Pages

Sunday, September 13, 2020

वनामकृविच्‍या वतीने ऊसावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर ऑनलाईन मालिकेत मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍प व कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने सदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलीत वापर यावर राज्यस्तरीय वेबीनार मालिकेचे आयोजन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले असुन या मालिकेत दर शनिवार ऑनलाईन मार्गदर्शन करण्‍यात येते. दि. १२ सप्टेंबर रोजी ऊसावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन यावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. मिलींद सोनकांबळे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे होते.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवाण यांनी ऊस वरील किडीचे वेळीच व्यवस्थापन अत्‍यंत आवश्‍यक असुन केवळ रासायनिक किटकनाशकांचा वापर न करता, ए‍कात्मिक किड व्‍यवस्‍थापन करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमात ऊसावरील किडीच्या एकात्मिक व्यवस्थापना यावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. मिलींद सोनकांबळे यांनी सखोल मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात ते म्‍हणाले की, ऊस हे महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील नगदी पिक असून खोडकीडी, रसशोषक किडी पांढरी माशी, लोकरी मावा, पायरिला, पिठया ढेकूण, खवले कीड, जमिनीतील किडी हुमणी व वाळवी आदीमुळे मोठे नुकसान होते. ऊसाची लागवड आणि काढणी वेळेवर केल्‍यास किडींचे योग्य व्यस्थापन करता येईल. एकात्मिक किड व्यस्थापना खोडकिडाग्रस्त ऊसाचे पोंगे / शेंडे काढून अळीसह नष्ट करावेत, किडींची अंडी किंवा अंडीपुंज असलेली पाने गोळा करुन जाळून टाकावीत किंवा जमिनीत पुरावीत. ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्यात १५ दिवसापेक्षा जास्त ताण पडल्यास (पावसाळयात) पाणी द्यावे. मार्च ते मे महिन्यात लागवड केलेल्या ऊसावर पांढरी माशी ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात मोठया प्रमाणात आढळते, म्हणून ऊसाची लागवड किंवा तोड उशिरा करु नये, हुमणी अळीसाठी पुर्ण कुजलेल्या शे खतांचा वापर करावा. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी लागवडीनंतर ३० दिवसांनी हेक्टरी २५ कामगंध सापळे लावावे. जैविक पध्दती ट्रायकोग्रामा जापोनिकम या परोपजीवी गांधीलमाशीची हेक्‍टरी ५०,००० अंडी किंवा ट्रायकोग्रामा चिलानिस ची हेक्‍टरी ,५०,००० अंडी लागवडीनंतर ४५ दिवसांनी १० दिवसाच्या अंतराने ४ ते ६  वेळा सोडावीत. पायरिला किडीच्या नियंत्रणासाठी ईपीरीकॅनीया मेलॅनोल्युका या परोपजीवी कीटकाचे १००० कोष किंवा १ लाख अंडी हेक्टरी सोडावेत, लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी डिफा अॅफिडीव्होरा (कोनोबाथ्रा) याच्या १००० अळया किंवा कोष, सिरफीड माशी व मायक्रोमस यांची २५०० अळया प्रति क्टरी या प्रमाणत या परभक्षी कीटकांचा वापर करावा तसेच रासायनिक किटकनाशकांची शिफारसी प्रमाणे फवारणी करण्‍याचा सल्‍ला दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. डिगांबर पटाईत यांनी केले. कार्यक्रमास मोठया संख्‍येने शेतकरी व कृषि विस्‍तारकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवीला. तसेच युटूब च्या माध्यमातुन शेतक-यांनी सहभाग नोंदवीला.

राज्यस्तरीय वेबीनार मालिकेचा पुढचा भाग शनिवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता आयोजित केला आहे, यात तुरीवरील प्रमुख किडिंचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यांची लिंक शनिवारी सकाळी प्रसारीत करण्यात येणार असुन विद्यापीठ युटुब्‍य चॅनेलवर ही थेट प्रेक्षपण होणार आहे. या कार्यक्रमात बहुसंख्य शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.