Pages

Wednesday, March 24, 2021

तेलबिया संशोधनाच्‍या दृष्‍टीने वनामकृवि व हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार

तेलबिया पिकांच्‍या संशोधन कार्य होणार अधिक वृध्दिंगत

तेलबिया संशोधनाच्‍या दृष्‍टीने हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यात दिनांक २२ मार्च रोजी सामंजस्य करार हैद्राबाद येथे करण्यात आला. सामंजस्य करार विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थिती करण्‍यात आला. सामंजस्‍य करारावर भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्‍या संचालिका डॉ. एम. सुजाता व विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी विद्यापीठातील लातुर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. के. घोडके, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, हैद्राबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर बाबुडॉ. रत्नकुमार हे उपस्थित होते.

भारतीय तेलबिया संशोधन संस्‍था देशातील तेलबिया पिक संशोधनात अग्रगण्‍य संस्‍था असुन दोन संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधन कार्यासाठी तसेच पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी हा सामंजस्य करार महत्‍वाचा ठरणार आहे. करारामुळे विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि जैवतंत्रज्ञान तसेच कृषि विद्याशाखेतील विविध विद्यार्थ्यांना भारतीय तेलबिया संशोधन संस्थाहैद्राबाद येथील विविध प्रयोगशाळेत संशोधनात्मक कार्य करता येणे शक्य होणार आहे. विद्यापीठास्तरावरील तेलबिया पिकांच्‍या संशोधन कार्य अधिक वृध्दिंगत होण्याच्या दृष्टीने या कराराचा फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच दोन्ही संस्थांमध्ये विविध तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होणार आहे. भविष्यात दोन्ही संस्थांमार्फत एकत्रित संशोधन प्रकल्प सादर करण्यात येतील तसेच तेलबियांपासुन विविध मुल्यवर्धीत पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान विविध महिला बचत गट व शेतकरी गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल.

दिनांक २२ मार्च रोजी जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांचे कृषि क्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर या विषयावर विशेष व्याख्यानही ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. यात देशातील विविध संशोधन केंद्र व संस्थेतील शास्‍त्रज्ञांनी सहभाग घेतला होतो.