Pages

Saturday, November 27, 2021

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने संविधान दिन साजरा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षात संविधान दिनाच्या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने राष्ट्रीय सेवा योजने अन्तर्गत भारतीय संविधान दिन दिनांक २६ नोव्‍हेबर रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ‘भारतीय संविधान आजच्या संदर्भात’ याविषयावर श्री शिवाजी विधि महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विजय माकणीकर यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सहयोगी अधिष्‍ठात डॉ जया बंगाळे या होत्‍या. 

व्‍याख्‍यानात डॉ. विजय माकणीकर यांनी संविधानाचे मूलभूत तत्वे, मूलभूत हक्कसंविधानाने दिलेले स्वातंत्र्य तसेच आजच्या संदर्भात विविध न्यायालयीन निवाडे यांचा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्या डॉ जया बंगाळे यांनी विद्यार्थ्‍यांनी भारतीय संविधान समजुन घेऊन भारतीय संविधानातील मुलतत्वाप्रमाणे जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्याचा प्रयत्‍न करावा असा सल्‍ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर यांनी केले तर आभार डॉ. शंकर पुरी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. नाहीद खान, डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. सुनिता काळे, डॉ. शंकर पुरी आदीसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.