Pages

Monday, March 15, 2021

वनामकृवी विकसित शेती अवजारे व सौर उपकरणांचा व्यावसायिक निर्मितीसाठी सामंजस्य करार

गुणवत्‍तापुर्ण विद्यापीठ विकसित शेती अवजारे योग्‍य किंमतीत होणार उपलब्‍ध 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशूशक्तीचा योग्य वापर योजने अंतर्गत विकसित शेती अवजारे तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील विदूत व अन्‍य ऊर्जा विभागाच्‍या वतीने विकसित करण्‍यात आलेले विविध सौर उपकरणे शेतकर्‍यांच्या पसंतीस पडले असुन महाराष्ट्रातील विविध भागातून त्यांची मागणी होत आहे. ही सर्व अवजारे शेतकरी बांधवाना मूबलक प्रमाणात उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्हयातील मे. इन्वेन्टीव्ह सोलूशन्स कंपनीशी विद्यापीठाने व्यावसायीक सामंजस्य करार केला.

सदरिल करारावर दिनांक १५ मार्च रोजी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या प्रमुख उपस्थितीत स्‍वाक्षरी करण्‍यात आली. यावेळी संचालक संशोधन डॉ. दत्ताप्रसाद वासकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, यंत्र विकसित करणार्‍या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे प्रमुख डॉ. राहुल रामटेके, कंपनीचे संचालक व अभियंते श्री प्रशांत पवार, श्री सौरभ जाधव, विद्यापीठातील शास्त्रज्ञ  डी. डी. टेकाळे, ए. ए. वाघमारे, डॉ. मदन पेंडके आदी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले की, कमी श्रमामध्ये अधिकाधिक शेती काम करण्‍याकरिता विद्यापीठ विकसित विविध शेती अवजारे शेतकर्‍यांना अत्‍यंत उपयुक्‍त असुन त्‍यामुळे उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. या सामंजस्‍य करारामुळे शेतकऱ्यांची यंत्राची मागणी पूर्ण होणार आहे. कंपनीने या यंत्राची गुणवत्ता आणि किंमत योग्य राहील याची काळजी घ्यावी जेणे करून जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल, असे ते म्‍हणाले.

या करारानुसार संशोधना आधारे विकसीत केलेले सौर ऊर्जा आधारित जनावरे / पक्षी घाबरवणारे यंत्र, सौर ड्रायर, बैलचलीत फवारणी यंत्र, काडीकचरा गोळा करणे यंत्र, गादी वाफा करून प्लास्टिक अंथरवने यंत्र, तीन पासेचे फनासाहित कोळपे, ट्रॅक्टरचलीत बूम फवारणी संरचना, ऊस व हळद पिकात भर लावणे यंत्र, बहुदेशीय पेरणीसही फवारणी यंत्र आदी अवाजरांची व्यावसायिक दृष्ट्या कंपनीला निर्मिती करता येणार आहे. यावेळी करारावर विद्यापीठाच्या बाजूने संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, डॉ. स्मिता सोलंकी व कंपनीच्या वतीने श्री. प्रशांत पवार यांनी स्वाक्षरी केली.