Pages

Tuesday, August 25, 2020

सोयाबीनवरील शेंगा करपा रोगाचे व्यवस्थापन


मराठवाडयात सततच्या पावसामुळे सोयाबीनवर शेंगा करपा हा रोग काही भागात दिसून येत आहे व इतरही भागात येण्याची शक्यता आहे, तरी भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी त्याचे वेळीच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

रोगाची लक्षणे व नुकसान

हा रोग कोलोटोट्रीचम ट्रुन्‍कयॉडॅम (Collototrichum truncatum) हया बुरशीमुळे होतो. यात पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व त्यावर नंतर काळी सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान व पोचट राहतो व त्याचा बी तयार होण्यावर विपरीत परिणाम होतो.

रोगाचे व्यवस्थापन

रोग नियंत्रणासाठी व इतर निरोगी सोयाबीन वर पसरू नये म्हणून कार्बेन्डाझिम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) - ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल १०% अधिक सल्फर ६५ % (संयुक्त बुरशीनाशक) - ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ % - २५० मिली प्रति एकर फवारावे. आवश्यकता वाटल्यास दहा दिवसांनी परत एकदा फवारणी करावी.

वरील बुरशीनाशकाचे प्रमाण सर्व प्रकारच्या पंपाकरिता आहे, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने देण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या कृषि माहिती वाहिनी दुरध्वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधवा.

संदर्भ :  कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि संदेश क्रमांक: १२/२०२० ( २५ ऑगस्ट २०२०)