Pages

Friday, March 4, 2022

उत्‍पन्‍न वाढीकरिता एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करा ....... डॉ. दत्तप्रसाद वासकर

मौजे धानोरा (ता. बसमत जि. हिंगोली) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित शेतक­यांच्या शेतावरील प्रयोग योजनेच्‍या वतीने दिनांक 2 मार्च रोजी मौजे धानोरा (ता. बसमत जि. हिंगोली) एकात्मिक शेती पध्दती या विषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते. मौजे धानोरा येथील प्रगतशील शेतकरी श्री दादाराव राऊत, श्री पांडुरंग गाडगे, मुख्य कृषिविद्यावेत्ता डॉ. वासुदेव नारखेडे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ सुरेश कौसल्‍ये, मृदा शास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, शेतक­-यांनी एकात्मिक शेती पध्दती द्वारे विविध घटकांचा समावेश करुन जास्तीत जास्त उत्पन्न काढावे, यासाठी विद्यापीठ विकसीत ज्वारी, सोयाबीन, हरभरा, मुग, तूर आदीसह विविध गवत वर्गीय पिकांच्‍या वाणाची लागवड करावी. तसेच विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञान, बायोमिक्स, जैविक खत यांचा वापर करावा. जास्‍त आर्थिक फायदयाकरिता शेतमाल प्रक्रीया करुन विक्री करावी. विविध वृत्तमानपत्रात प्रकाशित होणारे कृषि विषयक लेख, बातम्या यांचे नियमित वाचन करावे. तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञांशी संपर्क साधून विविध तंत्रज्ञानाची माहिती घेण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले.

मुख्य कृषिविद्यावेत्ता डॉ. वासुदेव नारखेडे यांनी एकात्मिक शेती पध्दती मध्ये घेण्यात येणा­या विविध घटकांचे पिक लागवड पध्दती, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन, तुती लागवड, भाजीपाला, फुल शेती, मधुमक्षीका पालन, फळपिके लागवड आदी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तर डॉ. सुदाम शिराळे यांनी एकात्मिक शेती पध्दती मध्ये सेंद्रीय खतांचा अवलंब करणे आवश्‍यक असुन जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढवीने आवश्यक आहे. माती परिक्षण करुन जमिनीचा सामु, सेंद्रीय कर्ब उपलब्ध अन्नद्रव्य या आधारे संतुलीत खते देण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ. सुरेश कौशल्ये यांनी केले. सुत्रसंचालन श्री. राऊत यांनी केले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.