Pages

Monday, December 21, 2020

अंबाजोगाई कृषि महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न

अंबाजोगाई वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या अंबाजोगाई येथील कृषि महाविद्यालयात दि.21 डिसेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना व जिमखाना यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष डॉ.अरूण कदम, डॉ.प्रताप नाळवंडीकर, रक्त संकलन अधिकारी डॉ.सुजित तुमोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्‍हणाले की, रक्तदानातून राष्ट्रसेवा आणि समाजसेवेबरोबरच निःस्वार्थ आणि निरपेक्ष अशी रक्तांची नाती तयार होवू शकतात. तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून खरे जीवनदान आहे. सामाजिक जाणिवेतून समाजसेवा आणि राष्ट्रसेवा या भूमिकेत कृषिचे विद्यार्थी नेहमीच अग्रेसर असतात. सद्यस्थितीत कोव्हिड-19 सारख्या जागतिक महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणेत रक्ताचा तुटवडा वेळीच भरून काढण्यासाठी अशी रक्तदान शिबीरे महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात असे मत त्यांनी व्यक्त केले. 

डॉ. ठोंबरे यांनी सर्वप्रथम स्वतः रक्तदान करून शिबीराची सुरूवात केली.  रक्तदान शिबीरात 50 जणांचे रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली व 10 रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बसलिंगअप्पा कलालबंडी यांनी केले. सुत्रसंचालन कवि राजेश रेवले यांनी केले तर आभार डॉ.सुहास जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा. सुनिल गलांडे, डॉ.नरेश जायेवार, डॉ.विद्या तायडे, डॉ.नरेंद्र कांबळे, अनंत मुंडे, सुनिल गिरी, स्वप्निल शिल्लार, मायादेवी भिकाणे व पुजा वावरगिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आवाहनानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या संकल्पनेतून व संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ.धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनानुसार रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.