शनिवारी उसावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी चर्चासत्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दर शनिवारी ‘सदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलीत वापर’ राज्यस्तरीय ऑनलाईन वेबीनार मालिकेचे आयोजन करण्यात आले असुन मालिकेच्या आठव्या सत्रात दिनांक ५ सप्टेंबर रोजी ‘ प्रभावी जैविक कीडनाशकांचा कार्यक्षम वापर ’ या विषयावर किटकशास्त्रज्ञ डॉ.श्रध्दा धुरगुडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु मा डॉ.अशोक ढवण हे होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ.अशोक ढवण म्हणाले की, निसर्गात कुठल्याही पिकाच्या कीडी सोबतच किडींच्या शत्रू किडी म्हणजेच आपल्या मित्र किडींचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो. ह्या मित्र किडी नैसर्गिक रित्या किडींचे व्यवस्थापन करत असतात. त्यामुळे ह्या मित्र किडींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. विशेषतः जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात, विशेषतः सेंद्रिय भाजीपाला घेतात त्यांना अशा मित्र किडींचा ज्यामध्ये बुरशीजन्य कीटकनाशके, परोपजीवी कीटक, परभक्षी कीटक तसेच वनस्पतिजन्य कीटकनाशके यांचा वापर करून कमी खर्चा मध्ये कीड व्यवस्थापन करता येते व त्याद्वारे कीटकनाशक मुळे आपल्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम ही कमी करता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा जैविक बुरशींची, मित्र किडींची ओळख करून योग्य प्रकारे किडींचे व्यवस्थापन करावे.
कार्यक्रमात डॉ.श्रध्दा धुरगुडे यांनी जैविक कीडनाशकांची ओळख व त्यांचा कीड व्यवस्थापनात वापर याविषयी सखोल मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात त्यांनी ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकाची ओळख व त्याचा कुठल्या पिकांत कुठल्या किडीसाठी वापर करता येईल, ट्रायकोकार्ड वापर याविषयी सविस्तर सांगितले. किडी सोबतच जैविक पद्धतीने तणनियंत्रण सुद्धा करता येते याविषयी सांगताना त्यांनी गाजर गवतावर उपजीविका करणाऱ्या झायगोग्रामा मित्रकिडी बद्दल मार्गदर्शन केले. वनस्पतीजन्य जैविक कीडनाशक मध्ये निंबोळी अर्काचे गुणधर्म, निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत व फायदे याविषयी सांगून विविध बुरशीजन्य जैविक कीडनाशकांची माहिती दिली.
शेतकरी बांधवांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी उत्तरे दिली. सुत्रसंचालन डॉ. फरिया खान यांनी केले. कार्यक्रमास झुम मिटिंगच्या माध्यमातुन 200 हुन अधिक तर युटयुबच्या माध्यमातुन 700 पेक्षा अधिक शेतकरी व कृषि विस्तारकांनी सहभाग नोंदवीला.
शनिवारी उसावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन
सदरिल राज्यस्तरीय वेबीनार मालिकेचे नववे सत्र शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सांयकाळी ७ वाजता आयोजित केले असुन यात उसावरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर किटकशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सोनकांबळे हे झुम मिटिंगच्या माध्यमातुन मार्गदर्शन करणार आहेत. याचे थेट प्रक्षेपण विद्यापीठ युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे, तरी या मालिकेत बहुसंख्य शेतक-यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.