Pages

Monday, August 9, 2021

सद्य परिस्थितीत कपाशीमधील रसशोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

सतत ढगाळ वातावरणामुळे मावा व तुडतुडे किंडींचा प्रादुर्भाव

मराठवाडयात कपाशी वाढीच्या अवस्थेत असून कपाशी काही ठिकाणी पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. तसेच मागील काही दिवसापासून पाऊस उघडला असून सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासोबतच काही प्रमाणात तुडतुडे सुद्धा दिसून येत आहेत. माव्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम होताना दिसून येत आहे. उशिरा लागवड केलेल्या कपाशी दोन ते चार पानावर आहेत त्यावर मावा किडीमुळे फार मोठा परिणाम होऊन त्या ठिकाणी कपाशीची वाढ खुंटते. म्हणून मावा किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 

किडींचे व्यवस्थापनकरिता उपाय योजना  - मावा किडीचा प्रसार शेतामध्ये मुंगळ्यांद्वारे होतो, त्यामुळे कपाशीचा शेताच्या आजूबाजूला असलेले मुंगळ्याची वारुळे नष्ट करावीत जेणेकरून मावा किडीचा प्रसार कमी होईल. रसशोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) १ कि. ग्रॅ किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॅम किंवा डायनेटोफ्युरॉन २० टक्के ६० ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के ४०० मिली किंवा असिटामाप्रीड २० टक्के ४० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. सदरिल प्रमाण सर्व प्रकारच्या पंपाकरिता आहे. या कीटकनाशकासोबत कुठलेही इतर कीटकनाशक, बुरशीनाशक, खते, संप्रेरक मिसळून फवारणी करु नये.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करावा. संपर्कासाठी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९०००.

संदर्भ - वनामकृवि संदेश क्रमांक - ०५/२०२१ (०५ ऑगस्ट २०२१)