया
पिवळया आकर्षक रंगाचे असतात. लहान अळया तपकिरी
रंगाच्या व त्यावर पांढरे ठिपके असतात, त्यामुळे त्या पक्षाची विष्ठा पडल्यासारख्या दिसतात. मोठया अळया हिरवट रंगाच्या
असतात. या अळया कोवळी पाने खातात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण झाड पर्णविरहीत
दिसते.
पाने खाणारी अळीचे व्यवस्थापन :अंडी, अळया व कोष हातांनी गोळा करुन रॉकेल मिश्रीत पाण्यात बुडवून मारणे. झाड हालवून खाली पडलेल्या अळया वेचून नष्ट करणे. बागेतील अथवा आजुबाजूस असलेले बावची या तणाचा बंदोबस्त करावा. तसेच मित्र कीटक जसे ट्रायकोग्रामा, अपेन्टेलस, कॅरोप्स, ब्रॅचीमेरीया, टेरोमॅल्स आदींचे संवर्धन करावे.
फवारणी - बॅसिलस थुरीनजिएन्सीस (बीटी) पावडरची
प्रति दहा लिटर पाण्यात 20 ग्रॅम याप्रमाणे मिसळुन फवारणी करावी. किंवा क्विनालफॉस
20 ईसी 30 मि. ली. किंवा थायोडीकार्ब 70 डब्लुपी 10 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
सिट्रस सायला कीड - या किडीचा प्रौढ पिवळसर करडया रंगाचा असतो. पंखाच्या विशिष्ट
रचनेमुळे त्याचा मागील भाग उंचावल्यासारखा दिसतो. पिल्ले मळकट रंगाची असतात. या किडींचे
पिल्ले कवळी पाने व फांदया यातुन रसशोषण करतात. त्यामुळे कवळी पाने व कळयांची गळ होते
व त्याचा उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
सिट्रस सायला कीडीचे व्यवस्थापन : या कीडीचे पर्यायी खादय वनस्पती (कडीपत्ता) मोसंबीच्या बागेमध्ये
असु नये. पिवळया चिकट सापळयाचा वापर करावा. ढालकिडा, क्रायसोपा,सिरफीड माशी, टॅमरॅक्सीया
रॅडीयाटा आदी मित्रकीडीचे संवर्धन करावे.
फवारणी - इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल 1 मि.ली. किंवा
थायामिथॉक्झाम 25 डब्ल्यु जी 1 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून नवती फुटण्याच्या
वेळी म्हणजे जुन-जुलै मध्ये सायलाचा प्रादुर्भाव दिसताच करावा. गरज पडल्यास पंधरा
दिवसाच्या आंतराने दुसरी फवारणी करावी, परंतु कीटकनाशक बदलुन वापरावे.
वरील कीडीचे व्यवस्थापन करून होणारे संभाव्य नुकसान टाळावे, असे आवाहन विद्यापीठातील कृषि किटकशास्त्र
विभागाचे विभाग प्रमुख डॉ.संजीव बंटेवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
पाने खाणारी अळीचा कोष |
पाने खाणारी अळीची अंडीी |
पाने खाणारी लहान अळी |
पाने खाणारी अळीचा पतंग |
सिट्रस सायला |