Pages

Friday, September 4, 2020

वनामकृविच्‍या आयोजित हळद व सोयाबीन प्रकिया तंत्रज्ञान व मुल्यवर्धन यावरील ऑनलाईन वेबिनारचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, परभणी व फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने हळद व सोयाबीन प्रकिया तंत्रज्ञान व मुल्यवर्धन यावर दिनांक ३ व ४ सप्‍टेंबर रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले, प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक ३ सप्‍टेंबर रोजी झाले. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून कोरडवाहू संशोधन केंद्राचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. डब्ल्यु. एन. नारखेडे हे उपस्थित होते. तर प्रशिक्षण आयोजक सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, महिला आर्थिक विकास महामंडळच्‍या परभणी जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती निता अंभोरे, फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई संचालक श्री. उमेश कांबळे, अन्नतंत्र महाविद्यालयाच्र प्रा डॉ. राजेश क्षीरसागर, प्रगतशील शेतकरी श्री. नरेश शिंदे, मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे इत्यादी उपस्थित होते.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल म्‍हणाले की, आज शेतीक्षेत्रा समोर अनेक आव्हाने आहेत, हवामान बदल, बदलते बाजारभाव, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, जमिनीचे आरोग्याचा प्रश्‍न, निविष्ठांच्या वाढलेल्या किंमती, विविध संसाधनासाठीची स्पर्धा, उत्पादनातील चढउतार यामुळे शेतीतील जोखीम वाढली आहे. दुसरीकडे एवढी जिद्द व जोखीम आणि कष्ट घेऊन शेतकरी अन्नधान्य उत्पादन घेतात,  परंतु काढणी पश्‍चात तंत्रज्ञाना अभावी दरवर्षी २५ ते ३० टक्क्याच्या शेतमालाची नासाडी होते. शेतीस प्रक्रिया उद्योगाची जोड मिळाल्यास ही नासाडी कमी करता येईल. बदलते बाजारभावातून होणारे नुकसान कमी होईल आणि एक नविन बाजारपेठ मिळून चार पैसे अधिक मिळतील, रोजगार संधी वाढतील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

आपल्‍या भाषणात डॉ. डब्ल्यु. एन. नारखेडे म्‍हणाले की, शेती क्षेत्रातील जोखीम कमी करण्यासाठी, महिलांना व युवकांना स्वावलंबी करण्यासाठी प्रक्रिया उद्योगास मोठा वाव आहे. आपल्या भागात उत्पादित होणारा कच्चा शेतमाल लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योग हाती घेता येईल. लिंबू, आवळा अशा कोरडवाहू फळांपासून प्रक्रियायुक्त पदार्थांच्या माध्यमातून मुल्यवर्धन करावे आणि त्यातून आर्थिक विकास साधने शक्य असल्‍याचे ते म्‍हणाले.

तांत्रिक सत्रात डॉ. राजेश क्षीरसागर यांनी हळद प्रक्रिया तंत्रज्ञान व मुल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले, ते म्‍हणाले की, हळद प्रक्रियेचे तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्‍यक असून बचत गटांच्या माध्यमातून हळद प्रक्रिया व मुल्यवर्धन यास मोठा वाव आहे. श्री. उमेश कांबळे यांनी मराठवाडा विभागात घेतल्या जाणा­या दाळवर्गीय पिकांची प्रतवारी, प्रक्रिया व मुल्यवर्धन करून विक्री करण्यास मोठ्या शहरात मोठा वाव आहे असे सांगितले.  श्री. नरेश शिंदे यांनी हळद विक्री व्यवस्थापनातील आपले अनुभव सांगुन हळद मुल्यवर्धन व प्रक्रियाउद्योग शेतकरी गटाने एकत्र येऊन उभारू शकतात असे ते म्‍हणाले.

प्रास्ताविक डॉ. आनंद गोरे यांनी केले तर श्रीमती निता अंभोरे यांनी कार्यक्रमामागील भुमिका मांडली. सुत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर डॉ. सुनील जावळे यांनी आभार मानले. ऑनलाईन वेबीनारमध्‍ये महिला शेतकरी, शेतकरी बंधु-भगिनी, शेतकरी युवकांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीसाठी डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. सुनिल जावळे, श्री. अभिजीत कदम यांनी परिश्रम घेतले.