वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय, माखणी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुर्णा तालुक्यातील माखणी येथे शेतकरी कुटुंबाचे सक्षमीकरण करण्यासाठी दिनांक ६ जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्यान पंडीत श्री प्रतापराव काळे, सरपंच श्री गोवींदराव अवरगंड उपस्थित होते तर डॉ. इरफाना सिदृदीकी, डॉ. जयश्री रोडगे, डॉ. फरजाना फारुखी, प्रा. निता गायकवाड, डॉ शंकर पुरी आदींची उपस्थिती होती.
कार्यशाळेत महाविद्यालयाच्या तज्ज्ञ प्राध्यापकांनी सहभागी महिलांना मार्गदर्शन केले. यात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी बाजारपेठेत सध्या मास्कला प्रचंड मागणी असल्याने डॉ. इरफाना सिदृदीकी यांनी अर्थाजनाच्या दृष्टीने व सर्वसामान्यांना वापरण्यासाठी सुविधाजनक असणारे विविध मास्क तयार करण्याचे प्रात्याक्षिकाव्दारे मार्गदर्शन केले. डॉ. जयश्री रोडगे यांनी शेतीकामामध्ये महिलांचे श्रम बचतीचे साधने व घरातील स्वच्छतेचे व्यवस्थापन याबाबत उपलब्ध असणा-या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. कोरोना विषाणू आजारावर प्रतिबंध करण्याकरिता, कुटुंबाची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योग्य आहार आणि प्रक्रिया उद्योग या विषयी डॉ. फरजाना फारुखी यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. निता गायकवाड यांनी कोरोना संकटाशी लढण्यासाठी महिलांची जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करुन महिलांनी स्वत:चे व कुटुंबाचे मानसीक स्वास्थ जोपासण्यासाठी आवाहन केले.
उद्यान पंडीत श्री प्रतापराव काळे यांनी शासनाच्या विविध योजनांचा तसेच विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा व सक्षम व्हावे असे आवाहान केले तर सरपंच श्री गोवींदराव अवरगंड यांनी कार्यशाळेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत समाधान व्यक्त करुन भविष्यात अशा प्रकारचे उपयुक्त कार्यक्रम वारंवार आयोजित केले जावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यशाळेतील लाभार्थ्यांना अभाससंप्र (मानव विकास) विकसीत घडीपत्रिका व पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. शंकर पुरी यांनी कोरेाना परिस्थितीत शेतीकामामध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती दिली. सुत्रसंचालन माधवराव अवरगंड यांनी केले तर आभार संशोधक सहाय्यक शितल मोरे यांनी मानले. कार्यशाळेचे आयोजन प्राचार्या डॉ जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ संशोधक डॉ.शंकर पुरी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्विततेसाठी धनश्री चव्हाण, शितल मोरे, ग्रामस्थ माधवराव अवरगंड आदीसह समस्त गावकरी यांनी सहकार्य केले.