Pages

Friday, February 18, 2022

सेंद्रीय शेतीमध्ये सातत्य आवश्‍यक…. श्री. संतोष आळसे

वनामकृविच्‍या वतीने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक 15 फेब्रुवारी ते 31 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाडॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन : यशोगाथा’’ या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनाचे प्रकल्प संचालक श्री. संतोष आळसे हे होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून पुणे येथील कृषि आयुक्तालयाचे सेंद्रीय शेती राज्य समन्वयक श्री. सुनिल चौधरी व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनाचे उपसंचालक श्री. अरिफ शहा, मौजे धानोरा काळे (ता. पुर्णा) येथील प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव काळे, आयोजक प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात श्री. संतोष आळसे म्हणाले की, महाराष्ट्रात सेंद्रीय शेतीसाठी मोठा वाव असुन सेंद्रीय शेतीकरिता वैयक्तीक शेतक­यांसाठी विविध शासकीय योजना आहेत. सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र चालु करतांना ग्राहकांना सर्व प्रकारचा भाजीपाला, इतर शेतमाल एकाच ठिकाणी मिळाला पाहिजे तरच ग्राहकांना बांधुन ठेवता येईल, त्‍यामुळे विविध पिक लागवड करून सेंद्रीय शेतीत सातत्य ठेवले पाहिजे. सेंद्रीय शेतीमध्ये तण नियंत्रण ही सर्वात मोठी समस्या आहे, याकरिता पिकांची फेरपालट करुन तण व्यवस्थापन करता येईल.

प्रमुख वक्ते श्री. सुनिल चौधरी यांनी सेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाबाबत माहिती देतांना म्हणाले की, राज्यामध्ये सेंद्रीय शेतीसाठी विविध योजना 2005 पासून सुरु करण्यात आल्या, सन 2016-17 मध्ये केंद्र शासनाने परंपरागत कृषि विकास योजना सुरु करण्‍यात आली. आत्मा अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या गटांना या योजनेअंतर्गत लाभ घेता येवु शकतो. सेंद्रीय शेतमालाचे गट आधारीत विक्री व्यवस्थापन केल्‍यास शेतकरी बांधवाना जास्‍त लाभ होतो.

मार्गदर्शनात श्री. अरिफ शहा म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची सुरवात 16 ऑक्टोबर, 2018 मध्‍ये विदर्भातील सहा जिल्हयांमध्ये सुरुवात झाली, शेतकरी गटाच्‍या माध्‍यमातुन सेंद्रीय शेती केली जाते, यात गटाच्‍या माध्‍यमातुनच सेंद्रीय शेतमाल विक्री केली जाते.

प्रगतशील शेतकरी श्री. प्रतापराव काळे मनोगतात म्‍हणाले की, सेंद्रीय शेती करतांना बी-बियाणे वरील खर्च कमी करणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेती करतांना शेतक­यांना बाजारपेठेची अडचण आहे. तसेच त्यांनी सेंद्रीय माल विक्रीसाठी राज्यशासना कडुन जिल्हा स्तरावर शेतक­यांसाठी मॉल तयार करुन दयावेत. सेंद्रीय मालाचे प्रमाणीकरण हे कृषि विद्यापीठ स्तरावर झाले तर ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि शेतक­यांना अर्थिक फायदा होईल. आत्मा अंतर्गत शेतक­यांसाठी फिरते विक्री केंद्र उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली आले आहे. आजच्‍या प्रशिक्षणात कार्यक्रमात दोन हजार हुन पेक्षा अधिक शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किटकशास्‍त्रज्ञ डॉ. आनंत लाड यांनी केले तर आभार प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. पपीता गौरखेडे, श्री. अभिजीत कदम, दिपक शिंदे, सतीश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.