Pages

Thursday, August 13, 2020

हॉर्टसॅप अंतर्गत औरंगाबाद व जालना जिल्हयातील कृषि विभागातील अधिकारी व कर्मचा-यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठीतील कृषि कीटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने "फळपिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप प्रकल्‍प) 2020-21 अंतर्गत" मराठवाडा विभागातील औरंगाबाद व जालना जिल्हयातील कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, किड सर्वेक्षक व किड नियंत्रक यांच्यासाठी कोरोना रोगाच्या पार्श्वभुमीवर दिनांक 12 ऑगस्‍ट रोजी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जालना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिंदे, विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगूरु मा डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील संत्रा, मोसंबी लागवडी खालील क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणावर वाढ होत असुन मराठवाडयातील मोसंबीची गुणवत्ता चांगली असल्यामुळे आगामी काळात देशभरात पोहचेल. मोसंबी लागवडीकरिता रंगपूर खुंटावरील कलमे वापरावीत. मोसंबी लागवडीचे विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचविणे गरजेचे असून हॉर्टसॅप हा प्रकल्प कीड - रोग व्यवस्थापनासाठी सक्षमपणे कार्यरत आहे. दुष्काळ परिस्थीती बागा वाचविण्यासाठी आपत्कालीन उपाय योजनाचा अवलंब करण्‍याची गरज असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.  

मार्गदर्शनात डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी प्रकल्प अधिक सक्षमपणे राबवावा असे सांगितले तर डॉ. देवराव देवसरकर यांनी शेतक-यांना वेळेत सल्ला देणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. डॉ. दिनकर जाधव यांनी मोसंबीवरील कीड-रोगाचे सर्वेक्षण अचूक वेळेत करावे अशा सुचना कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचा-यांना दिल्या तर डॉ. संजीव बंटेवाड यांनी हॉर्टसॅप हा महाराष्ट्रातील अभिनव प्रकल्प असून कीड-रोगाच्या व्यवस्थापनासाठी फार महत्वाचा असल्‍याचे सांगितले.

तांत्र‍िक सत्रा मोसंबी बागेची लागवड व बहार व्यवस्थापनावर डॉ. संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले तर मोसंबीवरील किडीची ओळख व व्यवस्थापनावर डॉ. बस्वराज भेदे, फळातील रसशोषणारा पतंग व्यवस्थापनावर डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. अनंत बडगुजर यांनी प्रकल्पाची ओळख, उदेश व मोसंबीवरील किडींचे सर्वेक्षण कसे करावे यावर माहिती दिला. डॉ. प्रफुल्ल घंटे यांनी मोसंबीवरील रोग व्यवस्थापन, डॉ. संजोग बोकन यांनी नमूना तक्त्यातील नोंदणी, श्री. निलेश पटेल यांनी ऑनलाईन प्रपत्राच्या नोंदीची माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले व आभार डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले. ऑनलाईन कार्यक्रमा औरंगाबाद व जालना जिल्हयातील कृषि विभागाचे साधारणत 90 अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थ‍ित होते.