Pages

Tuesday, August 18, 2020

वनामकृवितील विद्यापीठ ग्रंथालयात माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम प्रेरणाकेंद्राची स्‍थापना

माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम यांच्‍या व्‍याख्‍यानात आदर्श समाज घडविण्‍याची ताकद .... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यापीठ ग्रंथालयात माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम प्रेरणा केंद्राची स्‍थापना करण्‍यात आली असुन स्‍वातंत्र्य दिनाचे औचित्‍य साधुन दिनांक १५ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव श्री रणजित पाटील, विद्यापीठ नियंत्रक श्री एन एस राठोड, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जयश्री झेंड, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम, डॉ राजेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, एका चांगल्‍या व्‍याख्‍यानाने व्‍यक्‍तीचे आयुष्‍य बदलु शकते. माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम यांच्‍या व्‍याख्‍यानात आदर्श समाज घडविण्‍याची ताकद आहे. व्‍यक्‍तीतील उच्‍च बौद्धिकता और नैतिकता समाजास दिशा देण्‍याचे कार्य करते. परभणी कृषि विद्यापीठातुन अनेक अधिकार व कृषि विस्‍तारक घडतात, परंतु त्‍यांची निमिमत्‍ता चांगली असेल तर समाजाचे चित्र बदलु शकते. मा डॉ अब्दुल कलाम यांचे देशाप्रती व कामाप्रती असलेला त्‍याग आपला समोर आदर्श ठेवुन प्रत्‍येकाने कार्य करावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम प्रेरणा केंद्राची स्‍थापना ग्रंथालयातील स्‍वतंत्र कक्षात करण्‍यात आली असुन यात दहा संगणकासह हेडफोनची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. यात केवळ माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम यांच्‍या प्रेरणादायी व्‍याख्‍यानाचा संग्रहीत चित्रफिती ठेवण्‍यात आले आहेत, त्‍यांच्‍या ग्रंथसंपदाचा संग्रह केलेला आहे. सदरिल ग्रंथसंपदा ग्रंथालय परिचराक श्री मुंजाजी शिंदे यांनी या केंद्रास भेट दिली आहे. विद्यापीठातील विद्यार्थी आपला अभ्यासातुन तणाव कमी करण्‍यासाठी काही वेळेसाठी सदरिल प्रेरणा केंद्रात येऊन माजी राष्‍ट्रपती डॉ ए पी जी अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी व्‍याख्‍याने एैकु शकतील अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच त्‍यांच्‍या व्‍याख्‍यानांची स्‍वतंत्र संकेतस्‍थळाची निर्मिती करण्‍यात आली अशी माहिती विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम यांनी दिली. यावेळी डाॅ संतोष फुलारी, सहाय्यक ग्रंथपाल डॉ वंदना जाधव, श्री मोहन झोरे, श्री मुंजाजी शिंदे आदीसह ग्रंथालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.