Pages

Tuesday, January 4, 2022

वनामकृविच्‍या वतीने मौजे पेठ बाभळगांव ता. पाथरी येथे शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी जागृती कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प, कापूस संशोधन योजना आणि ग्रामीण कृषि मौसम सेवा योजना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 3 जानेवारी रोजी मौजे पेठ बाभळगाव (ता. पाथरी जि. परभणी) येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण आणि शेतकरी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर संशोधन उपसंचालक डॉ. अशोक जाधव, ग्रामिण कृषि मौसम सेवा योजनेचे प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे, सहायक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्हणाले की,  शेतकऱ्यांनी विकेल ते पिकेल संकल्‍पने प्रमाणे बाजारात ज्याला भाव आहे व जास्त मागणी आहे अशा पिकांची लागवड करावी. पिकांचे नियोजन करतांना भाजीपाला, फळबाग, तसेच काढणीपश्चात प्रक्रिया करण्याचे नियोजन करावे. शेती विषयक तांत्रिक अडचण आल्यास शेतकरी बांधवानी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांशी संपर्क करावा. महिलांनीही शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे व आपल्या शेतीमध्ये बदल घडवून आणावा, असा सल्‍ला दिला.

डॉ. अशोक जाधव यांनी कापूस लागवडीचे कमी खर्चाचे तंत्रज्ञान वापरून कापूस उत्पादनात अधिक निव्वळ नफा कसा मिळवता येईल यावर मार्गदर्शन करून शेंडा खुडण्यामुळे होणारे फायदे याविषयी माहिती दिली. तर
डॉ.दिगंबर पटाईत यांनी कीटकनाशक प्रतिकारशक्‍ती व्यवस्थापन प्रकल्पा मार्फत गावात निवड केलेल्या दहा शेतकऱ्यांनी कापूस शेती मध्ये गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन कसे केले याविषयी सांगितले तसेच शेतकऱ्यांना वाटप केलेल्या निविष्ठा आणि शेतकऱ्यांनी केलेली फरदड मुक्ती याविषयी सर्वांना अवगत करून दिले.

प्रास्ताविकात डॉ. कैलास डाखोरे यांनी ग्रामिण कृषि मौसम सेवा मार्फत देण्यात येणाऱ्या संदेश व हवामान अंदाज विषयी शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली. हवामान अंदाजानुसार आपल्या शेतीचे नियोजन करावे असे सांगितले तसेच वीज पडणे याविषयी पूर्वसूचना देणाऱ्या दामिनी व मेघदूत या मोबाईल ॲप बद्दल सविस्‍तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रमोद शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले.

कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी श्री. बाबासाहेब रणेर यांनी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना झालेल्या फायदा याविषयी सांगितले तर महिला शेतकरी सौ. उज्वलाताई रणेर यांनी महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आव्हान केले की त्यांनी सुध्दा सावित्रीमाई प्रमाणे आपल्या कामात कुठेही मागे राहू नये व शेतीचा आणि आपल्या घराचा उध्दार करावा. यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री.घुमरे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यापीठाचे श्री.ह्रशिकेष औंढेकर, प्रगतशील शेतकरी श्री. मंचकराव रणेर, श्री. मुंजाजी धरमे, युवा उद्योजक श्री. दिपक गिराम आदीसह गावातील ५० शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या चिकू बागेस, कापूस फरदड मुक्त प्रक्षेत्र, दाळमिल व मिरची बीजोत्पादन प्रक्षेत्रास मान्यवरांमार्फत भेट देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. शेख, कु. प्रियंका वाघमारे, श्री.इरफान बेग, श्री. डी.आर. बोबडे आणि गावकऱ्यांनी प्रयत्न केले.