Pages

Tuesday, March 15, 2022

कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी कृषि उद्योजक होऊन रोजगार निर्मिती करावी ....... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

वनामकृवितील परभणी कृषि महाविद्यालयात कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास सुरूवात

कृषि विद्यापीठात मोठया प्रमाणात ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेश घेतात. विद्यार्थ्‍यांमध्‍ये कृषि उद्योजकतेची बीजे रूजवावी याकरिता कृषि विद्यापीठाच्‍या अभ्‍यासक्रमात बदल करण्‍यात आले आहेत. सर्वांनाच सरकारी नौकरी मिळणे शक्‍य नाही, राज्‍यात व मराठवाडयात शेतीपुरक अनेक व्‍यवसायास मोठा वाव असुन कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी नौकरीच्‍या मागे न लागता रोजगार निर्मिती करणारे कृषि उद्योजक व्‍हावे. कृषि विद्यापीठाच्‍या अनेक विद्यार्थ्‍यांनी कृषि उद्योग सुरू करून शुन्‍यातुन विश्‍व निर्माण केले असुन त्‍यांचा आदर्श घ्‍यावा, असा सल्‍ला शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष आणि देशाच्‍या स्‍वांतत्र्याचा अमृत महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधुन परभणी कृषि महाविद्यालय आणि महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या अनुसुचित जाती उपयोजनेंतर्गत विद्यार्थ्‍यांकरिता तीन दिवसीय कौशल्‍य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ मार्च व १७ मार्च दरम्‍यान करण्‍यात आले असुन प्रशिक्षणाचे उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्‍यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ संजीव बंडेवाड, एमसीईडीच्‍या प्रकल्‍प अधिकारी श्रीमती रूपाली कानगुडे, शिक्षण विभागाचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण, वक्‍ते निवृत्‍त प्राध्‍यापक प्रा. पी वाय हारकळ, डॉ प्रविण कापसेडॉ संतोष फुलारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ संजीव बंटेवाड यांनी देशाचा विकास हा औदयोगिकरणावर अवलंबुन असुन उद्योजकतेचे कौशल्‍य आत्‍मसाद करणे गरजेचे असल्‍याचे म्‍हणाले तर मनोगतात श्रीमती रूपाली कानगुडे यांनी कृषी पुरक व्यवसायाकरिता केंद्र व राज्‍य शासनाच्‍या अनेक योजना त्‍याचा लाभ कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी घेण्‍याचे आवाहन केले तर प्रा पी वाय हरकळ यांनी लघु उद्योगाबाबत मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविकात डॉ रणजित चव्‍हाण यांनी प्रशिक्षण आयोजनाबाबतची भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक डॉ अनुराधा लाड यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.