Pages

Friday, March 18, 2022

गुलाबी बोंडअळीच्‍या प्रभावी व्यवस्थापनाकरिता कृषि विद्यापीठ, कृषि निविष्ठा विक्रेते आणि शेतकरी एकत्र प्रयत्‍न करावेत ..... संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर

वनामकृवित कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापनावरील एकदिवसीय प्रशिक्षण संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापूस संशोधन योजनाच्‍या वतीने नागपुर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद केंद्रीय कापूस संशोधन संस्था पुरस्‍कृत राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातंर्गत किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पा अतंर्गत कृषि निविष्ठा विक्रेते आणि कापूस जिनींग मिल धारक यांचे करीता कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १५ मार्च रोजी करण्यात आले होते.

प्रशिक्षणाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर हे होते तर प्रमुख पाहुणे कृषि उपसंचालक श्री.बी.एस.कच्छवे हे होते. व्‍यासपीठावर कृषि किटकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. संजीव बंटेवाड, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. के. एस. बेग, कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्हणाले कि, गुलाबी बोंडअळीवर अजुनही आपण पूर्ण विजय मिळवला नसुन, सर्वस्तरावर एकत्रितरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये शेतक-यासोबतच कृषि निविष्ठा विक्रेते आणि कापूस जिनींग मिलधारक यांची महत्वाची भुमिका आहे. त्याकरीता कृषि विद्यापीठ, कृषि निविष्ठा विक्रेते आणि शेतकरी एकत्र आल्यास गुलाबी बोंडअळीचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य होईल. शेतक-यापर्यंत योग्य संदेश पोहचविण्यासाठी अशा प्रकारच्या कृषि निवीष्ठा विक्रेत्यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन फक्त कपाशीपूरते न करता विविध पिकाकरीता केले पाहीजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

मार्गदर्शनात श्री. बी.एस.कच्छवे म्हणाले कि, कृषि निविष्ठा विक्रेत्यांनी स्वत:चे कृषिविषयक ज्ञान अद्ययावत ठेवले पाहिजे जेणे करून ते शेतक­यांना योग्य मार्गदर्शन करतील, त्याकरीता त्यांनी वेळोवेळी अशा प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले पाहिजे व विद्यापीठाशी संपर्कात राहिले पाहीजे. डॉ. संजीव बंटेवाड यांनी किडीचे व्यवस्थापन करतांना निव्वळ रासायनिक किटकनाशकावर अवलंबुन न राहता इतर पध्दतीचाही अवलंब केला पाहीजे जेणेकरून पर्यावरणावर, मानवी आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कमी करता येईल. याकरीता निविष्ठा विक्रेत्यांनी रासायनिक सोबतच इतर पर्यायी पध्दतीचा वापर करण्याचा सल्ला शेतक­-यांना दिला पाहिजे.

डॉ.के.एस.बेग म्हणाले कि, कुठलेही तंत्रज्ञान जास्त दिवस टिकविण्यासाठी त्याचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे तसेच निविष्ठा विक्रेत्यांनी शेतक­यांना शिफारस करतांना किडीनुसार सुरवातीला साधारण परंतु प्रभावी किटकनाशंकाची शिफारसच करावी जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल व किडीचे व्यवस्थापन ही चांगले करता येईल.

प्रशिक्षणात डॉ. बी. व्ही. भेदे यांनी गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन, डॉ.ए.टी.दौंडे यांनी कापूस रोग व्यवस्थापन आणि डॉ.डी.डी.पटाईत यांनी किटकनाशकाचा सुरक्षीत वापर यावर सचित्र मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. अशोक जाधव यांनी किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पाच्‍या कार्याचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.रामप्रसाद खंदारे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी केले.

कार्यक्रमात कापूस दिनदर्शिका २०२२ व कापूस लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास डॉ.एस.पी.म्हेत्रे, डॉ.एस.बी.घुगे, डॉ. स्मिता सोळुंखे, डॉ. अमोल मिसाळ, डॉ. अमित तुप्पे, डॉ.सी.डी.देशमुख आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री. ए.ए.ठाकर, डॉ. प्रशांत जाधव, श्री. के.एल.सांगळे, श्री. डी.डी.काळदाते, श्री.डी.डी.भोसले, कु. प्रियंका वाघमारे, श्री. नारायण ढगे, श्री. सचिन रणखांबे, श्री.इरफान बेग आदींनी प्रयत्न केले.