Pages

Tuesday, October 6, 2020

पीक निहाय गटांच्या माध्यमातून सेंद्रीय शेती यशस्वी करता येईल... डॉ. आनंद सोळंके

वनामकृवित आयोजित राज्‍यस्‍तरिय पंधरा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, पशुशक्तीचा योग्य वापर योजना, आणि फार्म टु फोर्क सोल्युशन्स, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पंधरा दिवसीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 21 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बाराव्या दिवशी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सेंद्रीय शेतीमधील पीक व्यवस्थापन व सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पीक उत्पादन व बाजारपेठ व्यवस्थापन ’’ या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी राहूरी येथील महत्‍मा फुले कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे व गंगटोक (सिक्किम) येथील भारतीय इलायची संशोधन संस्‍थेच्‍या  क्षेत्रीय संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भारत गुडदे उपस्थित होते. ता. धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील प्रगतशील शेतकरी श्री. रमेशजी साखरकर, आयोजक डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. रणजीत चव्हाण हे ऑनलाईन उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. आनंद सोळंके म्‍हणाले की, सेंद्रीय शेती उत्पादनांस वाढती मागणी पाहता बाजारातील मागणीनुसार योग्य लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतक­यांनी सेंद्रीय शेती करावी. याकरिता गावागावातून प्रयत्न होण्याची गरज असुन शेतकरी बंधू भगिनी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. पीकनिहाय गट स्थापन करून संबंधीत पिकामध्ये सेंद्रीय ब्रँड विकसीत करावा जेणे करून चांगले उत्पादन तसेच अधिक बाजारभाव मिळविता येईल. कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्रे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञान प्रसार करावा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

डॉ. आनंद गोरे यांनी सेंद्रीय शेतीमधील पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शनात सेंद्रीय शेती ही व्यापक संकल्पना असून विविध घटकांचा एकात्मीक पद्धतीने वापर करणे गरजेचे असल्‍याचे सांगुन सेंद्रीय पीक व्यवस्थापनात मशागती पासून, पिकाची लागवड ते काढणी पर्यंत सेंद्रीय लागवड पद्धत व निविष्ठांचा वापर यावर मार्गदर्शन केले. सिक्किम राज्यात प्रमाणीकरणाची प्रक्रिया ही सुलभ कशी करता येईल हे ही सांगीतले.

डॉ. भारत गुडदे यांनी सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पीक उत्पादन व बाजारपेठ व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करतांना देशात पहिले सेंद्रीय राज्य म्हणून पूढे आलेले सिक्किम राज्यातील सेंद्रीय शेती, मसाले पिके व त्यांचे बाजारपेठ व्यवस्थापन यावर विशेष मार्गदर्शन केले. प्रत्येक शेतकरी हा चिकाटीने आणि स्वयंप्रेरणेने सेंद्रीय शेती करत असून शासनाच्या मदतीने सेंद्रीय शेती यशस्वी केल्याचे त्यांनी सांगीतले. सिक्किम राज्यातील शेतकरी स्वत:च्या सेंद्रीय निविष्ठा स्वत: तयार करून लागवडीवरील खर्च कमी करतात, महाराष्ट्रातही त्याचे अनुकरण करता येईल. मसाले पिके व सेंद्रीय उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन आधुनिक पद्धतीने बाजारपेठ व्यवस्थापन केल्यास सेंद्रीय उत्पादनांना चांगला बाजारभाव मिळविता येईल हे त्यांनी सांगीतले.

प्रगतशील शेतकरी श्री. रमेशजी साखरकर यांनी अनुभव सांगतांना म्हणाले की, सेंद्रीय शेतीत देशी वाण व बियाणे यास मोठे महत्व आहे. कीड व रोग यांना प्रतिकारक्षम तसेच जैवविविधता वाढविणा­या विविध प्रकारच्या पिकांच्या वाणांचे संवर्धन होणे व प्रसार होणे ही काळाची गरज आहे. याबाबत शाळा, महाविद्यालये तसेच गावागावात माहितीचा प्रसार होणे व महत्व समजून सांगणे आवश्यक आहे. देशी बियाणे बँकेचे महत्व त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. सुनिल जावळे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. श्रीधर पतंगे, श्री. योगेश थोरवट यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यातील शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ, कृषि विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.