Pages

Saturday, December 4, 2021

सामुदायिक विज्ञान महाविद्यालय महाविद्यालयात कृषी शिक्षण दिन साजरा

उद्योजकतेचा ध्यास  आणि सातत्य व्यक्तींना यशस्वी बनवते .... उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने दिनांक ३ डिसेंबर रोजी आभासी माध्यमाद्वारे कृषी शिक्षण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्‍त विद्यार्थी  उद्योजकतेकडे आकर्षीत होण्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रातील यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे या होत्या तर मार्गदर्शक म्हणून उद्यान पंडित श्री प्रतापराव किसनराव काळे आणि सौ छायाताई साहेबराव शिंदे हे होते.

अध्यक्षीय समारोपात डॉ. जया बंगाळे यांनी कृषी शिक्षण दिनाचे महत्त्व सांगून भारतीय अर्थव्यवस्थेचा कृषी हा आर्थिक कणा असल्याने कृषी शिक्षणाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी शेतीकडे एक उत्तम उद्योग म्हणून पाहावे असे नमूद केले.

मार्गदर्शनात श्री प्रतापराव काळे म्‍हणाले की, शेतकरी कुटुंबांनी समृद्ध होण्यासाठी फळबाग लागवडीस प्राधान्य द्यावे, शेतमाल विक्री व्यवस्थापनामध्ये कुटुंबातील सदस्यांनी कामाची विभागणी करून घ्यावी. जीवनात यशस्‍वीतेकरिता सकारात्मक दृष्टीकोणाबरोबरच कामामध्ये सातत्य ठेवावे.

सौ छायाताई शिंदे यांनी बचत गटाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभारणी करत असतानाचे आपलेु अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांच्यासमवेत त्यांचे पती श्री साहेबराव शिंदे यांनीही मार्गदर्शन केले, त्यांनी उद्योजकता विकास साधण्यासाठी ग्राहकांची गरज ओळखावी आणि सेवा गुणवत्ता उत्तम ठेवणे गरजेचे असल्‍याचे सांगुन  परभणी जिल्ह्यातील उद्योजक छाया शिंदे यांचे पदार्थ राज्याबाहेर केरळ पर्यंत पोहोचत असल्‍याचे सांगितले.

सुत्रसंचालन कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. तस्नीम नाहीत खान, डॉ. सुनिता काळे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, संशोधक कर्मचारी, विद्यार्थी आदींनी सहभाग नोंदविला.