Pages

Tuesday, August 10, 2021

सोयाबीन पिकात किडी व रोगाचा प्रादुर्भाव

नामकृवितील शास्‍त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी केली संयुक्‍तपणे पिक पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्‍या पथकानी दिनांक ९ ऑगस्‍ट रोजी जिल्‍हयातील मौजे राहटी व कात्‍नेश्‍वर शिवारातील शेतक-यांच्‍या सोयाबीन पिकांची पाहणी केली. या पथकात विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहत्रे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे, मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. रामप्रसाद खंदारे, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. विक्रम घोळवे, किटक शास्‍त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव तसेच कृषि विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे व तालुका कृषि अधिकारी परभणी श्री. प्रभाकर बनसावडे आदीचा समावेश होता. या पथकांनी सोयाबीन पिकांची पाहणी केली असता काही ठिकाणी कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आला.

या पाहणी दरम्‍यान अनेक ठिकाणी जस्त व लोह ची कमतरता आढळुन आली व त्यामुळे सोयाबिनची पाने पिवळसर दिसत आहेत.  जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी व त्यानंतर पाऊसाचा पडलेला खंड, वाढलेले तापमान त्याच बरोबर दिवस व रात्र यामधिल तापमानाची तफावत यामुळे सोयाबीन पिकावर मावा, तुडतुडे व पांढरीमाशी यांचा प्रार्दुभाव सुरु झालेला दिसुन येत आहे. पुढे असेच वातावरण राहील्यास रसशोषण करणा−या किडींचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होवुन सोयाबीन माझॅक व पिवळा मोझॅक या विषाणुजन्य रोगांचा  प्रसारण होण्याची शक्यता असल्‍याचे शंका व्‍यक्‍त केली. काही भागात सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणा−या अळया या किडींचा देखिल प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन पिकांवरील कीड व रोग प्रादुर्भाव पाहता विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

उपाययोजना :

सोयाबीन पिकातील जस्त व लोहाची कमतरता कमी करण्यासाठी चिलेटेड झिंक व लोह यांची प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति दहा लीटर पाण्यामध्ये घेवुन फवारणी करावी किंवा विद्राव्य सुक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड-२ ची ५० मिली प्रति दहा लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या रसशोषणा−या  किडी व खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणा−या अळयांच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पीकात एकरी १५ पिवळे व ५ निळे चिकट सापळे लावावे, इंग्रजी टि आकाराचे २० पक्षी थांबे उभारावे, एकरी चार कामगंध सापळे लावावे तसेच प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळुन आल्यास संयुक्त किटकनाशक थायमिथोक्झाम १२.६० टक्केधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५० टक्के झेडसी (२.५ मिली) किंवा बिटासायफ्लुथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के (७ मिली) यांची प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

बहुतेक ठिकाणी सोयाबीन पीक हे फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे तसेच काही ठिकाणी पानकरपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावाची सुरुवात झालेली दिसुन आली व पुढे हा रोग शेंगावर देखिल पसरण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी टेब्युकोनाझोल २५.९ टक्के १५ ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन २० टक्के २० ग्रॅम किंवा संयुक्त बुरशीनाशक टेब्युकोनाझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्लुजी २५ ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात घेवुन फवारणी करावी.

मागील १० ते १२ दिवसांपासुन मराठवाडयातील  सर्वच जिल्हामध्ये पावसाचा खंड दिसुन येत आहे. तसेच तापमान वाढलेले आहे व जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे तरि पानातुन बाष्पीभवन टाळण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) ची १०० ग्रॅम प्रती दहा लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. 

टिप : शेतक−यांना अवाहन करण्यात येते की त्यांनी किटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य अन्नद्रव्य इ. यांची  एकत्रित फवारणी घेवु नये.