Pages

Tuesday, April 19, 2022

मोसंबीवरील मर रोगाकरीता विद्यापीठ शास्त्रज्ञांनी सुचविल्या उपाययोजना

मौजे गोळेगाव येथे विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या निदान चमू भेट

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या चमूने पूर्णा तालुक्यातील गोळेगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री दिलीपराव दुधाटे यांच्या मोसंबी बागेस भेट दिली. श्री दुधाटे यांच्या आठ एकर मोसंबी बागेतील एक एक मोसंबी चे झाड रोगग्रस्त होऊन हळूहळू मरत आहे, त्याकरिता त्यांनी विद्यापीठाशी संपर्क केला असता, विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषिविद्यावेत्ता डॉ.जी.डी.गडदे, पिक रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही.एम.घोळवे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, वरीष्ठ संशोधन सहाय्यक श्री एम.बी.मांडगे इत्यादी शास्त्रज्ञांच्या चमूने त्यांच्या शेतावर भेट देऊन मोसंबी बागेची पाहणी केली. मोसंबी बागेची पाहणी केली असता बागेस मोठ्या प्रमाणात डिंक्‍या, फायटोप्थेरा या रोगाचा प्रादुर्भाव झाल्‍याचे आढळून आले. झाडाच्या खोडा मधून मोठ्या प्रमाणात डिंकाचा स्त्राव होऊन, प्रादुर्भावग्रस्त झाड कमकुवत होऊन हळूहळू वाळून मरत आहेत तसेच मोसंबी मध्ये लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव पानांवर मोठ्या प्रमाणात दिसून आला, त्यामुळे पानावर पांढरे चट्टे पडून झाडाच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसून येतो आहे. त्याकरिता मर आणि कोळी कीडीकरीता वेळीच उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्‍याचे शास्‍त्रज्ञांनी सांगितले. मर रोगावरील उपायोजना करण्यासाठी प्रादुर्भाव होऊन मेलेली झाडे काढून नष्ट करावीत व त्यासोबत पाण्याचा योग्य पध्दतीने व योग्य प्रमाणात वापर करावा तसेच झाडाला वेळोवेळी बोर्डो पेस्ट लावाण्‍याचा सल्‍ला दिला. त्याचप्रमाणे खोडावरील स्त्रवणाऱ्या डिंक खरडून काढून त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेट १० ग्रॅम  प्रति १ लिटर पाण्यात मिसळून ते द्रावण जखमेच्या ठिकाणी लावून धुवून घ्यावे व नंतर फोसेटील ८० टक्के किंवा मेटालेक्सिल ४ टक्के अधिक मॅन्कोझेब ६४ टक्के या बुरशीनाशकाची पेस्ट तयार करून  त्या ठिकाणी लावावी. लाल कोळी करिता पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम किंवा इथिऑन २० मिली किंवा प्रोपरगाइट १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी आवश्यकता वाटल्यास १५ दिवसांच्या अंतराने २-३ फवारण्या कराव्यात. तसेच फायटोप्थेरा मर या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास फोसेटील ८० टक्के २.५ ग्रॅम किंवा मेटालेक्सिल ४ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २.५ ग्रॅम या बुरशीनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारावे तसेच हे द्रावण झाडाच्या भोवती मुळांवर सुध्दा टाकावे. जैविक मध्ये विद्यापीठातील ट्रायकोडर्मा या बुरशीचा फवारणीद्वारे व आळवणीद्वारे वापर करावा. सर्व एकत्रित पद्धतीने उपाययोजना केल्यास या रोगाचा प्रादुर्भाव कमी होऊन होणारे नुकसान टाळता येईल असे यावेळी शास्त्रज्ञाने सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी श्री प्रताप काळे, कृषी सहाय्यक श्रीमती एस.ए.भालेराव आणि गावचे सरपंच श्री. सिताराम दुधाटे हे उपस्थित होते.