Pages

Friday, December 25, 2020

वनामकृविच्‍या वतीने हॉर्टसॅप अंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न

राज्‍यातील विविध जिल्‍हयातील कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांचा सहभाग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकशास्त्र विभाग व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने फळपिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत ठाणे, जळगाव, पुणे, सातारा, अकोला व भंडारा जिल्हयातील कृषि विभागातील अधिकारी, कर्मचारी, किड सर्वेक्षक,किड नियंत्रक आदीकरिता कोरोना रोगाच्‍या पार्श्वभुमीवर दिनांक २३ डिसेंबर रोजी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणाच्‍या उद्घाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर हे होते तर दापोली कृषि ि‍वद्यापीठाचे किटकशास्‍त्र विभागाचे प्रमुख डॉ. आनंद नरंगलकर तसेच ठाणे, जळगाव, पुणे, सातारा, अकोला व भंडारा चे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडल कृषि अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थ‍ित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. देवराव देवसरकर यांनी शेतक-यांना वेळेत सल्ला देणे गरजेचे असल्‍याचे सांगुन भेंडी कीड-रोगाचे सर्वेक्षण अचूक वेळेत करावे अशा सुचना कृषि विभागाच्या क्षेत्रीय कर्मचा-यांना दिल्या. विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड यांनी हॉर्टसॅप हा महाराष्ट्रातील अभिनव प्रकल्प असून भेंडी पिकावरील कीड-रोगाचे सुरवातीपासून व्यवस्थापन करणे गरजेचे असल्‍याचे सांगितले. तर डॉ. आनंद नरंगलकर यानी भाजीपाला पिकामधे भेंडी हे पीक महत्वाचे असून एकात्मिक किड रोग व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला

तांत्रिक सत्रात डॉ. बस्वराज भेदे यांनी भेंडी पिकावरील कीडीची ओळख व व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले तर भेंडी पिकावरील रोग व्यवस्थापनावर डॉ. चंद्रशेखर अंबडकर यांनी, भेंडी लागवड तंत्रज्ञानाबाबत डॉ. राहूल बघेले यांनी तर डॉ. संजोग बोकन यांनी नमूना तक्त्यातील नोंदणी व किडींचे सर्वेक्षण व श्री. निलेश पटेल यांनी ऑनलाईन प्रपत्राच्या नोंदीची याबाबत मार्गदर्शन केले.

क्रॉपसॅप प्रकल्पाचे समन्वय अधिकारी डॉ. अनंत बडगुजर यांनी प्रकल्‍पाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. अनंत बडगुजर यांनी केले तर आभार डॉ. संजोग बोकन यांनी मानले. ऑनलाईन कार्यक्रमाला ठाणे, जळगाव, पुणे, सातारा, अकोला व भंडारा जिल्हयातील कृषि विभागाचे साधारणत ९५ अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी उपस्थ‍ित होते. प्रशिक्षण यशस्‍वीतेकरिता डॉ. राजरतन खंदारे, गणेशराव खरात व दिपक लाड आदींनी परिश्रम घेतले.