Pages

Thursday, February 17, 2022

हवामान बदलानुरुप परिस्थितीत पारंपारीक शेतीसोबत फळबाग लागवड महत्वाचे ..... डॉ. दत्तप्रसाद वासकर

वनामकृवि आयोजित मौजे उजळांबा (ता.जि.परभणी) येथे शेतकरी मेळावा संपन्‍न

शेतकऱ्यांच्या शेतमालाचे उत्पादन व आर्थिक उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विद्यापीठ विकसित विविध पिकाचे वाण, पीक पध्दती, आधुनिक कृषि तंत्रज्ञान आदींचा अंगीकर करावा. शेतकरी बांधवानी हवामान बदलानुरूप परिस्थितीत पारंपारीक शेती सोबत फळबाग लागवड करणे महत्‍वाचे असल्‍याचे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प अंतर्गत हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रमया योजने अंतर्गत दिनांक १५ फेब्रुवारी रोजी मौजे उजळांबा (ता.जि.परभणी) येथे शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते झाले तर प्रमुख अतिथी परभणी तालुका कृषि अधिकारी डॉ. संदीप जगताप हे उपस्थित होते. दैठणा मंडळ कृषी अधिकारी श्री कैलास गायकवाड, आयोजक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, कृषि अभियंता डॉ. मदन पेंडके, सरपंच (उजळांबा) श्री विठ्ठल धोतरे, माजी सरपंच श्री मोगले, बाभुळगावचे सरपंच श्रीगणेश दळवे, कृषी सहाय्यक श्रीमती काशी चांदणे आदींची आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. वासकर यांनी कोरडवाहू फळपीके जसे आवळा, सिताफळ, अंजीर या फळझाडांची लागवड करुन व बाजारात विक्री यासंबंधी माहिती दिली तसेच विद्यापीठ विकसित वाणांचा वापर करुन उत्पन्नात वाढ करण्‍याचे आवाहन केले.

डॉ. संदीप जगताप यांनी शासनाच्या विविध शेती विषयक योजनांची माहीती देवून शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल याबाबत मार्गदर्शन केले. विकेल ते पिकेल योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी बाजारातील गरजेनूसार शेतीतील पीक पध्दती बदल करावा त्यातून नफा मिळवावा, शासन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील असल्‍याचे ते म्‍हणाले.

श्री कैलास गायकवाड यांनी शासनाच्या विविध शेती विषयक योजनांची माहीती दुग्ध व्यवसायाबद्दल माहीती शेतकऱ्यांना दिली तर डॉ. मदन पेंडके यांनी विहीर तसेच कुपनलिका पुनर्भरण तंत्रज्ञान तसेच रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पध्दती या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. वासुदेव नारखेडे यांनी पीक पीकपध्दती, एकात्मिक शेतीपध्दतीमध्ये फळपीके, शेळीपालन, दुग्धव्यवसाय, कुक्कूटपालन तसेच चारा व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मौजे उजळांबा येथील प्रगतीशील शेतकरी श्री राजेभाऊ रगड प्रा. विलास साखरे यांनी विद्यापीठ तंत्रज्ञानाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी मानले.

केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्था हैद्राबाद अंतर्गत अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प वनामकृवि, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषी उपक्रमही योजना मौजे बाभुळगाव, उजळांबा आणि पिंपळगाव (ता. जि. परभणी) येथे २०१५-१६ पासून राबविण्यात येत आहे. योजने अंतर्गत दरवर्षी गावातील प्रत्येकी २७ शेतकऱ्यांची निवड खरीप रब्बी हंगामात करण्यात येते तसेच शेतकऱ्यांना खरीप रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकांचे विद्यापीठ विकसित वाणाचे बियाणे वाटप करण्यात येतेमेळाव्‍यास बाभुळगाव, उजळांबा व पिंपळगाव येथील शेतकरी गावकरी उपस्थित होते. मेळाव्याच्या आयोजनासाठी प्रा. रावसाहेब राऊत, श्री. मोरेश्वर राठोड, श्री. सुमित सुर्यवंशी, श्री दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले.