Pages

Friday, August 7, 2020

मका पिकावरील नवीन लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), कृषि विभाग (औरंगाबाद) आणि साऊथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटर, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 ऑगस्‍ट रोजी मक्यावरिल लष्करी अळी बाबत जागरूकता व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन वेबनरच्‍या माध्‍यमातुन संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवहे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष तथा साऊथ एशिया बायोटेक्नोलॉजी सेंटरचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी हे होते. कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, नवी दिल्ली येथील आयआयएमआर माजी संचालक डॉ. सनदास, एसएबीसी संचालक डॉ. भगीरथ चधरी. आयोजक औरंगाबाद विभागीय कृषि सहसंचालक डॉ. दिनकर जाधव, विभाग प्रमुख  डॉ. संजीव बंटेव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहूणे मा डॉ. चारुदत्त मायी मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी बांधवांनी कीड व्‍यवस्‍थापन करतांना, शक्यतो रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळुन जैविक कीड नियंत्रणावर भर दयावा. पिक अवस्थेनुसार जसे की 40, 80, 120 या दिवसा दरम्यान काय करायचे याचे वेळापत्रक ठरवावे. लष्करी अळीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास शिफारशीनुसार कीटकनाशकांची योग्य मात्रा सुरक्षिततेची काळजी घेउनच फवारणी करावी, असा सल्‍ला देऊन नांदेड जिल्हयात कापसावरील राबविण्यात आलेल्या आष्टा प्रकल्पाचा उल्लेख करीत त्यासारखा उपक्रम लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी राबवावा असे सुचविले. ऑनलाईन पध्‍दतीने योग्‍य वेळी कार्यक्रमाच्‍या आयोजनाबाबत माननीय कुलगुरु व कीटकशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांचे त्‍यांनी कौतुक केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरु मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील जालना व औरंगाबाद जिल्हयात मका लागवडी खालील क्षेत्र जास्त असुन शेतकरी बांधवा या पिकाकडे नगदी पिक म्हणून लागवड करीत आहेत. शेतकरी बांधवांनी मका पिकावरील कीडींचे व्यवस्थापन विद्यापीठ शिफारसीत तंत्रज्ञानाचा वापर करावा.

मार्गदर्शनात डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी लष्करी ळीच्या व्यवस्थापनासाठी मशगतीय, यांत्रिक, जविक पध्दतीचा वापर व योग्य वेळी काळजी घेऊन रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्‍याचा सल्‍ला दिला तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी सातत्‍यांनी शेतकरी बांधवानी कृषि विस्‍तारक व कृषि शास्‍त्रज्ञांशी संवाद साधवा असे सांगितले. डॉ. देवराव देवसरकर यांनी लष्करी अळी नियंत्रनासाठी ट्राकोकार्ड व निंबोळी अर्काचा वापर करावा असे सांगितले.

तांत्रिक सत्रात विविध बाबींवर मार्गदर्शन

तांत्रिक सत्रात डॉ. भगीरथ चौधरी यांनी मका पेरणी केल्यापासुन 20 दिवसा पर्यंत पिक संरक्षण करणे गरजेचे असल्‍याचे सां‍गुन त्यामध्ये कामगंध सापळयाचा वापर करावा, शिफारशी नुसार कीटकनाशकांची फवारणी करावीडॉ. दिनकर जाधव यांनी सध्या औरंगाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असुन कृषि कीटकशास्त्रज्ञांनी वेळोवेळी शेतक-यांना लष्करी अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापनााबत मार्गदर्शन केल्या बददल आभार मानले. डॉ. बस्वराज भेदे यांनी लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत सविस्‍तर सादरिकरण करून मार्गदर्शनात योग्य वेळी व्यवस्थापन कसे करावे, बीजप्रक्रीयेचे महत्व, सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे व मोठया प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी 15 कामगंध सापळे प्रती एकरी लावावेत, असा सल्‍ला दिला. सुरुवातीच्या 50 दिवसापर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी, त्यामूळे मित्रकीटकांचे संवर्धन होईल. मका क्षेत्र कमी असल्यास भौतीक पध्दतीमध्ये बारीक वाळू व चुना 9:1 याप्रमाणात पोंग्यामध्ये टाकावे, जैविक कीड नियंत्रणामध्ये मेटा-हायझीयम ॲनिसोप्ली 50 ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई 50 ग्रॅम व तु-याची अवस्था असतांना पिकावर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी टाळावी तसेच  अळीची आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास इमामेक्टीन बेंन्झोएट 5 एसजी 4 ग्रॅम किंवा  थायमिथोक्झाम 12.6 + लॅमडासाहॅलोथ्रीन 9.5 झेडसी  2.5 मिली ‍किंवा  क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 एससी 4 मिली यापैकी कोणत्‍याही एका किटकनाशकाची फवारणी करावी, असे सांगितले.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि कीटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवयांनी केले. सुत्रसंचालन डॉ. फारीया खान तर आभार डॉ. धीरजकुमार कदम यांनी मानले. सदरिल राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळेत मोठया प्रमाणात मका उत्‍पादक, कृषि विस्‍तारक व अधिकारी सहभागी झाले होते.