Pages

Tuesday, March 8, 2022

वनामकृवितील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्‍या वतीने कृषि यांत्रिकीकरण व मुल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प - कृषि क्षेत्रात पशु शक्तीचा योग्य वापर योजनेच्‍या वतीने अनुसुचित जाती उपयोजने अंतर्गत शेतक­यांसाठी ‘कृषि यांत्रिकीकरण व मुल्यवर्धन’ या विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ८ व  ९ मार्च रोजी करण्यात आले आहे. प्रशिक्षाणाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी प्रभारी संचालक संशोधन डॉ. जी. के. लोंढे, परभणी तालुका कृषि अधिकारी श्री. संदिप जगताप, धर्मभूमी पत्रकाचे संपादक श्री. मदन कोल्हे, कृषि अभियंत्रिकी महाविद्यालयाच्‍या प्राध्यापक डॉ. स्मिता खोडके, डॉ. राहुल रामटेके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, शेतकरी व महिला सक्षम करण्‍याकरिता, त्यांचे शेतीतील काबाडकष्ट कमी करण्‍याकरिता तसेच आर्थिक उन्नती साधण्यासाठी महिलांनी एकत्रित होऊन लघुउद्योग आणि कृषी उत्पादनाचे मुल्यवर्धन करणे ही काळाची गरज असल्‍याचे सांगुन पशुशक्तीचा योग्य वापर योजने अंतर्गत असलेल्‍या विविध यंत्राबाबत महिलांनी प्रशिक्षण घेऊन लाभ घेण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.

प्रभारी संशोधन संचालक डॉ. गजेंद्र लोंढे म्‍हणाले की, शेतक­यांच्‍या आर्थिक उन्‍नती करिता शेतमालाचे मुल्यवर्धन करणे गरजेचे असुन शेती पुरक व्यावसायावर भर द्यावा, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात योजनेच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी प्रशिक्षण आयोजनाच्या भुमिका विषद करून महिलांना यांत्रिकीकरणाद्वारे कृषि उत्पन्नाचे मुल्यवर्धन आणि लघु ऊद्योग निर्मिती यावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात डॉ. स्मिता सोलंकी यांनी कृषि यांत्रिकीकरण प्रात्यक्षिक, महिला गृह उद्योग व बचत गटासाठी पापड मशीन, शेवई मशिन, मिरची कांडप, दाल मिल, पिठ गीरणी, तेलघाणी इत्यादी यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवुन त्याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच डॉ. राहुल रामटेके, विभाग प्रमुख अपारंपारीक उर्जा विभाग यांनी सौर वाळवणी प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. संदिप जगताप यांनी शेतकरी व महिलांसाठी सदरील प्रशिक्षणाची काय गरज आहे आणि आपला माल आपनच मुल्यवर्धीत करुन आर्थिक विकास साधता येईल असे मत व्‍यक्‍त केले.

प्रशिक्षणार्थीं सौ. मिराताई आवरगंड यांनी लघुउद्योगामार्फत निर्मीत आंब्याचे लोणचे, वाळकाची उसरी यांची पाहणी करुन मान्यवरांनी त्यांच्या लघुउद्योगाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. खंदारे यांनी केले तर आभार डॉ. संदेश देशमुख यांनी मानले. सौ. स्वाती घोडके यांनी आत्माद्वारे उपलब्ध झालेल्या प्रशिक्षणार्थींचे समन्वयक म्हणून कार्य केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. अजय वाघमारे, श्री. दिपक यंदे, श्री. भरत खटींग, श्री. रुपेश काकडे, कृष्णकुमार बिलवरे, श्रीमती सरस्वती पवार आदींनी परिश्रम घेतले. सदरील प्रशिक्षणात ५० पेक्षा जास्त शेतकरी व महिलांनी नोंदणी केली व विद्यापीठातील प्रध्यापक, शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला.