Pages

Friday, August 27, 2021

सद्यस्थितीत सोयाबीनवरील किड व रोग व्‍यवस्‍थापन करा

वनामकृवितील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा सल्‍ला

छायाचित्र - शेंगा करपा


सध्या सोयाबीन वर चक्री भुंगा, खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच येणाऱ्या काळात रिमझिम पावसामुळे शेंगा लागण्याच्या अवस्थेत शेंगा करपा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन पुढील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ जी डी गडदे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा डी डी पटाईत यांनी दिला आहे.

पाने खाणाऱ्या व खोडकिडीच्या अळी करीता क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के हे किटकनाशक ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५ टक्के (संयुक्त कीटकनाशक) हे २.५ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ५० मिली  किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ टक्के हे ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली (संयुक्त कीटकनाशक) किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के (संयुक्त कीटकनाशक) हे ७ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १४० मिली फवारावे. सदरिल कीटकनाशक सर्व प्रकारच्या अळी (खोडकीडी व पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात म्हणून कीडीनुसार वेगळे किटकनाशक फवारणी करण्याची आवश्यकता नाही.

पानावरील ठिपके व शेंगा करपाकरीता टेब्युकोनॅझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के (संयुक्त बुरशीनाशक) हे २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ टक्के  हे १२.५ मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर २५० मिली फवारावे.

अधिक माहितीसाठी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर संपर्क साधवा.

संदर्भ - संदेश क्रमांक: ०७/२०२१ (२७ ऑगस्ट २०२१), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी.

Wednesday, August 25, 2021

कपाशीत पातेगळ व रसशोषण करणा-या किडीचा प्रादुर्भाव

सद्यपरिस्थितीत कपाशी पिकाचे व्यवस्थापनाबाबत विद्यापीठाचा सल्‍ला

कपाशीचे पीक सध्या पाते व फुल लागण्याच्या अवस्थेत आहे तसेच जूनमध्ये लवकर लागवड केलेल्या कपाशीमध्ये बोंड परीपक्वतेच्या अवस्थेत आहेत. सध्या वातावरणामध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. कधी तापमानात वाढ होत आहे तर कधी सलग ५-६ दिवस पावसाचे वातावरण होत आहे. अशा हवामान बदलामुळे कपाशीत पातेगळ झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रसशोषण करणा-या कीडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकीडे यांचा ही मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येत आहे व काही ठिकाणी बोंडअळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे. येणाऱ्या काळात आकस्मिक मर, जिवाणूजन्य करपा सुध्दा येण्याची शक्यता आहे, तरी त्या करीता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील कृषि विद्यावेत्‍ता डॉ जी डी गडदे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा डी डी पटाईत यांनी पुढील  उपाययोजना करण्‍याचा सल्‍ला दिला आहे.   

रसशोषक किडी विशेषत: फुलकिडे व्यवस्थापनाकरिता निंबोळी अर्क ५ टक्के किंवा फिप्रोनील ५ टक्के - ३० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६०० मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ टक्के - ८ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १६० मिली किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के - २० मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ४०० मिली फवारावे. यापैकी कोणत्‍याही किटकनाशकांची फवारणी करावी.

जिवाणूजन्य करपा रोग दिसुन येत असे तर कॉपर ऑक्सीक्लोराईड ५० टक्के २५ ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्‍यात मिसळुन एकरी ५०० ग्रॅम याप्रमाणे फवारणी करावी.

काही ठिकाणी कपाशीमध्ये आकस्मिक मर ही विकृती दिसून येत आहे. त्याकरिता पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात. शेतातील अतिरिक्त पाण्याचा लवकरात लवकर निचरा करवा. वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. लवकरात लवकर १.५ किलो युरिया अधिक १.५ किलो पालाश (पोटॅश) अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १५० मिली आळवणी करावी. किंवा १ किलो १३:००:४५ अधिक २ ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड अधिक २५० ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड २०० लिटर पाण्यातून मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड १०० मिली आळवणी करावी.

कपाशीतील नैसर्गिक फुलगळीचे व्यवस्थापन करण्यासाठी नॅपथेलिन अॅसीटीक अॅसीड (NAA) २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कापूस पिकामध्ये दोन महिन्यानंतर नत्रयुक्त खताची मात्रा देण्यासाठी युरिया १ बॅग किंवा अमोनियम सल्फेट २ बॅग प्रति एकर पेरून द्यावे. तसेच कापूस पिकामध्ये १.५ टक्के युरिया (१५० ग्रॅम) किंवा २ टक्के  डायअमोनिअम फॉस्फेट (२०० ग्रॅम) अधिक ५० ग्रॅम सुक्ष्म अन्नद्रव्य प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर संपर्क साधावा.

संदर्भ - कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी संदेश क्रमांक: ०६/२०२१  (२४ ऑगस्ट २०२१)




Sunday, August 22, 2021

मानवी जीवन व पर्यावरणाच्‍या रक्षणाकरिता वृक्ष संवर्धनाशी स्‍वत:ला भावनिकरित्‍या बांधुन घ्‍या ........ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित वृक्षवंदन – रक्षाबंधन उपक्रम साजरा

नागरिकांमध्‍ये वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाबाबत स्‍वयंप्रेरणा व दायित्‍व भावना निर्माण व्‍हावी म्‍हणुन परभणी जिल्‍हयात वृक्षवंदन - रक्षाबंधन या सप्‍ताहाचे दिनांक २२ ऑगस्‍ट ते ३० ऑगस्‍ट आयोजन करण्‍यात आले असुन यानिमित्‍त दिनांक २२ ऑगस्‍ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात हा उपक्रम राबविण्‍यात आला.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी श्रीमती उषाताई ढवण, पुरातन वास्‍तु अभ्‍यासक व तज्ञ श्री मल्‍हारीकांत देशमुख, डॉ अनिल दिवाण, डॉ सुभदा दिवाण, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, वृक्ष लागवड अधिकारी डॉ हिराकांत काळपांडे, ओंकार ग्राफीक्स चे श्री संजय ठाकरे, श्री दिवाकर काकडे, डॉ वडणेरकर, डॉ राजेश क्षीरसागर, डॉ प्रविण वैद्य, डॉ टेकाळे, डॉ चंद्रशेखर अंबाडकर, डाॅ मिनाक्षी पाटील, डॉ विजय जाधवडॉ फरिया खानडॉ अंबिका मोरे आदीसह शहरातील नागरीक उपस्थित होते.

उपक्रमाची सुरूवात कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी श्रीमती उषाताई ढवण यांच्‍या हस्‍ते वडाच्‍या झाडाचे पुजनाने करण्‍यात येऊन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते वडाच्‍या झाडास राखी बांधुन करण्‍यात आली, नंतर उपस्थित मान्‍यवरांनीही विद्यापीठ परिसरातील वृक्षास राखी बांधुन या उपक्रमात सहभाग घेतला.

याप्रसंगी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, भाऊ व बहिण अतुट बंधन अधिक दृढ होण्‍याकरिता आपण रक्षाबंधन साजरा करतो, यात बहिण व भाऊ परस्‍परांचे संरक्षण करण्‍याचे दायित्‍व अपेक्षित असते. त्‍याचप्रमाणे वृक्षालाही आपण राखी बांधुन, लहानपणी त्‍यांचे संवर्धन करू, हीच वृक्ष भविष्‍यात मानवाचे व पर्यावरणाचे रक्षण करणार आहेत. वृक्षास राखीपुर्णिमेच्‍या दिवसी प्रतिकात्‍मकरित्‍या राखी बांधुन वृक्ष संवर्धनाशी आपण भावनिकरित्‍या बांधुन घेत आहोत. सर्व नागरिकांनी वृक्ष संवर्धनाच्‍या प्रक्रियेत सर्वांनी सामिल व्‍हावे, ही सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाचा वसा विद्यापीठाने घेतला असुन गेल्‍या तीन वर्षाच्‍या कार्यकाळात विद्यापीठ अंतर्गत मराठवाडयातील महाविद्यालये, संशोधन केंद्रे व कृषि विज्ञान केंद्र परिसरात साधारणत: दहा लाख वृक्षाची लागवड व संवर्धन करण्‍यात आले. परभणी विद्यापीठ परिसरात पाचशे पेक्षा जास्‍त वडाच्‍या झाडाचे लागवड करण्‍यात आली असुन वडाच्‍या झाडाचे आयुष्‍य मोठे असते, यामुळे पक्षी वैभव वाढीस लागणार आहे. विद्यापीठ ऑक्सीजन हॅब होत आहे, भविष्‍यात परिसर गर्द वनराईने नटलेला असेल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

याप्रसंगी श्री मल्‍हारीकांत देशमुख म्‍हणाले की, कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमीवर प्राणवायुचे मानवी जीवनातील महत्‍व अधोरेखित झाले, मानवास प्राणवायुची पुर्तता वृक्ष पासुनच होते. मानवाचे जीवन सुरक्षित ठेवण्‍यासाठी वृक्षास करून आपण प्राणवायु दे ही मागणी राखी बांधुन करणार असुन यात पुरूष व महिलांनीही सहभाग घ्‍यावा. सर्व वृक्षप्रेमी एकत्रित कार्य करून आपले ऋण म्‍हणुन वृक्षाचे पुजन करू. ही सुरूवात असुन संपुर्ण परभणी जिल्‍हयात ही मोहिम राबविण्‍यात येणार आहे. ज्‍याप्रमाणे रक्षाबंधन करून भाऊ आपल्‍या बहिणीच्‍या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो अगदी त्‍याचप्रमाणे नागरिकांनी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्‍वीकारावी असा या उपक्रमा मागचा हेतू आहे. वृक्षांचे रक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करणे व वृक्षांप्रती दायित्‍वाची भावन रूजवण्‍यासाठी वृक्ष वंदन -  रक्षा बंधन अभियान महत्‍वाचे ठरणार आहे.

दिनांक २३ ते ३० ऑगस्‍ट या सप्‍ताहाचे आयोजन पुरातन वास्‍तु अभ्‍यासक व तज्ञ श्री मल्‍हारीकांत देशमुख यांच्‍या संकल्‍पनेमधुन करण्‍यात आले आहे. या उपक्रमांतर्गत रक्षा बंधनाचे औचित्‍य साधुन जिल्‍हयातील शाळा, महाविद्यालये येथे वृक्षांची लागवड करून त्‍यांची जोपासना करण्‍यात येणार आहे. अभियानातुन लोकसहभाग व जनप्रबोधन करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येऊन वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची व्‍याप्‍ती वाढविण्‍याचा उद्देशाने अभियान जिल्‍हाभरात राबविण्‍यात येणार आहे.


Saturday, August 21, 2021

वनामकृविचे माजी विद्यार्थी आयटीबीपीचे असिस्‍टंट कमांडंट कै सुधाकर शिंदे यांना भावपुर्ण श्रध्‍दांजली

छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी दिनांक २० ऑगस्‍ट रोजी केलेल्या हल्ल्यात नांदेडचे सुपुत्र आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट सुधाकर शिंदे शहीद झाले.  हल्ल्यात आयटीपीबीचे दोन अधिकारी शहीद झाले. नक्षलवद्यांनी कडेमेटा कॅम्पपासून ६०० मीटर अंतरावर हा हल्ला केला. या घटनेने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कै सुधाकर शिंदे हे मुखेड तालुक्यातील बामणी इथले रहिवासी होते, ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते, परभणी कृषि महाविद्यालयाचे १९९६ च्‍या बॅचचे विद्यार्थी होते. घरची हालाखीची परिस्थिती असतांनाही स्‍वत: कष्‍ट करून शिक्षण पुर्ण केले. सन २००२ साली पहिल्‍याच स्‍पर्धा परीक्षेत यश मिळवत पास झाले. २००४ ते २०१३ या दरम्‍यान देशात विविध राज्‍यात सेवा बजावली. २०१३ ते २०१९ या दरम्‍यान राष्‍ट्रीय आपदा प्राधिकरणमध्‍ये पथकप्रमुख म्‍हणुन नेमणुक केली. डिसेंबर २०१९ पासुन कै सुधाकर शिंदे छत्‍तीसगढ येथील नारायणपुर येथे पोलिस उपाधिक्षक म्‍हणुन कार्यरत होते. आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनमध्ये ते सेवेत होते.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची श्रद्धांजली

विद्यापीठाच्‍या वतीने शहिद कै सुधाकर शिंदे यांना श्रध्‍दांजली वाहतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले, नांदेडचे सुपुत्र, विद्यापीठाचे माजी विद्यार्थी, व आयटीबीपीचे असिस्टंट कमांडंट कै सुधाकर शिंदे यांना नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण आल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शेतकरी कुटुंबात जन्‍मलेला, विनम्र व स्‍वकष्‍टातुन यश संपादन केलेल्‍या शहिद कै सुधाकर शिंदे यांनी देशासाठी आपले सर्वस्‍व अर्पण केले, संपूर्ण विद्यापीठ परिवार शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

सोयाबीनवर उंटअळी व तंबाखुवरील पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव

एकात्मिक व्यवस्थापन करण्‍याचा वनामकृवितील कृषि कीटकशास्त्र विभागाचा सल्‍ला

सध्या स्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळया व तंबाखुवरील पाने खाणारी अळयाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन पाने खाणाऱ्या अळयांमुळे एकत्रितपणे (स्पोडोप्टेरा, उंटअळया, घाटेअळया, केसाळ अळया इ.) ७१ टक्के, फक्त उंटअळयामुळे ५० टक्के पर्यंत सोयाबीनचे नुकसान होऊ शकते. शेतकरी बांधवानी या कीडच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थपनाचा अवलंब करावा असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकश्यास्त्र विभागाच्‍या वतीने देण्‍यात आला असुन पुढील प्रमाणे उपाय योजना सुचविल्‍या आहेत.

तंबाखुवरील पाने खाणारी अळी / स्पोडोप्टेरा  - या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते आक्टोबर महिन्यात मोठया प्रमाणावर दिसून येतो. दिवसाच्या वेळी अनेकदा या अळया पानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर पडतात ज्यामुळे त्या दिसत नाहीत. अंडयातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळया समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. परंतु पानास छिद्र पाडत नाहीत त्यामुळे असे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे दिसते. मोठया झाल्यानंतर अळया सर्व शेतात पसरतात व पानास छिद्र पाडून पाने खातात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या अळया फुलेसुध्दा खातात.

उंटअळया - या किडींच्या लहान अळया पानांच्या खालचा हिरवा भाग खरवडून खातात त्यामुळे पानांचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. काही काळानंतर असे पातळ पापुद्रे फाटतात व त्या ठिकाणी छिद्रे दिसतात. मोठया अळया पानांना वेगवेगळया आकाराची छिद्रे पाडून खातात. त्या फुले व शेंगाही खातात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

मशागतीय पध्दती - पिकाच्या पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पतींचा जसे कि कोळशी, पेठारी, रानभेंडी या नष्ट कराव्यात.

यांत्रिक पध्दती - शेतात सुरवातीपासून किड-रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत. तंबाखूची पाने खाणारी अळी व केसाळ अळ्या एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगत तोडून नष्ट करावीत. तंबाखुवरील पाने खाणारी अळी किडींच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी कामगंध सापळे शेतात लावावेत. भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात ८ ते १० प्रति एकरी पक्षी थांबे उभारावेत.

जैविक पध्दती - पाने खाणाऱ्या सर्व प्रकारच्या अळ्या यांच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिली १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणु मि.ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई बुरशीची ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी. फवारणी शक्यतो सायंकाळी करावी.

रासायनिक पध्दत - किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक किटकनाशकांचा वापर  करावा.

तंबाखुवरील पाने खाणारी १० अळया  प्रती मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर येण्यापुर्वी आढळुण असल्‍यास तसेच उंटअळया अळया प्रती मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर असताना किंवा 3 अळया प्रती मिटर ओळीत पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली. रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी. यात फ्लुबेंडामाईड ३९.३५ एससी मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८. एससी मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ + लॅमडा साहॅलोथ्रीन .५ झेडसी २.५ मिली प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळुन यापैकी कोणतेही एक किटकनाशक फवारावे. पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.  शेतात कीटक नाशकाची फवारणी करताना हातमोज़े  व तोंडावर मास्कचा वापर करावा, असा सल्‍ला देण्‍यात आला आहे.