Pages

Saturday, August 21, 2021

सोयाबीनवर उंटअळी व तंबाखुवरील पाने खाणारी अळीचा प्रादुर्भाव

एकात्मिक व्यवस्थापन करण्‍याचा वनामकृवितील कृषि कीटकशास्त्र विभागाचा सल्‍ला

सध्या स्थितीत सोयाबीन या पिकावर उंटअळया व तंबाखुवरील पाने खाणारी अळयाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन पाने खाणाऱ्या अळयांमुळे एकत्रितपणे (स्पोडोप्टेरा, उंटअळया, घाटेअळया, केसाळ अळया इ.) ७१ टक्के, फक्त उंटअळयामुळे ५० टक्के पर्यंत सोयाबीनचे नुकसान होऊ शकते. शेतकरी बांधवानी या कीडच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक कीड व्यवस्थपनाचा अवलंब करावा असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि कीटकश्यास्त्र विभागाच्‍या वतीने देण्‍यात आला असुन पुढील प्रमाणे उपाय योजना सुचविल्‍या आहेत.

तंबाखुवरील पाने खाणारी अळी / स्पोडोप्टेरा  - या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्ट ते आक्टोबर महिन्यात मोठया प्रमाणावर दिसून येतो. दिवसाच्या वेळी अनेकदा या अळया पानाखाली अथवा जमिनीत लपून राहतात व रात्रीच्या वेळी बाहेर पडतात ज्यामुळे त्या दिसत नाहीत. अंडयातून निघालेल्या सुरूवातीच्या अवस्थेतील अळया समूहाने राहून प्रथम अंडी घातलेल्या पानाचे हरितद्रव्य पूर्णपणे खाऊन टाकतात. परंतु पानास छिद्र पाडत नाहीत त्यामुळे असे पान पातळ पांढऱ्या कागदासारखे दिसते. मोठया झाल्यानंतर अळया सर्व शेतात पसरतात व पानास छिद्र पाडून पाने खातात. फुले लागल्यानंतर बऱ्याचदा या अळया फुलेसुध्दा खातात.

उंटअळया - या किडींच्या लहान अळया पानांच्या खालचा हिरवा भाग खरवडून खातात त्यामुळे पानांचा फक्त वरचा पांढरा पापुद्रा दिसतो. काही काळानंतर असे पातळ पापुद्रे फाटतात व त्या ठिकाणी छिद्रे दिसतात. मोठया अळया पानांना वेगवेगळया आकाराची छिद्रे पाडून खातात. त्या फुले व शेंगाही खातात.

एकात्मिक कीड व्यवस्थापन :

मशागतीय पध्दती - पिकाच्या पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पूरक वनस्पतींचा जसे कि कोळशी, पेठारी, रानभेंडी या नष्ट कराव्यात.

यांत्रिक पध्दती - शेतात सुरवातीपासून किड-रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून नष्ट करावीत. तंबाखूची पाने खाणारी अळी व केसाळ अळ्या एकाच पानावर पुंजक्याने अंडी घालतात त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीला एकाच पानावर बहुसंख्य असतात. अशी अंडी व अळीग्रस्त पाने अलगत तोडून नष्ट करावीत. तंबाखुवरील पाने खाणारी अळी किडींच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी कामगंध सापळे शेतात लावावेत. भक्षक पक्षांना बसण्यासाठी शेतात ८ ते १० प्रति एकरी पक्षी थांबे उभारावेत.

जैविक पध्दती - पाने खाणाऱ्या सर्व प्रकारच्या अळ्या यांच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्क ५० मिली १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल.ई. विषाणु मि.ली. प्रति लिटर पाणी किंवा नोमुरिया रिलाई बुरशीची ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी प्रादुर्भाव आढळून येताच करावी. फवारणी शक्यतो सायंकाळी करावी.

रासायनिक पध्दत - किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच रासायनिक किटकनाशकांचा वापर  करावा.

तंबाखुवरील पाने खाणारी १० अळया  प्रती मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर येण्यापुर्वी आढळुण असल्‍यास तसेच उंटअळया अळया प्रती मिटर ओळीत पिक फुलोऱ्यावर असताना किंवा 3 अळया प्रती मिटर ओळीत पिक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली. रासायनिक किटकनाशकांची फवारणी करावी. यात फ्लुबेंडामाईड ३९.३५ एससी मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८. एससी मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ + लॅमडा साहॅलोथ्रीन .५ झेडसी २.५ मिली प्रति दहा लिटर पाण्‍यात मिसळुन यापैकी कोणतेही एक किटकनाशक फवारावे. पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.  शेतात कीटक नाशकाची फवारणी करताना हातमोज़े  व तोंडावर मास्कचा वापर करावा, असा सल्‍ला देण्‍यात आला आहे.