Pages

Wednesday, July 29, 2020

वनामकृविच्‍या वतीने आयोजित वेबिनार मध्‍ये शेतमाल प्रक्रिया, निर्यात व विक्री व्यवस्थापन यावर मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप)नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले असुन सदरिल वेबिनार मध्‍ये दिनांक २९ जुलै रोजी यशस्‍वी उद्योजकांनी मार्गदर्शन केले, यात बेंगलोर येथील नामधारी सिड्स प्रा. लिमिटेडचे नाशिकस्थित महाव्यवस्थापक व संचालक श्री सुनिल अवारी यांनी शेतीमाल पुर्व प्रक्रिया तंत्रज्ञान व निर्यात यावर मार्गदर्शन केले तसेच परभणी येथील विश्वास अॅग्रो फुड प्रॉडक्ट्सचे संचालक श्री युसुफ ईनामदार यांनी गट शेती कृषि प्रक्रिया उद्योग (पेरु, पपई, हळद) तसेच बेंगलोर येथील फुड सेफ्टी अॅमेझॉनचे वरिष्ठ व्यवस्थापक श्री शशिन शोभने यांनी फळे व भाजीपाला पुर्व पक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापन तर बेंगलोर येथील क्लाऊंड टेल इंडिया प्रा.लि.चे प्रॉडक्ट कम्प्लायंस मॅनेजर श्री सचिन अचिंतलवार यांनी शेतीमाल पुर्व प्रक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात श्री सुनील अवारी म्‍हणाले की, शेती ही पांरपारिक पध्दतीने न करता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन केल्यास निश्चितपणे मोठया प्रमाणावर नफा मिळू शकतो. शेती करतांना बाजारात मागणी असणा-या पिकांची लागवड करावी. मल्चींग, माती विरहीत हायड्रापोनिक्स, ग्रीन हाऊस मध्‍ये लागवड आदी आधुनिक पध्दतीने ठरावीक पिकाची नियोजनबध्द लागवड करावी. नाशिक पॅटर्न प्रमाणे गट शेती मोठा प्रमाणावर यशस्‍वी झाली आहे. उत्पादीत झालेल्या शेतीमालाची काढणी पश्चात आधुनिक तंत्रज्ञान जसे तापमान नियोजन, पुरवठा साखळी, प्लास्टिक क्रेटचा वापर, प्रतवारी, पॅकिंग, प्रिकुलींग इत्यादी नाविन्य पुर्ण पध्दतींचा अवलंब करुन बाजारात दिड पटीने जास्त नफा मिळू शकतो असे प्रतिपादन त्‍यांनी केले. त्याच प्रमाणे शेतमालाची योग्य व एकसारख्या आकारात प्रतवारी केल्यानंतर आकर्षित पॅकिंग करुन देशाबाहेर निर्यात करणेसाठी विविध प्रकारचे शासकीय मानके विचारात घेऊन मोठया प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असे ही सुचविले.

श्री युसूफ इनामदार यांनी अन्न प्रक्रिया उद्योगात येणा-या विविध अडचणी, उपाय आणि त्यांचे अनुभव याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच पेरु, पपई व हळद या पिकांची आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीने लागवड कशी करावी व त्यापासून मिळणा-या उत्पादनाचे विविध मुल्यवर्धीत पदार्थात रुपांतर करणे बाबत सखोल मार्गदर्शन केले. नवउद्योजकांना प्रक्रिया व मुल्यवर्धन व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे, बँक व इतर शासकीय मार्गाने कमी वेळेत अर्थ सहाय्य मिळावे आणि त्यासाठी लागणारा परवाना देखील अखिल भारतीय स्तरावर म्हणजे एकाच छत्रा खाली असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री शशिन शोभने यांनी फळे व भाजीपाला पुर्व पक्रिया व ऑनलाईन विक्रि व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक विविध महत्वाच्चा बाबी जसे शेतीतील गुणवत्ता कशी टिकवावी, विक्री करिता कोणत्या प्रकारचा परवाना लागतो, शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आवश्यक गुणवत्ता तपासणी इत्यादी बाबत सखोल मार्गदर्शन केले. त्‍यांनी कुठल्याही प्रकारचा शेतमाल प्रक्रिया उद्योगाच्या यशस्वीतेसाठी गटशेती हा उत्तम पर्याय असल्याचे सुचविले.

श्री सचिन अचिंतलवार यांनी ऑनलाईन विक्रि व्यवस्थापना संबंधी माहिती देताना सद्यस्थितीत बाजारपेठेत उपलब्ध असणा­या ऑनलाईन सुविधांबाबत मार्गदर्शन केले यात विशेषत: अॅमेझॉन तथा फ्लिपकार्ट व जिओ मार्ट सारख्या विविध अॅप द्वारे आपण तयार केलेला माल ग्राहकांपर्यंत कसा पोहचतो याबाबत माहिती दिली. सदरिल ऑनलाईन विक्रि व्यवस्थापन करतांना आवश्यक सर्व बाबी तथा परवाने उदा. जिएसटी प्रमाणत्र, एफ.एस.एस.ए.आय. प्रमाणपत्र, शासकिय धोरणे इत्यादी बद्दल सखोल माहिती दिली. श्री. अचिंतलवार यांनी यावेळी शेतमालप्रक्रिया उद्योगामध्ये केवळ प्रक्रिया व मुल्यवर्धन एवढेच पर्याय नसुन या पेक्षाही वेगळ्या प्रकारे उत्पादीत माल ग्राहकापर्यंत पोहचवुन मोठया प्रमाणावर नफा मिळवु शकतो असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक आयोजक प्रा. डॉ. राजेश क्षीरसागर यांनी केले तर आयोजन सचिव प्रा. शाम गरुड यांनी आभार मानले. वेबिनार मध्‍ये कृषिचे विद्यार्थी शेतकरी बांधव, महिला बचत गट सदस्य उद्योजकांनी सहभाग नोंद‍विला होता.